''त्याला लिहिता-वाचता येत होतं म्हणून.'' अनसूया म्हणाली.

''शेतकर्‍याला पण लिहिता येत नाही, अर्ज लिहिता येत नाही. साक्षीदाराशिवाय आलेली मनिऑर्डर त्याला मिळत नाही. सर्वत्र त्याला दक्षिणा ठेवावी लागते. हे सारं अज्ञान नको का दवडायला? मागील वर्षी पीक आलं नव्हतं. कलेक्टर कसा म्हणे, 'जमाखर्च दाखवा' कोठून दाखविणार जमाखर्च?'' शांता म्हणाली.

''घरातील मडकी रिकामी आहेत, हे का कलेक्टरला माहीत नव्हतं? येऊन बघायची होती त्यानं. गाडग्या-माडक्यांचेही लिलाव केले !''पार्वती म्हणाली.

''परंतु आपणाजवळ ज्ञान असतं, निर्भयता असती, तर आपण लढा केला असता. तुम्ही शिका. मी शिकवीन. तुमच्याबरोबर मी कापूस वेचायला येईन. तुम्हांला गाणी सांगेन. आपले दुर्दैव आपण दूर केलं पाहिजे.'' शांतेने सांगितले.

''पण शांते, तू काही म्हण. आपलं दैवच खोटं.'' एक म्हातारी बाई म्हणाली.

''नाही आजी; हे दैवबिवं लबाडांनी निर्माण केलं आहे. म्हणे तुला शनीची साडेसाती आहे. आजी, जसे चंद्रसूर्य आहेत, तसा एक आकाशात शनी असतो. त्याच ग काय संबंध ! खरी साडेसाती या सावकारांची. सावकाराचा शनी आपल्या राशीला न आला तर आपली धान्याची रास घरी नाही का राहणार? कोणी शनी नाही नि मंगळ नाही. काही श्रम न करता हात पाहणारा लठ्ठ पोटाचा होतो. काही श्रम न करता सावकार लठ्ठ पोटाचा हातो. सावकारही अभिषेक करायला सांगतो. चार आणे देतो. आपल्याला वाटतं, आपणही असंच करावं. वेडी आपण.'' शांता म्हणाली.

''मग येणार ना शिकायला?'' शांतेने विचारले.

''हो, येऊ.'' सार्‍या म्हणाल्या.

''मी म्हातारीही येईन.'' ती वृध्दा म्हणाली.

शांतेचा वर्ग सुरू झाला. मुकुंदरावांपासून तिने एक प्रार्थना करून घेतली होती. ती आरंभी म्हटली जाई.

सदा भजू पुजू आपण ज्ञान-भगवाना

ज्ञानावीण जगती मोठे अन्य दैवत ना ॥
ज्ञान नसे तरी ना मान

नसे ज्ञान तरी ना स्थान
ज्ञान मिळवू दुनियेमधले घेऊ आता आणा ॥

शक्ति एक आहे ज्ञान
शान देई निर्भयपण

ज्ञान हवे स्त्री-पुरुषांना सर्व माणसांना ॥
लिहावयास वाचावयास

नको कुणी येई न ज्यास
असा ध्यास लागो आता सर्व हिंदुस्थाना ॥

अडाणी न पडून राहू
स्त्रिया आम्ही वरती येऊ

स्त्रियांस का आत्मा बुध्दी हृदय भावना ना ॥
पिळवणूक करि मग कोण

अडवणूक करि मग कोण
कमावील तोची खाईल, श्रमे त्यास जाणा ॥

ज्ञान मिळवू निर्भय होऊ
शेतकरी वरती येऊ

खरेखुरे राजे होऊ लूट थांबवू ना ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel