''चित्रकला जाणणारी पाहिजे मला.''तो म्हणाला.

''बोलताना सूत कातणं जमत नाही. तुटतं बघ.'' ती म्हणाली.

''फेक तो चरखा माया, मी बसतो या खाटेवर व तू माझं चित्र काढ. तू चित्रकला विसरलीस वाटतं? चरखा आला म्हणजे कला पळणारच.'' तो म्हणाला.

''चरखा कलेचा शत्रू नाही. खादी-प्रदर्शनात किती सुंदर वस्तू असतात. चरखा जीवनाची कला देतो. 'जीवनकला सुंदर करील तीच कला.' लाखो दरिद्री लोकांच्या जीवनात माधुर्य आणणारा चरखा, त्यांच्या मुलाबाळांच्या तोंडावर गुलाबी रंग चढवणारा चरखा, त्यांच्या मुलाबाळांच्या तोंडावर गुलाबी रंग चढवणारा चरखा, त्यांच्या सुखी जीवनात संगीत नेणारा चरखा, त्यांच्यातच कला नसेल तर कोठे रे असेल? चरखा म्हणजे कलानिधी. मी पूर्वी रंगाचे कुंचले बोटांत धरीत असे. आता हे कापसाचे पेळू धरते. कलेचा अभिमान माझा गेला. खरा कलावान म्हणजे शेतकरी. तो ओसाड जमीन हिरवी हिरवी करतो. परंतु असा तो कलावान आज विकल झाला आहे; त्याच्या जीवनात जो आनंद निर्मिल तोच खरा कलापूजक.'' माया म्हणाली.

''यंत्रयुगात चरखा टिकणार कसा?'' त्याने विचारले.

''बंगालमध्ये आचार्य प्रफुल्लचंद्रांहून शास्त्रांची महती कोणता शास्त्रज्ञ अधिक जाणतो? परंतु यंत्राची व विज्ञान शास्त्राची महती जाणणारा हा आचार्य आज म्हातारपणी खेडयातील किसानास चरख्याचा संदेश देत फिरतो. तो का मूर्ख? 'गरिबांनी विणलेली खादी घ्या.' म्हणून ते सारखं सांगतात. ते का वेडे. प्रद्योत, तू खादी वापर.'' मायेने विचारले.

''मी खादी वापरली तर काय होईल?'' त्याने विचारले.

''दरिद्री बंधूंना घास मिळेल !'' ती म्हणाली.

''आणखी काय होईल?'' पुन्हा त्याने विचारले.

''महात्माजींना आनंद होईल.'' ती म्हणाली.

''आणखी काय होईल?'' पुन्हा त्याचा प्रश्न.

''प्रश्न विचारणारा असा वेडा न राहता शहाणा होईल.'' ती म्हणाली.

'माया, तुझ्या त्या चित्राच्या वहीत कोणाचं आहे ग ते चित्र?'' त्याने विचारले.

''तू रे केव्हा पाहिलंस?'' तिने विचारले.
''काल मी माझं पुस्तक मागायला आलो होतो. तू नव्हतीस घरी. तुझी आई म्हणाली,'बघ तिच्या बॅगेत,' पुस्तक सापडलं नाही; परंतु तुझी कला मला सापडली. कोणाचं ग ते चित्र? खर्‍या माणसाचं का खोटया माणसाचं?'' त्याने विचारले.

''खोटया माणसाचं चित्र मी अद्याप काढलं नाही.'' ती म्हणाली.

''म्हणजे माझं ना?'' त्याने विचारले.
''असं दुसर्‍याच्या बॅगेतलं पाहणं म्हणजे खोटेपणा नाही का?'' तिने प्रश्न केला.

''परंतु मला तू दुसरी वाटत नाहीस. लहानपणापासून आपण एकमेकांस ओळखतो. आपण एकत्र खेळलो आहोत. मी तुला तळयातील लांब देठाची कमळं आणून देत असे. कमळ हातात धरून देठानं तू मला मारीत होतीस. माया, मला वाटे की, आपण परके नाही. आज मला कळलं की, आपण परके आहोत. कोणी केलं आपणास एकमेकांस परकं? त्या चित्रानं? फाडून टाकू दे चित्र व आपण एक होऊ.'' तो म्हणाला.

''प्रद्योत, जा रे आता, मला कातू दे. सारखी तुझी कटकट नि वटवट.'' ती त्रासून म्हणाली.
''माझी कटकट तुझ्या पाठीमागे मी मरेपर्यंत राहील.'' तो म्हणाला. इतक्यात प्रद्योतचे वडील अक्षयकुमार तेथे आले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel