''किती रे वाट पाह्यची तुझी. येतोस ना विटा पाहायला?'' त्यांनी विचारले.
''ही माया येथे हुज्जत घालीत बसली.'' तो म्हणाला.
''उद्या लग्न लागल्यावर हुज्जत घाला. आज नको. नाही तर आजच हुज्जत घालून घ्या. पुढे नको.'' ते म्हणाले.
''विटा कशाला अक्षयबाबू?'' मायाने विचारले.
''तुला राह्यला चांगला हवा ना बंगला; चांगला हवा ना दिवाणखाना? लाव मग तेथे सुंदर तसबिरी. का स्वतःच तेथे चित्रं काढशील?'' त्यांनी विचारले.
''ती सूत कातीत बसेल तेथे भुतासारखी.''प्रद्योत म्हणाला.
''परंतु सूत, कातणारे भूत तेथे येतय कशाला? ते चालले पळून.'' माया म्हणाली.
''चल प्रद्योत, तिला कातू दे.'' अक्षयबाबू म्हणाले.
पितापुत्र बाहेर पडले. तो रमेशबाबू आले.
''चाललात अक्षयबाबू? केव्हा आलात?'' त्यांनी प्रश्न केला.
''आताच आलो व निघालो.'' ते म्हणाले.
''पान घ्या ना. बसा.'' रमेशबाबूंनी आग्रह केला. दोघे मित्र तेथे पलंगावर बसले.
''माया, तांबूलतबक आण बघू.'' रमेशबाबूंनी हाक मारून सांगितले. मायाने तबक आणून ठेवले. उभय मित्रांनी तांबूल करून खाल्ले. प्रद्योतानेही विडा खाल्ला व त्याने एक विडा करून मायेपुढे नेला. तो तिला म्हणाला,''माया, हा विडा खा. जर तुझं तोंड रंगलं तर तुझं माझ्यावर प्रेम आहे असं सिध्द होईल.'' माया म्हणाली, ''असं नाही. तुझ्या हातच्या विडयानं माझं तोंड रंगलं तर तुझं माझ्यावर प्रेम आहे हे फार तर सिध्द होईल. माझं तुझ्यावर आहे हे नाही सिध्द होणार.'' प्रद्योत लगेच म्हणाला,''तर मग तूही मला दे करून. जर माझं तोंड रंगलं तर तुझंही माझ्यावर प्रेम आहे हे सिध्द होईल.''
मायेनं विडा करून आणून दिला. प्रद्योतनं खाल्ला. त्याने जीभ बाहेर काढून पाहिली; काही नाही रंगली. तो खट्टू झाला.
''माया, तू लबाडी केलीस. विडयात कात, चुना, सारे पदार्थ घातले होतेस का?'' त्याने विचारले.
''सारे पदार्थ घातल्यावर प्रेमाची परीक्षा रे कोठे राहिली? प्रेमाचा अभंग, अनंत रंग अंतरंगात असेल तर सारे पदार्थ न घालता विडा रंगला पाहिजे. विश्वभारतीत एक महाराष्ट्रीय तरुण आहे. त्याने एक मराठी स्त्री-गीत सांगितलं -
अतिप्रीत बहु प्रीतीची दोघे जण
विडा रंगे कातावीन वैनीबाईचा
कात न घालता विडा दिला तरी उभयतांचा तो विडा रंगत असे. हे खरे प्रेम.'' ती म्हणाली.