मिनीच्या घोडयाजवळ जाऊन ते म्हणाले, ''मोत्या, किती रे वाईट झालास ! मिनी नाही म्हणून तू ही रडतोस? मिनीच्या हातची चंदी हवी? येईल हो लवकर. उभा राहून अशीच तपश्चर्या कर. एक दिवस तपश्चर्या फळेल. समजलास ना? किती तरी दिवसांत तुझ्या पाठीवर मिनी बसली नाही. त्या दिवशी दोघे बसली तुझ्यावर. जणू लग्नाची वरात. मला वाटलं चालली मिनी पळून; परंतु खरंच गेली रे. येईल, एक दिवस परत येईल. म्हातार्‍या बापाची तिला दया येईल. मिनी भेटल्याशिवाय मला मृत्यू भेटणार नाही. मिनीला भेटेन तेव्हाच मरेन.''

मिनीच्या बाजाच्या पेटीजवळ जाऊन ते बसत व म्हणत, ''गोड सुरांनो, रडत असाल तुम्ही. मिनीची कोवळी, सुंदर रेशमी बेटं किती तरी दिवसांत तुमच्या अंगावरून फिरली नाहीत. मिनीची बोटे लागताच तुमची हृदयं नाचू लागतात. गोड संगीत जगाला देतात. किती मळले हे सूर ! मिनी रोज पुसून ठेवायची. मिनी वाजवायला बसली म्हणजे किती गोड वाटायचं. एके दिवशी ते मधुकरपंत आले व म्हणाले,''मी वाजवतो चांगलं की मिनी वाजवते चांगलं? बसले वाजवायला आणि मग मिनी बसली. मधुकरपंतांची जणू समाधी लागली. मिनी प्रेम करते तुमच्यावर, होय का रे सुरांनो? प्रेमाचा स्पर्श म्हणजे काही अद्भुत वस्तू आहे. येईल हो मिनी. काढील हो तुमच्यातून गोड संगीत. शांत राहा. या पेटीत बसून तपश्चर्या करा.''

ते मिनीचे अंथरूण घालून ठेवायचे. ''मिनी दमून आली तर निजेल. आयत्या वेळेला धांदल नको. गादी नको मिनीला? मला म्हातार्‍याला गादी लागते अजून. स्मशानात जायची वेळ आली तरी गादी सुटत नाही आणि कोकिळा मिनी घोंगडीवर निजू लागली. त्या दिवशी म्हणाली, ''बाबा, चेपा हो माझी पाठ. घोंगडी खुपते व म्हणून पाठ दुखते.'' मिनीची पाठ कोण चेपीत असेल? कोठे असेल बिचारी? मिने ये, तुझ्यासाठी ही मऊ मऊ घोंगडी आणली आहे बघ आणि ही शाल. तुझी शाल ते घेऊन गेले. ती शाल का आणायला गेलीस? वेडी. एक सोडून शंभर शाली दिल्या असत्या तुला. शाल गेली म्हणून तू गेलीस की दुसरा काही तरी माल गेला तो आणायला गेलीस? ये, परत लवकर ये; नसेल माल मिळत तरी ये हो घरी. किती भटकणार तू?''

गावात कोणी गोपीचंदाची गाणी म्हणणारे भिकारी आले किंवा पेटीवर गाणी म्हणणारी ती भिकारी जोडपी आली, तर श्रीनिवासराव त्यांना सांगत, ''मिनी कोठे भेटली तर सांगा की, मी वाट पाहत आहे. रात्रंदिवस डोळयांत प्राण येऊन बसले आहेत तिला पाह्यला. हा पहा तिचा फोटो. उंच आहे तशी ती. फार गोरीगोमटी नसली तरी सुरेख दिसते ती. सरळ आहे नाक व डोळे आहेत मोठे. हसली म्हणजे ओठ किती सुंदर दिसतात ! दातांची मोती आत झळकतात व त्यांचे किरण पडतात त्या सौम्य रंगाच्या लाल ओठांवर. हात की नाही जरा तिचे लांब आहेत. कानात हिर्‍याची कुडी होती. जणू आकाशातले तारेच आपले बसले गालांजवळ येऊन. नाकात तसे तिला चमकीबिमकी आवडत. साधी होती मिनी. दिसली कोठे तर सांगा. तुम्ही हिंदुस्थानभर हिंडता. तुम्हाला आढळेल कोठे तरी. पित्याचा निरोप सांगा. हा घ्या रुपया. सांगाल न निरोप? चिठ्ठी उडून नाही ना आता जाणार? आणखी एखाद्या रुपयाचे दडपण ठेवू?''

एखादे वेळेस मिनीच्या सार्‍या वस्तू ते एकत्र करावयाचे व त्यांच्याकडे बघत बसायचे व म्हणायचे, ''मिने, या सार्‍या वस्तू सोडून एका वस्तूसाठी गेलीस? या वस्तू का फुकट? आणि मीही का फुकट? काही राम नाही आमच्यात? आम्ही का निर्माल्य? टाकण्याच्या लायकीची?

सायंकाळ झाली म्हणजे रोज गावाबाहेरच्या टेकडीवर ते जाऊन बसत. चारी दिशांकडे बघत. येते का मिनी कोठून ते पाहत. दिवस मावळे, अंधार पडू लागे. गावातील दिवे चमकू लागत आणि श्रीनिवासरावांचे डोळेही चमकू लागत. अश्रू येत. कष्टाने ते उठत व म्हणत, ''आज नाही मिनी आली. एक दिवस गेला. येईल. उद्या येईल. एक दिवस ती येईल, पित्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. पित्याच्या प्रेमाला का काहीच किंमत नाही? रुपयात पै इतकीही किंमत नसेल?''

त्या दिवशी नित्याप्रमाणे ते टेकडीवर गेले. नेहमीच्या दगडावर बसले. हातात खडे घेऊन. ''मिनी येणार असेल तर हा खडा त्या दगडाला लागेल.'' असे म्हणून दूर मारीत. परंतु नेम आपला चुकायचा. पण एक खडा लागला तशी एकदम उठले. ''येणार, मिनी येणार'' असे म्हणत त्यांनी टाळया वाजविल्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel