११. मोहनाशन मोहन

मोहनला शिवतर गावात राहणे अशक्य होऊ लागले. मोहनचे शांतेवर प्रेम आहे व शांतेचे मोहनवर प्रेम आहे अशी कुणकुण रामरावांच्या कानापर्यंत गेली.

''मोहन, कशाला पडतोस या फंदात? शांता अशानं देवाकडे जाईल.'' त्याचे मित्र म्हणत.

''मी कोणत्याच फंदात पडलो नाही.'' मोहन उत्तर देई.

''त्या दिवशी तू शांतेचे डोळे पुशीत होतास, तिच्या अगदी जवळ वडाच्या झाडाखाली बसला होतास, असा सारा गाव बोलत आहे.'' गंभीर म्हणाला.

''मग त्यात वाईट काय आहे? शेतात मोट धरायला जात होतो. शांता एकटी बसलेली दिसली. का अशी रानात येऊन बसली, असे मनात आलं. जवळ गेलो तर गंगा-यमुना वाहात आहेत. दुःखितांचे अश्रू पुसणं का पाप आहे? हे पाप असलं तर सार्‍या संतांनी ते केलं आहे.'' मोहन म्हणाला.

''मोहन, संतांचं हृदय निरिच्छ असतं, निःस्वार्थ असतं. त्यांच्या प्रेमाला आसक्तीचा वास नसतो. तू शांताचे डोळे पुसलेस, ते एकदम हृदय भरून येऊन पुसलेस का? जरा लाजलास की नाही? जरा संकोच वाटला की नाही? हात कापले की नाही? ओठ हालले की नाही? तुझे डोळे उघडमीट करीत होते की नाही? सांग.'' शंकर म्हणाला.

''पण यात पाप काय ते समजत नाही.'' मोहन म्हणाला.

''तुम्ही पतिपत्नी म्हणून व्हा. मग पाप नाही. गणपत म्हणाला.

''परंतु मोहनची पत्नी देवाघरी जायची हे ठरलेलं. मोहन शांतेसारख्या देवतेचा बळी घेऊ नकोस.'' गंभीर गंभीरपणे म्हणाला.

मित्रांची अशी चर्चा होई. गावातील बायकामाणसेही बोलत. मोहन बायांचा वर्ग घेत असे. परंतु बाया कमी येऊ लागल्या.

''शांताबाई आल्या तर वर्गाला जाऊ. मोहनच्या नको.'' असा सूर त्यांच्यात निघू लागला. म्हातार्‍या बायका म्हणू लागल्या, ''ती शांताही तशीच आहे. शिकवण्याचे हे परिणाम !''

रामरावांनी एके दिवशी मोहनला घरी बोलावले. तो गेला. रामराव काही बोलेतना. त्याच्याकडे तिरस्काराने व क्रोधाने ते पाहात होते.

''का बोलावलंत तुम्ही?'' त्याने विचारले.

''तुझ्या थोबाडीत मारायला.'' ते म्हणाले.

''अपराध असेल तर खेटरे मारा.'' तो म्हणाला.

''पुन्हा बेशरमपणे बोलतो आहे. तू शांताचे डोळे पुसलेस की नाही?'' त्यांनी विचारले. ''हो.'' तो म्हणाला.

''हे बरं केलंस का? शांताचं अद्याप लग्न व्हायचं आहे. अशा कंडया  सर्वत्र गेल्या तर होईल का तिचं लग्न?'' त्यांनी विचारले.

''मी काय सांगू?'' तो शांतपणे म्हणाला.

''तू शांताला चाळवीत आहेस. चांगला सरदाराचा मुलगा मागणी घालीत होता. परंतु वेडया पोरीनं नाकारलं त्याला. म्हणे त्याच्यापेक्षा मजूर मुलगा पत्करायला तूच वाटतं तो मजूर मुलगा? शांताकडे यासाठी शिकायला येत होतास काय? म्हटलं एवढी शिक्षणाची गोडी कशी लागली शेणफोडूला ! परंतु शेणफोडया हातांनी शांताचा हात धरू पाहण्याची इच्छा होती मनात. मोठीच बांधली आहेस हिंमत ! काही किंमत आहे का रे तुझी? आमचं खानदानी घराणं. सरदार घराणं. गोविंदरावांशी आमचे संबंध आणि हे सारे माहीत असून शांताशी माकडचेष्टा करू पाहतोस?'' रामराव अंगावर धावून म्हणाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel