जेथे मुख्य साठा होता तेथेच रामदास व माया यांना इतरांबरोबर काम मिळाले. स्वयंसेविकांना तेथे एक मोठे काम देण्यात आले होते. हजारो कपडे तेथे येऊन पडले होते; परंतु ते कपडे सारे धड होते असे नाही. फाटलेले जरा शिवायला हवे होते. गुंडया लावायला हव्या होत्या. ठिगळे जोडायला हवी होती. स्वयंसेविका हे काम करू लागल्या. तेथे शिवणीची दोन-तीन यंत्रे आणण्यात आली होती. त्यावर काही भगिनी काम करत होत्या. मृणालिनी, हेमलता, माया हातांनीच भराभर टाके घालीत होत्या. शिवलेले कपडे व इतर कपडे यांचे वर्गीकरण करून अलग गठ्ठे बांधून ठेवण्याचे काम रामदास व इतर स्वयंसेवक करीत होते. स्त्रियांचे कपडे, लहान मुलांचे कपडे, पुरुषांचे कपडे साधारण मोठया मुलांचे कपडे असे प्रकार केले जात होते. काम करता करता गप्पागोष्टीही चालल्या होत्या.

''मृणालिनी, जरा नीट घाल की टाके !'' हेमलता म्हणाली.

''पुरे बाई तुझं. कपडयांचे ढीग बघ किती पडले आहेत. असे नीट अगदी काम करू म्हटलं तर आटपेल तरी का?'' मृणालिनी म्हणाली.

''अग, त्या गरिबांच्या अंगावर चार दिवस तरी ते राहायला हवे ना?'' माया बोलली.

''कोणतंही काम असो, त्यात हृदय ओतलं पाहिजे. ते मनःपूर्वक केले पाहिजे. एक टाका घालण्याचं असो किंवा महान ग्रंथ लिहिण्याचं असो. पावलोपावली परिपूर्णतेचं स्मरण माणसानं ठेवलं पाहिजे.'' हेमलता म्हणाली.

''मोठे व्याख्यानच देतेस की तू.'' मृणालिनी म्हणाली.

''का ग माये, तू नुसती चित्रकलाच का शिकतेस?'' हेमलतेने विचारले.

''दुसरंही थोडं थोडं शिकते. मी मराठी भाषा शिकत आहे.'' माया म्हणाली.

''बंगालीसारखी गोड आहे का ग ती?'' मृणालिनीने विचारले.

''त्यातील एका महान कवीने म्हटले आहे की, 'अमृतालाही जिंकील अशी माझी भाषा आहे...'' माया म्हणाली.

''तेलगू भाषा अधिक नादमधुर असे प्रसिध्द पंडित मॅक्समुल्लर म्हणत असे.'' हेमलता म्हणाली.

''बंगालीची सर कोणत्याही भाषेला येणार नाही. शरच्चंद्र, बंकीमचंद्र, रवींद्रनाथ, नवीनचंद्र, मायकेल मधुसूदन दत्त, डी.एल. राय अशी थोर नावं कोणत्या भाषेला उच्चारता येतील? या महान साहित्यसेवकांनी बंगाली भाषेला पृथ्वीमोलाची लेणी चढविली आहेत.'' मृणालिनी म्हणाली.

''बंगाली भाषेला असा अहंकार जडेल तर ती पडेल.'' माया म्हणाली.

''माया, तू बरोबर आणली आहेस काही चित्रं?'' हेमलतेने प्रश्न केला.

''येथे कशाला आणू? परंतु मी कॅमेरा आणला आहे.'' ती म्हणाली.

''फोटोग्राफीसुध्दा शिकली आहेस वाटतं?'' मृणालिनीने विचारले.

''अजून तशी तरबेज नाही झाले. परंतु अभ्यास करते.'' माया म्हणाली.

इतक्यात रामदास, हलधर शिवावयाचे कपडे तेथे घेऊन आले व शिवलेले नेऊ लागले.

''माया गप्पा नको मारू. तोंड चालेले आहे तितक्या वेगाने हात चालले तर बरे होईल." रामदास म्हणाला.

"जरा शिवून पहा तुम्ही, आमच्या बोटांना भोके पडली." माया म्हणाली.

"आम्हाला का शिवता येणार नाही ?" त्याने विचारले.

"शिवाल वेडेविद्रे. सुई कपड्यात जाण्याऐवजी बोटात जायची. आणि मग तुमचीच सेवा करायची पाळी यायची." माया म्हणाली.

"तुला सेवेचं पुण्य मिळेल." रामदास म्हणाला.

"तुम्ही जा हे तिकडे. ते शिवलेले कपडे घेऊन जा." मृणालिनी जरा रागाने म्हणाली.

रामदास गेला.

"अग तो महाराष्ट्रीयन तरूण आहे. त्याला असं रागानं का बोलावं? परप्रांतीयांजवळ तर अधिकच आस्थेनं वागल पाहिजे. आपल्या प्रत्येक शब्दावरून, प्रत्येक कृतीवरून तो आपल्या प्रांताडी परिक्षा करत असतो." माया म्हणाली.

"महाराष्ट्रातून काही आली का मदत?" मृणालीनी म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel