''पुढं काय होणार आहे कोणास ठाऊक !'' तो म्हणाला.

''संन्यासी होणार की काय?'' तिने विचारले.

''येतं असं मनात.'' तो म्हणाला.

''तुम्ही संसारातही संन्यासी व्हाल. गरीब मातांच्या मुलांना जो प्रेमाने नटवतो, तो संसारात राहूनही मुक्त होईल.'' माया भक्तिप्रेमाने म्हणाली.

''माया तरून जायला कठीण असतं. माया जिंकणं कठीण.'' तो म्हणाला.

''जनी जनार्दन पाहणारा तेव्हा तरून जातो.'' ती म्हणाली.

''ज्ञानेश्वरीत असाच एक चरण आहे.'' तो म्हणाला.

''सांगा ना मला, माया तरून जाण्याचा चरण.'' ती म्हणाली.

येथे एकचि लीला तरले । जे सर्वभावें मज भजले ।
तया एलोचिकडे सरले । मायाजळ ॥

ही ओवी त्याने म्हणून दाखविली. मायेला पाठ होईपर्यंत त्याने म्हटली.

''कितीदा म्हणू ग? एकपाठी का नाही झालीस?'' तो म्हणाला.

''एक पाठीच आहे. दुसरी दाखवा बरं पाठ.'' ती हसून म्हणाली.

काही दिवसांनी परत माया व रामदास पुढे शांतीनिकेतनात आली. महापूर आला व गेला. परंतु मायेच्या व रामदासच्या हृदयात आलेला प्रेममहापूर गेला नाही. तो आणखी वाढतच गेला. महापुराच्या निमित्ताने देवाने त्यांना अधिकच जवळ आणले. देवाचे हेतू अर्तक्य आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel