रामदास गेला. माया गेली. त्यांचा अबोला संपला. तिळगूळ घेऊन गोड झाले सारे. रुसव्याफुगव्याशिवाय गंमत नसते. अनुरागाला रागाचा तांबूस रंग मधून-मधून हवा. सतारीच्या तारा पिरगाळाव्या लागतात, तेथे त्याला मधून-मधून ठोकावे लागते. गंमत म्हणूनही तबलजी जरा हातोडी मारतो; परंतु मग म्हणतो, ''पहिल्यानंच चांगला वाजत होता, उगीच ठोका मारला.'' मग आणखी चार ठोके मारावे लागतात आणि गोड बोल पुन्हा निघू लागतात. प्रेमाच्या मसलतीत असेच आहे. कधी-कधी एकमेकांचे कान पिरगळावे लागतात, कधी एकमेकांना सुकुमार प्रहार करण्याची इच्छा होते. त्याने अधिकच बिघडते गाडे; परंतु पुन्हा सुधारते सारे.
दोन चार दिवस झाले आणि अकस्मात् बाबूला तार आली. त्याचे नवीन वडील गोविंदराव आजारी होते. खोटी तार तर नसेल ना, लग्नाचा तर नसेल ना घाट घातलेला, अशी शंका त्याच्या मनात आली. परंतु ती क्षणभरच राहिली. घरी ताबडतोब बोलावले होते.
बाबू जरा भांबावला. घाबरला. त्याच्या तारेची वार्ता सर्वत्र गेली. मित्र येऊन चौकशी करून गेले. मायाही आली.
''तुम्ही गेलंच पाहिजे.'' ती म्हणाली.
''हो. परंतु जरा घाबरल्यासारखं वाटतं.'' तो म्हणाला.
''का बरं?'' तिने विचारले.
''काही कमी-जास्त झालं तर? मग मला इकडे परत येता येईल की नाही देव जाणे. घरचं सर्व पाहावं लागेल. आतापर्यंत मी मोकळा होतो; परंतु मग सारा संसार शिरावर पडेल. सारी जबाबदारी येईल. देणीघेणी, खतेपत्रे, सतराशे प्रकार. मी या गोष्टीत केवळ अनभ्यस्त. काय होईल ते खरं.'' तो म्हणाला.
''चार दिवसांपूर्वीच तुम्ही म्हणालात की, पुढे मागे जेव्हा ही इस्टेट माझ्या ताब्यात येईल तेव्हा ती दरिद्री जनतेस देऊन टाकीन. देवानं जणू तुमचा निश्चय ऐकला.'' ती म्हणाला.
''मी इस्टेटीचा भुकेला नाही. बाबा बरे होऊ देत.त्यांची सेवा करीन, ती इस्टेट वाटून टाकण्याचे श्रेय मला मिळावं म्हणून का मी बाबांच्या मरणाची इच्छा करू? छेः ! छेः! असं कधीही माझ्या मनात आलं नाही.'' रामदास म्हणाला.
''माझ्या म्हणण्याचा तसा हेतू नव्हता. परंतु परवाचे शब्द मला सहज आठवले.'' ती म्हणाली.
रामदास बांधाबांध करू लागला. मायेने त्याची वळकटी बांधली. ''ही शाल बाहेरच राहू दे. तुम्हाला गाडीत होईल.'' माया म्हणाली. ''बाहेर नको. ती ट्रंकेत ठेव. तुझ्या हातच्या सुताची ती शाल. ती हिरेमाणकाप्रमाणे कुलपात ठेवू दे.'' तो म्हणाला, ''ट्रंक एखादे वेळेस चोरीस गेली तरी अंगावरची शाल तर राहील ! तुमच्या डोळयात केरकचरा गेला तर ही शाल तो काढून टाकेल. वारा सुटला तर तो लागू देणार नाही. गाडीत कंटाळा आला तर ही शाल किती तरी गोष्टी सांगेल. ती प्रद्योतची माहिती देईल. अक्षयबाबूंची निराशा सांगेल. ही शाल वरच राहू दे हं.'' ती म्हणाली.