''विद्यार्थ्यांची विद्यार्थीदशा संपल्यावर एकदम अपरिचित समुद्रात येऊन पडलो असं त्यांस वाटता कामा नये. आजूबाजूस सामाजिक, राजकीय, धार्मिक वगैरे विचारांच्या ज्या अनंत प्रक्षुब्ध लाटा उसळत असतात, त्यांच्याशी त्यांचा थोडा फार परिचय करून दिला पाहिजे. नाही तर उद्या घाबरायचा. गाणी-गर्जना त्याच्या कानांवर गेल्या पाहिजेत. त्यांच्या आत्म्याला याप्रमाणे जरा वारा लागतो. आलं ना लक्षात?'' मुकुंदरावांनी विचारले.

''नैमित्तिक राजकारणाची आली कल्पना. आता विद्यार्थी-संघाचा नित्य धर्म कोणता?'' आनंदमूर्तींनी प्रश्न केला.

''शाळेत न मिळणारे शिक्षण ते आपल्या अभ्यासमंडळांतून घेतील. निरनिराळया वर्तमानपत्रांतील माहितीची कात्रणे कापून चिकटबुके करतील. ज्ञान कसं मिळवावं ते शिकतील, देशातील विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांच्या फोटोची आल्बम्स तयार करावी. देशातील सुंदर देखावे जमवावेत. सुट्टीच्या दिवशी खेडयांतून जावं. तेथे खेडयांतील जनतेला समजतील असे संवाद व मेळे करावेत. त्यातून त्या लोकांना नवीन राष्ट्रीय विचार द्यावेत. तेथील लोकांचं जीवन बघावं. त्यांच्या जीवनाशी समरस व्हावं. कधी मोठया सुटीत एखाद्या खेडयाचा रस्ता करावा. शहरं व खेडी त्यांच्यामध्ये आज प्रेमाचा संबंध नाही. असा रस्ता म्हणजे सहानुभूतीचा, प्रेमाचा पाटच होईल. कधी निरनिराळया विषयांवर वक्ते बोलावून व्याख्यानमाला करवाव्यात, वार्ताफलकावर वार्ता लिहाव्यात, फी कमी होणं, प्रश्नपत्रिका मातृभाषेतून असणं, मातृभाषेतून सर्व शिक्षण मिळणं, परीक्षांची केंद्रं वाढविणं, औद्योगिक शिक्षणाची मागणी करणं याही गोष्टींवर चळवळ करावी. शाळेचा अभ्यास सांभाळून अशा अनेक गोष्टी करता येतील.'' मुकुंदराव म्हणाले.

''विद्यार्थी-संघाची प्राणभूत कल्पना काय?''

''विद्यार्थी तेवढे एक ही भावना जागृत करणं. आज जातीयवाद धुडगूस घालीत आहेत. महान भारताचं हसं होत आहे. ब्राह्मण-ब्राह्मणेतर, स्पृश्यास्पृश्य, हिंदु-मुसलमान असे तुकडे पडले आहेत. हे तुकडे कोणी सांधावयाचे? नवभारत निर्मिणार्‍या तरुणांनी तरी अखंड भारत डोळयांसमोर ठेवावा. या हिंदमातेनं सर्वांना जवळ लोटलं. प्राचीन काळापासून शेकडो जातिजमाती आल्या. या हिंदी महासागरात त्या लाटा मिसळल्या, मुसलमान आमचेच आहेत. आमच्याच या देशातील. लाखो खेडयांतून ते गुण्यागोविंदानं नांदत आहेत. तेथे आपण का द्वेष फैलावयाचा? आज लहान मुलांची मनं द्वेषानं भरली जात आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी उठावं, एक गर्जना करावी. या पुढार्‍यांस सांगावं, 'तुमची भांडणं तुमच्याबरोबर राहोत. आम्ही नवभारताचे भाग्यविधाते नवीन भव्य, दिव्य दृष्टी घेऊन सर्वांना एकत्र नांदण्याचा प्राचीन महान प्रयोग डोळयांसमोर ठेवून भारताचं ते देवदत्त ध्येय पूर्ण करणार; त्यासाठी हा भारत जगला आहे, उरला आहे.' सर्व धर्मांचे, सर्व संस्कृतींचे लोक मी कसे सहकार्यानं, प्रेमानं एकत्र नांदवते पाहा; पाहा कसा ऐक्याचा गोफ विणीत आहेत माझी लेकरं; पाहा कसं विविधतेतून संगीत निर्मित आहेत; पाहा शतरंगांचा, शतगंधांचा बगीचा कसा फुलवीत आहेत;  पहा शतरंगांचा गालिचा कसा विणीत आहेत,' असं हिंदमाता जगाला सांगेल. जगातील राष्ट्रं या मातेजवळ येऊन धडे शिकतील; पुन्हा भारत जगद्गुरू होईल. '४०/४० कोटी भिन्न भिन्न लोक एकत्र नांदवण्याचा महान प्रयोग भारतमाते, कसा ग केलास सांग', असं भांडून भांडून दमलेली राष्ट्रं येऊन विचारतील. ही माता जगाची अन्नदात्री आहेच. ज्ञानदात्री व प्रेमदात्रीही ती होईल. विद्यार्थ्यांनी हे ध्येय डोळयांसमोर ठेवावं, ही प्राणभूत कल्पना. निदान माझ्या अंतरंगातील विद्यार्थीसंघाची ही प्राणभूत कल्पना. आनंदमूर्ती, तुम्ही हा संदेश घेऊन जा, माझे विचार तुमच्या ओठांतून अधिक गोड होऊन बाहेर पडतील. तुम्ही माझी वेणू, तुम्ही माझी मुरली. माझ्या जीवनातील विचार व भावना सर्वत्र पसरविणारे पावन पावन बना. माझ्या सत्कल्पनांचा पाऊस सर्वत्र पाडणारे तुम्ही गंभीर ओतप्रोत भरलेले मेघ बना, जा. तुमच्या तोंडावरचं गोड हास्य भारतमातेला हसवो; भारताच्या नवीन पिढीस प्रेमधर्म शिकवो; त्यागधर्म, संयमधर्म शिकवो; भारताचा ध्येयधर्म शिकवो.'' मुकुंदराव थांबले.

ऐकता ऐकता आनंदमूर्तींचा बाहेरचा चरखा थांबला. हृदयाचा चरखा सुरू झाला. डोळयांतून पाणी गळू लागले. ते डोळे मिटून समोर बसले. जणू काय अंतर्बाह्य पोकळ होऊन मुकुंदरावांचे विचारवारे स्वतःच्या जीवनात भरून घेत होते. त्यांची समाधी लागली होती.

मुकुंदरावांनी समोर पाहिले. तो तो अद्भुत देखावा. जणू हिमालयावरचा शिवशंकरच पाझरत आहे. ती पावन समाधी त्यांना भंगवेना. तेही समरस होऊन शांत बसले. आनंदमूर्तींनी डोळे उघडले. शांत प्रेमाने ते समोर पाहत होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel