ऐसे भाग्य कधी लाहता होईन ।अवघे देखे जन ब्रह्मरूप ॥
मग तया सुखा अंत नाही पार । आनंदे सागर हेलावती ॥
हे चरण ते म्हणत होते. सर्व चराचराच मांगल्य अनुभवण्याची तळमळ त्या उद्गारात प्रकट होत होती. मुकुंदरावांच्या आवाजातून प्रतीत होत होती.
दार उघडून ते कोण दोन आले आहेत? असे चोरासारखे का उभे आहेत? असे काय त्यांचे डोळे? हातांत काय आहे त्यांच्या ते? मारेकरी का आहेत? मुकुंदवांवर मारेकरी? प्रेमावर मारेकरी?
एका अभंगातून मुकुंदराव दुसर्या अभंगात गेले. दुसरा गोड चरण आठवला त्यांना!
तुझी करीन भावना । पदोपदी नारायणा ॥
आपण बसू एके ठायी । तुझे पाय माझे डोई ॥
निरनिराळया अभंगांतील निरनिराळे चरण !परंतु एका भावनेचे, त्यांच्या आवडीचे; ते म्हणत होते. डोलत होते.
दोघे एकदम पुढे घुसले. त्यांनी मुकुंदरावांना पाडले. एकजण छातीवर बसला. एकाने तोंड धरून ठेवले. मुकुंदरावांनी प्रेमळपणे पाहिले. किती वेळ ते एकमेकांकडे पाहत होते. शेवटी मुकुंदरावांच्या डोळयांतील प्रेमशक्तीने छातीवरचा तरुण विरघळला. तोंड धरणाराही विरघळला नि ते दोघे दूर झाले.
''मला मारायचं आहे? त्यानं जगाचं कल्याण होणार असेल तर खुशाल मारा; कचरू नका. माझ्या देहाचं मडकं कृतार्थ होईल.'' मुकुंदराव शांतपणे म्हणाले.
''आम्ही, अजून पुरे पशू नाही झालो. काय करावं? अजून आम्ही हिंदूच आहोत.'' एक तरुण म्हणाला.
''म्हणजे काय?'' मुकुंदरावांनी विचारले.
''आम्हाला बिनदिक्कत सुरा भोसकता आला पाहिजे. लाठी मारता आली पाहिजे. एरव्ही हिंदूंची संघटना होणार नाही. मुसलमान शिरजोर झाले. हिंदूही बलवान झाले पाहिजेत.'' दुसरा तरुण म्हणाला.
''परंतु तुम्हाला तर पशू व्हावयाचं आहे. तुम्हांला पशूंची संघटना करावयाची आहे का हिंदूंची? अजून तुम्ही हिंदू आहात. हे हिंदुत्व तुम्हांला विसरावयाचं आहे होय? आपले सद्गुण सर्व गमवावयाचे आहेत का?'' मुकुंदरावांनी विचारले.
''मुसलमानांची आम्हाला चीड येते. आमच्या बायका पळवतात, त्यांची अब्रू घेतात.'' एक तरुण म्हणाला.