''माझ्या खोलीत येता? कोरडे धोतर नेसा, कोरडा शर्ट घाला.''
''तुम्ही तर पायजमा घालता. तुमच्याजवळ आहे का धोतर?''
''हो.''
''आहे का माझ्या अंगाचा सदरा?''
''जुना आहे. होईल बघा.''
''चला मग आधी तुमच्या खोलीत.''
आनंदमूर्तींनी घोडा पुन्हा दौडविला. बरीच रात्र झाली होती. त्यांच्या खोलीकडच्या रस्त्यावर कोणी चिटपाखरूही नव्हते. पावसातून कोण बाहेर पडणार? कोणाला आहे मुसळधार पावसाचे वेडे प्रेम?
खोली उघडण्यात आली. मेणबत्ती लावण्यात आली.
''तुम्ही मेणबत्ती वापरता वाटतं?''
''हो; मेणबत्ती माझं ध्येय. मेणबत्ती लहान असली तरी स्वतः जळून वितळून जगाला थोडा का होईना प्रकाश देते.'' हे घ्या धोतर.
''आणि सदरा?''
''तो बराच जुना आहे. पुष्कळ वर्षांपूर्वीचा. पाहा झाला तर; हा घ्या.'' मुकुंदराव धोतर नेसले. त्यांनी तो सदरा हातात घेतला.
''याचा रंग गेला वाटतं?''
''हो. एके काळी मी संन्याशासारखी भगवी वस्त्रं वापरीत असे. परंतु पुढे सोडली. संन्याशाच्या वृत्तीचं स्मरण राहावं म्हणून ती आठवण मी ठेवली आहे.'' आनंदमूर्ती म्हणाले.
''सदरा ठीक झाला.''
''जरा घट्ट होतो, नाही?''
''असू दे. रात्रभर तर घालायचा.''
''तुम्ही नेसा ना कोरडं काही.''
''तुम्ही जरा बाहेर छत्री घेऊन घोडयाजवळ उभे राहा. मी तोवर घालतो कपडे.''