मायेने प्रद्योतच्या पाठीवर हात ठेवला. तो जणू अगतिक होऊन गेला होता. तिच्या खांद्यावर मान ठेवून तो रडू लागला. तिने त्याला आरामखुर्चीत बसविले. थोडया वेळाने भावना शांत झाल्या. प्रद्योत उठला व निघाला.

''कोठे जातोस भाऊ?'' मायेने विचारले.

''माया, तुझ्या पाया पडू दे. मला क्षमा कर. मी जातो व हे जीवन गंगेला अर्पण करतो.'' तो म्हणाला.

''प्रद्योत, भाऊ झालास तो का मरण्यासाठी? भावाचा आनंद मला दे. पश्चात्ताप झाला की पुनर्जन्मच तो. हे शरीर फेकण्याची काही जरून नाही. मन निराळं झालं की सारं निराळं. अक्षयबाबूंना आधार दे, आनंद दे. त्यांना किती दुःखं होतं ! त्यांचं तुझ्यावर किती प्रेम? खरं ना? तुझा पत्ता नाही म्हणून ते रडत बसतात. जा त्यांना शांतव. घरी जा. भाऊबीजेला बहिणीकडे येत जा. वेडे-वेडे मनात नको आणू.'' माया त्याला प्रेमाने म्हणाली.

''मी हे तोंड बाबांना कसे दाखवू?'' तो म्हणाला.

''मी तुझ्याबरोबर आले असते. परंतु येथे हे खटल्याचं काम आहे. कसं करू?'' ती म्हणाली.

''माया, तुझ्या पतीला सोडवीत तेव्हाच आता घरी जाईन. हीच माझी प्रतिज्ञा. तुझे अश्रू थांबवीन तेव्हाच माझ्या पित्याचे अश्रू मी पुसू शकेन, ताई, जातो मी.'' तो म्हणाला.

''कोठे जातोस? येथेच राहा. जेव, ताईच्या हातचं जेव.'' माया म्हणाली.

''मला माझ्या खोलीत गेलं पाहिजे. ताई तुझा पती तुला आणून देईन. मग तुझ्या हातचं जेवीन. जाऊ दे मला.''

प्रद्योत निघाला. पुन्हा त्याचे डोळे भरून आले. तो बाहेर पडला. तो तेथे कोण ते काळे लोक? पोलीस उभे होते. शिट्टी झाली. माया एकदम बाहेर आली.

''तुम्हाला अटक आहे.'' अधिकारी म्हणाला.

''ठीक.'' प्रद्योत म्हणाला.

''त्यांना अटक, आता माझ्या प्रद्योत भाईलाही अटक?'' माया म्हणाली.

''ताई, सारं मंगल होईल. आता धीर धर.'' तो म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel