''मोहन, कसं वाटतं?'' मुकुंदरावांनी विचारले.

''छान वाटतं. उद्या अगदी छान उजाडणार आहे. बरा झालो आता मी. तुम्ही जा. कामगारांना धीर द्या. सभा असेल, मिरवणूक असेल, जा. त्यांना शांत राखा. म्हणावं, मोहननं शांत राहायला सांगितलं आहे.'' तो थांबत, खोल आवाजात बोलला.

मुकुंदराव निघून गेले. शांता जवळ बसली होती. पाळण्यात क्रांती रडू लागली. आंदळून राहिना. शांतेनं प्यायला घेतले तरी राहिना. ''त्रास देते चांडाळीण !'' शांता रागाने बोलली व तिने पाळण्यात त्या लहान लेकरास टाकले. मोहन डोळे उघडून पाहात होता.

''शांता, क्रांती जरा रडली तर तू अशांत होतेस. कामगारांनी कशी ग शांती धरावी? क्रांतीला प्रेमानं व शांतीनं वाढव. तरच ती वाढेल. तिला शिव्या द्यायच्या होत्या तर पोटात वाढवलंस कशाला?'' तो म्हणाला.

पुन्हा काही वेळ गेला व म्हणाला, ''जगेन तर पोरांचं लेंढार लागेल शांतीच्या मागं. नको ती भानगड. एका क्रांतीला नाही सांभाळता येत. आणखी चार झाली तर पाहायलाच नको. म्हणून मी आपला जातो. देवाकडे जातो हो शांते. गरिबांना फार मुलं नकोत. ती बघ कामगारांची मुलं मरतायेत. कोठून देतील खायला? कोठून देतील प्यायला? कोठला दवा? कोठली हवा? कोठली कला? काही नाही.''

''माझी शपथ आहे मोहन तुला. शांत राहा पडून.'' शांता म्हणाली.

''मला प्रेमानं 'तू' म्हटलंस. आता ऐकतो हं. शांत राहतो. शांतेचा मोहन शांत राहिला. शांते, माझ्या हातात दे ग पाळण्याची दोरी. मरता मरता क्रांतीला गाणं गाऊ दे. क्रांतीला आंदळू दे. दे दोरी हातात. मी तुझं ऐकतो. तू का नाही माझं ऐकत? माझ्यावर प्रेम नाही तुझं?'' त्याने हात पुढे केले.

शांतेने पाळण्याची दोरी पतीच्या हाती दिली.

''मुकं आंदुळणं मला नाही आवडत !'' तो म्हणाला.
''मग गाणं म्हणा.'' ती म्हणाली.

''म्हणू गाणं? जुनी गाणी नकोत. नवीन म्हणतो. माझ्या प्राणांचं गाणं म्हणतो. हळूहळू एकेक कडवं म्हणेन. मी थांबत थांबत म्हणेन हो.'' मोहन हसून म्हणाला.

शांता पतीच्या अंगावर हात ठेवून बसली होती. गीता जवळच पायाशी होती. मोहन गाणे म्हणू लागला, क्रांतीचा पाळणा म्हणू लागला,

जो जो जो जो रे । जो जो जो जो रे
हे बाळा, पुंजिपतीच्या काळा ॥ जो.॥

क्रांती तू लहान, किति सान, होशिल परि तू महान.
विश्व व्यापशील हे सारे, सुटतिल सुखमय वारे ॥ जो.॥

संप किसानांचे, मजुरांचे, खेळ तुझे हे साचे
खेळत जा बाळ, हे खेळ, वाढव नीट स्वबळ ॥ जो.॥

खेळ स्वच्छंदे, आनंदे, लाल तिरंगी झेंडे
घेऊन बिज हाती, तू ऊठ, थांबव निजजनलूट ॥ जो.॥

बलिदानामधुन वाढशिल, लाठी गोळी खाशील
मरशिल तू न परि, जगशील, विश्वविजयी होशील. ॥जो.॥


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel