''दयाराम, माझ्या खोलीत व तेथे कपाटात एका सुंदर रुमालात एक शाल गुंडाळलेली आहे ती घेऊन ये.'' मुकुंदराव हळूच म्हणाले.
दयाराम गेला. तेथे आता कोणी नव्हते. मीना पलंगावरून उठू बघत होती. तिला उठवत नव्हते. शक्ती नव्हती. परंतु सारी शक्ती ती एकत्र करू पाहात होती. खाटेचा आवाज कुरकुर होत होता. मुकुंदराव एकदम चमकले. ते एकदम कुशीवर वळले व ''मीना, उठू नको. पडशील. येथे कोणी नाही.'' ते म्हणाले. ''कोणी नाही? तुम्ही आहात ना? कोणी नाही म्हणूनच उठू दे. तुम्हाला मिठी मारून मरू दे, तुमच्या पायी कुडी पडू दे. मी येणार भेटायला. तुमची मिनी या नात्यानं तुम्हाला उठते भेटायला. ही पाहा उठले. आले.'' असे म्हणून बावरलेली मीना खरेच उठू लागली.
''मीना, माझं नाही ऐकावयाचं?'' मुकुंदरावांनी विचारले.
''तुमचं नाही ऐकावयाचं तर कोणाचं?'' ती म्हणाली.
''मग पडून राहा. उठू नको. तू का माझ्या जीवनात नाहीस? तू दिलेली शाल, दिलेली नाही तरी मी तुझी खूण म्हणून पळविलेली शाल, माझ्याजवळ आज इतकी वर्षं झाली तरी आहे. नीज, पडून राहा, थोडी कळ सोस. हे देहाचे पडदे गळून पडतील व आत्मे कायमचे भेटतील. देहांचा आंतरपाट धरून मृत्यू मंगलाष्टकं म्हणेल व अंतरपाट पटकन टाळी वाजवून दूर करून तुझ्या-माझ्या आत्म्याचं चिर लग्न लावील. मीना, पडून राहा.'' मुकुंदराव म्हणाले.
''परंतु माझ्याकडचे तोंड तिकडे नका पुन्हा वळवू. तुम्हाला माझ्याकडे नसेल बघायचं तर तुम्ही डोळे मिटून पडून राहा. मी तुम्हाला पाहत राहीन. तुम्हाला बघत बघत जीवनात साठवीत मीना डोळे मिटील. मीनेचं मीनत्व मरेल व मीना म्हणजे तुम्हीच व्हाल.'' ती म्हणाली.
दोघे शांत होती, दयाराम शाल घेऊन आला.
''दयाराम, ही शाल माझ्या अंगावर घाल. ही शाल माझं प्रेतवस्त्र होऊ दे.'' मुकुंदराव म्हणाले.
दयारामने ती शाल त्यांच्या अंगावर घातली.
''किती सुंदर दिसता तुम्ही !'' मीना म्हणाली.
''तो परमेश्वर किती सुंदर असेल.'' मुकुंदराव म्हणाले.
''माझे परमेश्वर तुम्ही. मीना लहान आहे. तिला लहान देव पुरे. साडेतीन हात देहातील देव पुरे. तुम्ही मोठे आहात. तुम्हाला विश्वंभर पाहिजे. तुम्हाला तो डोळे उघडे ठेवून दिसणार नाही. डोळे मिटून त्याला पाहावं लागेल. परंतु माझा देव मला उघडया डोळयांनी दिसतो. गोड-गोड देव.'' मीना म्हणाली.
''मुकुंदराव, मीनाबाई, तुम्ही बोलू नका, थकवा येईल.'' दयाराम म्हणाला.
''वेळ तर थोडा आहे. बोलून घेऊ दे. सार्या आयुष्यातील, शेवटच्या क्षणी बोलून घेऊ दे. आता थकवा नाही. उलट अपार उत्साह वाटतो आहे.''
''मिने, मी येथे आहे हे तुला कसं कळलं?'' मुकुंदरावांनी विचारले.