तुम्ही तरुण मुलें. तुम्ही विचार करा. आसपासचें जग सुधारूं, सर्वत्र सुख पिकवूं, असें म्हणा. जगांत कोणते प्रयोग होत आहेत? कोणते नवीन विचार येत आहेत? समाजवाद काय? गांधीवाद काय? दोहोंचा अधिक संयोग करतां येईल का? कीं कसे प्रश्न सोडवावे, सहकार्यानें एकत्र शेतीचे प्रयोग करावे, गोपालन शास्त्रीय करावें, किती प्रश्न! या पद्मालयाच्याजवळ जर मधुसंवर्धन विद्येचे प्रयोग झाले तर? शास्त्रीय रीतीनें माशा पाळणें कोणीं शिकून यावें. पसरवावी विद्या. अरे आज तुम्ही दूध पिणार! आहे कोठें दूध? या देशांत दुधाचे सागर होते. चाळीस चाळीस शेर दूध देणा-या गाई होत्या. समुद्रासारख्या भरलेल्या त्यांच्या कांसा. परंतु आज गाई कसायाकडे जात आहेत. तुम्ही शास्त्रीय ज्ञान आणा. गाई सुधारा. दूधदुभतें भरपूर करा. लोक बलवान् होतील.
सारा देश मरणोन्मुख झाला आहे. तुम्हीं तरुणांनी एकेक ध्येय घेऊन उठावें. जीवन एकेका गोष्टीला द्यावें. कोणी खादीचें काम शिकून या; कोणी सहकारी चळवळीचा अभ्यास करून या; कोणी हरिजनसेवेस जीवन द्या; कोणी शेतक-यांची सावकारांपासून मान वांचवण्यासाठीं उभे रहा; कोणी मधुविद्या शिकून या; नाना उद्योग, नाना हालचाली. कोणी डॉक्टर होऊन या. रोग नष्ट करा. स्वच्छता आणा. गोपालन शिकून या. जोगे व्हा. राष्ट्राच्या गरजा समजून घ्या. त्या दूर करण्यासाठीं जीवनाचा उपयोग करण्याचें ठरवा.
आपलीं जीवनें वायां दवडायला आज अवसर नाहीं. प्रत्येकाच्या श्रमाची जरूरी आहे. प्रत्येकाच्या सेवेची जरूरी आहे. ज्या राष्ट्रांतील प्रत्येक व्यक्ति आपल्या जीवनाचा कसून उपयोग राष्ट्राच्या कामासाठीं करीत असते, त्या राष्ट्राचा विकास होतो. तीं राष्ट्रें जागीं समजावीं. जिवंत समजावीं. बाकीचीं मृत, हतपतित, निद्रित समजावीं. आयुष्याचा एक क्षणहि व्यर्थ दवडण्याचा आपणांस हक्क नाहीं. घेतलेल्या श्वासोच्छवासाचा, प्यालेल्या पोटभर पाण्याचा, खाल्लेल्या अन्नाचा, मिळविलेल्या प्रेमाचा, सर्वांचा हिशेब द्या. काय केलेंत सांगा. ज्याला स्वत:ला मनुष्य म्हणवून घ्यायचें आहे त्यानें भूभार होऊन राहतां कामा नये. त्यानें निष्फळ व निरर्थक जीवन कंठितां कामा नये.
तुम्ही जागे व्हा. जग जागें होत आहे. कामगार जागे होत आहेत. शेतकरी जागे होत आहेत. तुम्ही पांठरपेशे जागे न व्हाल, महान् प्रश्नांना हात न घालाल, विराट् श्रमजीवी जनतेशीं एकरूप न व्हाल तर मराल. सारीं बांडगुळें अत:पर काटलीं जातील, छाटलीं जातील. जगाच्या प्रगतीचा गाडा आजवर त्यांनीं अडवला. कोट्यावधि बहुजनसमाजाच्या विकासाचा मार्ग त्यांनीं अडवला. परंतु हा जगन्नाथाचा रथ आतां धडधडत आल्याशिवाय राहत नाहीं. स्वत:ची प्रगति करून घेतल्याशिवाय राहत नाहीं. तुम्हीही त्या रथाला ओढायला लागा. अडवाल, मार्गात पडून रहाल, तर तुमचा चुरा उडेल. ध्यानांत धरा. जागे व्हा.” असें सांगून दयाराम भारती एकदम एक गाणें म्हणूं लागले. सहजस्फूर्त गाणें. हृदयाच्या एकतानतेंतून, उचंबळलेल्या भावनांतून बाहेर पडलेलें गाणें!