“जने, सोनजी कोठें आहे? आणि तुला काय होतें?” जगन्नाथनें विचारलें.
“काय करूं भाऊ, ताप येतो रोज. किती दिवस झाले. आणि रातदिन अक्षै कपाळ दुखते बघा. ते येथेंच होते इतका वेळ. कोठेंतरी उठून गेले.” ती म्हणाली.
मग तो सोनजीच असेल. विहिरीवर कां उभा? चला आपण हळूच जाऊं.” गुणा म्हणाला.
ते हळूहळू न बोलतां जात होते. परंतु सोनजीच घराकडे, झोंपडीकडे येत होता. त्याला हीं मुलें पाहून आश्चर्य वाटलें.
“काय रे सोनजी, इतक्या रात्रीं त्या विहिरीवर कां उभा होतास? काय पहात होतास?”
“पहात होतों तिच्यांत मला जागा मिळेल का?”
“का जीव देणार होतास?”
“असा आला विचार. कधीं येत नाहीं. आला. परंतु फिरलों मागें. मुलें आहेत तीं काय करतील? आणि ती आजारी; उद्यां काय वाटेल तिला?”
“सोनजी, जनी तुला सारखी हांक मारीत आहे. तिच्याजवळ बसायचें सोडून हें काहींतरीच काय मनांत आणलेंस?”
“तिच्याजवळ बसून काय करूं? मुंडकें का कपाळावर बांधूं? फार कपाळदुखी बघा. आणि आज तापहि हद्दीपलीकडे आला आहे. काय करूं मी? माझ्या का हातांत औषध आहे? ठेवला कपाळावर हात कीं झालें बरें. तो वैद्य म्हणे, रोज गाईचें दूध जेत जा. त्याला सांगायला काय? कोठून रोज दूध द्यायचें? तुमच्याजवळ मागायलाहि जीव भितो. मागें केव्हां एकदां जनीनें मागितलें तर तुमचे दादा एकदम अंगावर आले व म्हणाले, ‘तुम्हांला ग कशाला दुधें?’ खरेंच आम्हांला कशाला? परंतु देव हीं दुखणीं तरी आम्हांकडे कां पाठवतो? श्रीमंतांना द्यावीं त्यानें दुखणीं. त्यांना आराम असतो. काम थोडेंच असतें? जनीच्या अंगात ताप होता तरी त्या दिवशीं पावसांत तिला काम करावे लागलें. कसा हटणार ताप? श्रीमंत मनुष्य गादीवर पडून राहील. औषधें घेईल. दूध पिईल. मोसंबी खाईल. त्याला का कांहीं कमी आहे? डॉक्टर येईल. रोज सुई टोंचील. परंतु हीं दुखणीं आमच्या झोंपडींतहि देव पाठवतो. जीव जिकिरीला येतो हो दादांनो! काय तुम्हांला सांगूं? मनांत आज दुष्ट विचार आले. वाटे कीं, मुलांनाच एकेकाला आधीं फेकावें विहिरींत, मग हिचें गांठोडें फेंकावें व मग शेवटीं स्वत: घ्यावी उडी. परंतु मुलाला हात लावला, आणि विचार बदलला. हातानें त्याला थोपटलें, पांघरूण घातलें. शेवटीं मीच उठलों. आलों येथें. परंतु धैर्य नाहीं झालें. वाटलें, पोरे उद्यां कोणाच्या तोंडाकडे बघतील, कोणाजवळ भाकर मागतील? पाणी आलें डोळ्यांत. परत फिरलों शेवटीं. काय सांगायचें नि कसें करायचें. गरिबांची दैना आहे.”