परंतु दयारामांचा हा प्रचार सरकारला सहन होईना. त्यांना अटक करून एकदम जळगांवला नेण्यांत आलें. या बातमींने खानदेशभर सर्वत्र हरताळ पडला. आणि एरंडोलच्या विद्यार्थ्यांनींहि हरताळ पाडला. जगन्नाथ, गुणा, बन्सी, बाबू, वगैरे मुलांनीं खूप प्रचार केला. शाळेंतून सारीं मुलें बाहेर पडलीं व “साम्राज्यशाही नष्ट होवो, दयाराम भारती झिन्दाबाद, किसान झिन्दाबाद,” वगैरे गर्जना करीत तीं मुलें गांवभर हिंडलीं. मामलेदार कचेरीजवळ सरकारचा तायंनीं धिक्कार केला. दर रविवारीं खेड्यापाड्यातून आपण टोळ्या करून गाणीं गात हिंडावयाचें असा त्यांनीं ठराव केला.
इंग्रजी शाळेंत कांहीं मुलांना दंड होणार असें वाटत होतें. परंतु प्रकरण तेवढ्यावरच थांबलें. जगन्नाथच्या घरीं मात्र वादळ झालें.
“जगन्नाथ, तूं कशाला या फंदांत पडलास! मामलेगार कचेरीसमोर तूं मोठमोठ्यानें ओरडत होतास. मामलेदारसाहेबांनीं मला मुद्दाम घरीं बोलावून सांगितलें. अरे आपलें रोज उठून सरकारांत काम, अशानें कसें होईल?” दादा म्हणाला.
“कसें होईल तें तुमचें तुम्ही पहा. जाऊंच नका सरकारांत. शेतक-यांशीं तडजोडी करा. शेतक-यांचा छळ कमी होईल. तुम्हीहि सरकारासारखेच शेतक-यांचे दावेदार. दयाराम म्हणत तें खोटें नाहीं.”
“बाबा रे, तुझ्या पायीं आमचा सत्यानाश होईल. तूं आपला वेगळा नीघ. होशील आतां सज्ञान. करा मग वाटेल ती देशसेवा. घ्या आगींत उडी.”
दयारामांना हद्दपार करण्यांत आलें. त्यांनीं खानदेशांत पाऊल ठेवूं नये असा त्यांचेवर हुकूम बजावण्यांत आला. जगन्नाथ व गुणा यांना वाईट वाटलें. पुन्हां कधीं बरें भेटतील दयाराम? ते दुसरीकडे जातील. तेथें रान उठवतील. परंतु आपणांस केव्हां बरें पुन्हां त्यांचें दर्शन दोईल? असें मनांत येऊन दोघे मित्र दु:खी झाले.