दयाराम भारती गेले. त्यांची वाणी अद्याप सर्वत्र घुमत होती. त्यांच्या तेजस्वी शब्दांची सर्वांना सारखी आठवण येत होती. त्यांनीं शेतक-यांत चैतन्य निर्मिले. विद्यार्थ्यांत सेवाभाव निर्मिला. एकप्रकारचें राष्ट्रीय वातावरण त्यांनीं सर्वत्र निर्माण केलें. परंतु त्यांनीं लावलेल्या रोपट्याला पाणी कोण घालणार? सतत प्रचार हवा. संत ज्याप्रमाणें रामनाम सर्वत्र घोषविते झाले त्याप्रमाणें आपणहि नवकल्पनांचा सर्वत्र घोष करीत गेलें पाहिजे. सारें वातावरण दुमदुमलें पाहिजे.
हिंदुस्थानांत अद्याप प्रचार नाहीं. चीनमध्यें तरुणांच्या शेंकडों टोळ्या चीनभर फिरत होत्या. मेळे करीत फिरत होत्या. एक प्रकारच्या छोट्या छोट्या नाटक मंडळ्याच म्हणा ना. दिवसां मुलें अभ्यास करीत. रात्रीं बहुजनसमाजासमोर नाटकें करीत. निरनिराळीं नाटकें. निरनिराळे प्रसंग. भावी समाजरचनेचीं दर्शनें, शेतक-याची सद्य:स्थिति, जमीनदारांचे जुलूम, कारखान्यांतील कामगारांची दुर्दशा, स्त्रियांची स्थिति, जपानी साम्राज्यवाद्यांचे अत्याचार, नवजागृत चीनचें दर्शन, भविष्यकालीन समाज. सा-या गोष्टी जनतेसमोर ते दाखवीत. मधूनमधून गाणीं असत. नृत्यहि असे. याचा जनमनावर भयंकर परिणाम होई.
आपल्याकडे असे मेळे सर्वत्र फिरत राहिले पहिजेत. यात्रांतून, उत्सवांतून त्यांचे कार्यक्रम ठेवले पाहिजेत. खेड्यापाड्यांतून त्यांनीं गेलें पाहिजे. दिवसा मंडळीनें गांवसफाई करावी, गांवांतून मिरवणूक काढावी, गाणीं गावीं व खेळ करावे. रात्रीं नाट्यप्रवेश करावे. हिंदु-मुस्लिम ऐक्य, हरिजनसेवा, शेतक-यांची दुर्दशा, साक्षरता, स्वच्छता, कज्जेदलाली, स्त्रियांची स्थिति, परकीय सत्तेचे परिणाम. स्वराज्य म्हणजे का, खरा धर्म कशांत आहे, सहकार्य, असे अनेक विषय आहेत. अशा प्रश्नांवर प्रकाश पाडीत गांवोगांव गेलें पाहिजे. हे मेळे म्हणजे जणुं फिरतीं विचारमंदिरें. विचार पेरीत, विचार देत हे मेळे जातील. त्यांना काहीं कमी पडणार नाहीं. तमाशे बोलावून लेत देतात कीं नाहीं त्यांना पैसे? तसे या मेळ्यांनाहि देतील. करमणूक हेईल. त्याबरोबर विचारप्रसारहि होईल. जिल्ह्याजिल्ह्याला असे राष्ट्रीय मेळे पाहिजेत. असा सारखा प्रचार झाला तर वातावरण किती झपाट्यानें तयार होईल पहा.
एके दिवशीं गुणा व जगन्नाथ यांच्या मनांत ही कल्पना आली. उन्हाळ्याची सुटी येणार होती. सुटींत काय करायचें याची ते चर्चा करीत होते. गाणीं गात खेड्यापाड्य़ांतून हिंडावें असें त्यांना वाटत होतें. परंतु त्यापेक्षां मेळ्यांचा कार्यक्रम सुंदर होईल असें त्यांना वाटलें. इतरहि कांहीं मित्र यावयास तयार होते. एके दिवशीं सारे मित्र अंजनीच्या वाळवंटांत बसले होते. मनोरथ रचीत होते.
“पडदे हवेत ना पण?” गुणाने शंका काढली.