स्वयंसेवक : हे शेंदरी शनि आतां भिरकावून द्या. शनीसमोर दिडकी टाकायला नको. दिडकी कोठे टाकायचीच असेल तर तुमची कष्टदशा जावी म्हणून खटपट करणा-या काँग्रेसला द्या. काँग्रेस आपले दैवत. गरिबांचे राज्य करूं पाहणारी ही संस्था. तिच्या पाठीमागें चला. तिचा महिमा वाढवा.
असे हे संवाद मोठे उद्बोधक झाले. मधूनमधून गाणी होती. मुले रंगू लागली. केव्हा एकदा शेतक-याच्या दुर्दशेची, चरखा अन्न देत आहे, त्या चरख्याला शेतकरी कसा जीव की प्राण करतो त्यांची, उपाशी मुले आहेत त्यांची, हरिजनांना पाणीहि मिळत नाही, मंदिरात कुत्रे बसले आहे परंतु हरिजनांस मज्जाव, अशा प्रसंगांची ती चित्रे होती. पडदे पाहूनच जणु मनाला मुकेपणाने विचार मिळावे, जागृति मिळावी.
सारी तयारी झाली. आणि लौकरच एके ठिकाणी यात्रा होती. हा मेळा तेथे न्यावयाचा असे ठरले. मुले गेली. त्यांनी खोके वगैरे घेऊन तात्पुरते स्टेज तयार केले. लहान खांब व बांबू उभारून पडदे पटकन् बांधले. तयारी झाली. रात्रीं ते नाट्यप्रवेश होते. जाहिराती वाटण्यांत आल्या होत्या. गाणीं म्हणत यात्रेतून दवंडी देण्यात आली. लोक रात्र केव्हा होते त्याची वाट पहात होते. सायंकाळ झाली. दिवस मावळला. यात्रेत शेकडो गॅसच्या बत्त्या चमकल्या आणि त्या मेळ्याचाहि तिरंगा झेंडा त्या प्रकाशात उंच फडकताना दिसत होता. तेथे गर्दी जमू लागली. काही मुले व्यवस्था ठेवीत होती. एकीकडे बायकांनी बसावे अशी व्यवस्था होता. आणि पहिला पोवाडा सुरू झाला. शेतक-याच्या दशेचे वर्णन करणारा पोवाडा. आवाज ऐकून भराभर गर्दी जमू लागली. सारे प्रवह इकडे येऊ लागले.
पोवाडा संपला व प्रवेश सुरू झाले. निरनिराळे नाट्यप्रवेश. साक्षरतेचे प्रवेश. शेतक-याच्या प्रश्नांवरचे प्रवेश, हरिजनांसंबंधींचे प्रवेश, असे करून दाखविण्यांत आले. मधूमधून लोक टाळ्या वाजवीत. “बरोबर, भाऊ बरोबर. आणि हाऊ सावकारच शनी शे.” असे बाया एकदम बोलत. हरिजनांची स्थिति पाहून, त्या आजारी मुलाला पाणी मुळत नाही हे पाहून स्त्रियांना हुंदके येत आहेत पहा. त्या अरेरे म्हणत आहेत. आणि जगन्नाथ गाणे म्हणतो आहे ते ऐका—
“हरिजन अपुले तळमळती
जेविं जळविण मासे मरती
हरिजन तैसे तडफडती ।।हरिजन.।।
पाणि न देणे
प्रेम न देणे
धर्म अशाला हे म्हणती ।।हरिजन.।।
बंधुभाव ना तिळभर उरला
काय म्हणेल प्रभु वरती ।।हरिजन.।।
प्रेम करा रे बंधूवरती
हीच तुम्हाला मम विनंती ।।हरिजन.।।