“हो प्रेमाची बॅटरी. वाटेल तेव्हा तिचा प्रकाश पाडता येतो. डोळे न दिपवणारा, गोड गोड प्रकाश.”
आईसाठी जगन्नाथ दोन घास खाऊन आला. तो वर आला. गुणासमोर बसला. गुणाला आवडणारे गाणे त्याने म्हटले. अहाहा! किती मधुर मधुर आवाजात त्याने म्हटले. तो आवाज नव्हता. आवाजाचे रूप घेतलेले प्रेम होते, भावना होत्या. गाणे संपले. आणि गुणाचे पत्र जगन्नाथने हाती घेतले. ते अंधारात प्रेमप्रकाशांत त्याने वाचले. बोटांनी वाचले. ते पत्र हृदयाशी धरून तो अंथरुणावर पडला. स्वप्नसृष्टींत तो रमून गेला. स्वप्नातहि ते पत्र तो हृदयाशी धरीत होता.
सकाळ झाली. जगन्नाथ अंथरुणांतच होता. समोरच्या भिंतीवरचे गुणाचे फोटो पहात होता. परंतु एकदम त्याने तोंडावरून पांघरूण घेतले. तो दु:खी होता. गुणा, कोठे असेल माझा गुणा, असे स्वत:शीच बोलत होता.
आई हाक मारायला आली.
“ऊठ, जगन्नाथ.”
त्याने तोंडावरून पांघरूण काढले नाही. गुणा, कोठे असेल गुणा, एवढेच शब्द पांघरूणांतून बाहेर येत होते.
“येईल हो गुणा. तुझे प्रेम त्याला आणील. उठ.” जगन्नाथ उठला. तो रडवेला झाला होता. तो आईला सद्गदित होऊन म्हणाला,
“आई, खरेच, कुठे ग असेल गुणा?”