सारी मंडळी वर आली. गुणाची आई आत गेली. मनोहरपंत बाहेक गेले होते. गुणा व रामराव दिवाणखान्यांत होते. इंदु आत बाहेर करीत होती.
“अहो आपण एक विसरलो.” ती म्हणाली.
“काय?”
“सारंगी आणायला विसरलो.”
“तुमची असेलना.”
“माझी वाजवाल?”
“हं. तीच वाजवीन. दुस-याची सारंगीहि वाजवतां आली पाहिजे. नाहीतर नेहमी अडायचे.”
“देऊं आणून?”
“दे.”
आणि इंदूने आपल्या खोलीतून नुकतीच विकत घेतलेली सारंगी आणिली. सुंदर दिसत होती.
“नवीनच आहे वाटते?”
“तुमच्या हातूनच तिचे उदघाटन करायचे ठरविले होते आम्ही.”
गुणाने सारंगी हातांत घेतली. तारा छेडल्या. इंदु नीट सावरून बसली. आणि गुणाने सूर आळविले. ते सूर आळविलेले एकूनच इंदु पाझरली. किती गोड, किती छान! ती म्हणे. गुणाने सूर आळवून एक राग सुरू केला. वाजवतां वाजवतां त्याची तन्मयता झाली. मनोहरपंत फिरून आले होते. तेहि शांतपणे येऊन बसले. संगीतसमाधि त्यांनी भंगिली नाही. संपला राग. क्षणभर कोणी बोलले नाही. इंदूची आईहि दारांत उभी होती.
“इंदु, तू त्यांना विश्रांति नाही दिलीस शेवटी. ते का कोठे पळून जाणार होते?”
“संगीत म्हणजेच विश्रांति.” गुणा म्हणाला.
“बाबा, माझ्या सारंगीचा उदघाटनविधि झाला.”
“आतां आज पुरे हो इंदु. संगीत विश्रींति देत असले तरी त्याने भावनाहि उत्कट होतात. त्याचाहि मागून शीण वाटतो, थकवा येतो.”
“बाबा, कसे छान वाजवतात नाही?”