“तुमच्या लोकांना मग वाईट वाटेल. की एक महाराष्ट्रीय येथे आला व पहिला आला.”
“महाराष्ट्रीयांना सोपे जाते म्हणून आला पहिला. त्यांत आश्चर्य कसले? उलट पहिले न आलेत तर मात्र आश्चर्य वाटेल. पहिले नाही आलेत तर हसतील हो तुम्हांला, मग मला वाईट वाटेल.”
“मी खटपट करीन.”
“आणि हा विडा आज घेतलात नाहीं? तसाचसा ठेवलात?”
“विसरून गेलो.”
“नको का उद्यापासून देऊ?”
“खरेच मी विसरलो हो.”
“तुम्हांला आवडतो म्हणालेत म्हणून देते. मी नाही कधी खात. मी एक लवंग खाते.”
जगन्नाथने विडा खाल्ला. त्याचा चेहरा लालसर झाला होता. आणि आधीच लाल असलेले ओढ अधिकच लाल झाले.
“मी जाते. तुम्ही वाचा. पहिले या.”
जगन्नाथ वाची. हिंदी वाची. इतरहि पुस्तके वाची. आपणांस सर्व प्रकारचे ज्ञान हवे असे त्याला वाटू लागले. संगीताचाहि त्याचा अभ्यास सुरू होता.
“तुम्ही उजाडत फिरायला येत जाल? त्या टेकडीकडे आपण जात जाऊं पहाटे उठून.”
“जाऊ.”
आणि दोघे फिरायला जाऊ लागली. कावेरी पळत सुटे. जगन्नाथ मागे राही.
“तुम्हांला पळायला लाज वाटते वाटतं?” तिने विचारले.
“मला पळण्याची सवय नाही.” तो म्हणाला.