“तुझा विद्यार्थी म्हणून आलो.”
“आणि त्या मुली नव्हत्या का माझ्या विद्यार्थिनी?”
“परंतु मी प्रेमाचा विद्यार्थी. जणुं तू आपली सारी विद्या माझ्यांत ओतलीस. माझ्या बोटांतून जणुं तू लिहीत होतीस.”
“बघू तुमची बोटे.”
“तुझ्याहून माझे हात गोरे आहेत.”
“आम्ही मद्रासी श्यामवर्णाला सुंदर म्हणतो. गौर वर्णाला नाही.”
“मग मी तुला आवडत नसेन?”
“आणि मी तुम्हांला आवडत नसेन?”
“प्रेम कशामुळे जडते? रंगानें? नाकाडोळ्यांनी? बुद्धीने? कशाने जडतें?”
“ते सांगता नाही हो येत जगन्नाथ.”
वर्तमानपत्रांत एके दिवशी एक बातमी आली. एका प्रसिद्ध मंदिरांत प्रवेश मिळावा म्हणून हरिजन सत्याग्रह करणार होते. शेकडो स्पृश्यहि त्या सत्याग्रहांत सामील होणार होते. स्पृश्य व अस्पृश्य जोडीजोडीने आंत जाणार होते. एक अस्पृश्य व त्याच्या बरोबर स्पृश्य. दोघांनी एकदम आंत घुसायचे.
“जगन्नाथ, तूं होतोस का स्वयंसेवक?”
“तू पण येतेस?”
“आपणांला अटक होईल.”
“एका तुरुंगांत आपण राहूं.”