“तू आता घरी जा.”
“मी तुझ्या खोलीत बसेन. तुझ्या फोटोची पूजा करीन. त्याला हृदयाशी धरून ठेवीन. तुझी तहान फोटोवर भागवीन. किती दिवस रे फोटोवर तहान भागवू? कांजी पिऊन का अमृताचे समाधान मिळते? जगन्नाथ लौकर ये व कावेरीला आपली कर.”
“तू आता जा.”
“का घालवतोस लौकर?”
“मला वाईट वाटते म्हणून.”
“मी तुझी वाट पहात आहे. ये हो लौकर.”
कावेरी निघून गेली. ती आतां घरी राही. तिला बरे वाटत नसे. तिची हरिजनशाळा बंद पडली. तिचा हिंदी वर्ग थांबला. ती अंथरुणावर पडून राही. पांघरुणात तो जगन्नाथचा फोटो हृदयाशी धरी व रडे.
पशुपतींना वाईट वाटे. मुलीला काय होतें त्यांना कळेना. मुलीच्या दु:खाने जणुं ते दु:खी झाले. आणइ तेहि आजारी पडले. पित्याच्या आजाराने कावेरीचे आजारपण पळाले. ती उठली. पित्याची सेवा करूं लागली.
“कावेरी, तुला बरे नाही. तू पडून रहा.”
“तुम्ही आधी बरे व्हा. माझे दुखणे का तुम्हीं घेतलेत?”
“एवढे कोठे माझे प्रेम थोर आहे, कावेरी!”
पशुपति बरे होण्याची चिन्हे दिसत ना. त्यांना न्युमोनिया झाला. कावेरी रात्रंदिवस त्यांच्याजवळ होती. डॉक्टर येत जात होते. परंतु एक दिवस पशुपतींचे प्राण निघून गेले.
अरेरे! ती संगीत शाळा ओस पडली. तो भयाण वाडा सुना सुना झाला. जेथे रात्रंदिवस संगीत चाले तेथे आता शोक भरून राहिला. एका क्षणांत केवढी उलटापालट. सृष्टींत असे प्रकार होतात. भयंकर उत्पात होतात. द-या आहेत तेथए पर्वत येतात. पर्वतांच्या जागी द-या होतात. वाळवंटांत समुद्र येतात व समुद्र आटून वाळवंटे शिल्लक राहतात. मानवी मनाचेहि असेच आहे. क्षणांत हास्य तर क्षणांत विलाप. क्षणांत पौर्णिमा तर क्षणांत अवस. मानवी जीवनाचे असेत आहे. बुडबुडे. सारे बुडबुडे. मनुष्य काल होता आणि आज नाही—अशी ही दुनिया आहे. दो दिन की दुनिया. परंतु मानवाची काय ऐट! किती अहंकार! किती कत्तली, मारामारी, लढाया! कशा बढाया, कशा दर्पोक्ति! किती वंचना व वल्गना! या विश्वाच्या पसा-यांच मानवजंतु म्हणजे एक हास्यास्पद वस्तु आहे झाले!