मनुष्य एखाद्या ध्येयाने वेडा झाला म्हणजे तो निराळा होतो. त्या ध्येयाच्या प्रकाशांत त्याचे सर्व व्यवहार मग सुरू होतात. त्याच्या जीवनांत हेतुमयता येते. त्या ध्येयसूर्याभोवती सा-या अंतर्बाह्य क्रिया प्रदक्षिणा घालू लागतात. गुणाचे असेच झाले. आपल्या वडिलांना सुखी करणे हाच त्याच्या मनांत एक विचार. देशबंधुदास त्याला आठवत. वडिलांनी दिवाळखोरीत नाव घातले. तरीहि पुढे सावकारांचे सर्व कर्ज सव्याज त्यांनी परत केले. आपण असेच करू. वॉरन हेस्टिंग्सची गोष्ट त्याला आठवे. वॉरन हेस्टिंग्सला सर्वांत मोठा आनंद वडिलोपार्जित घर त्याने परत घेतले त्या वेळेस झाला.

गुणा सायंकाळी इंदूकडे जाई. मनोहरपंतहि बसत. एखादे वेळेस मनोहरपंत बाहेर जात.

“मला नाही हो येणार गुणा सारंगी.” ती म्हणाली.

“न यायला काय झाले? मला गणित येत नव्हते. परंतु हल्ली मी त्यांत सर्व लक्ष घातले. मला भराभरा येऊ लागले. आपली सर्व शक्ती ओतली पाहिजे. दयाराम भारती सांगायचे की जे कराल त्यांत सर्वस्व ओता. हाती जे घ्याल त्याचे वेड लागू दे. ते फार संतापत. म्हणत, आपल्या देशांतील सारी कामे अर्धवट. काँग्रेसचे सभासद करण्याचे काम असले तर करतील दहावीस, बसतील घरी. खादी खपविण्याचे असो. जातील दोन घरी होतील निराश. साक्षरता प्रसाराचे असो. करतील उचल, मग म्हणतील पुरे. हरिजनसेवेचे असो. देतील एखादे व्याख्यान. एखाद्या गांधी सप्ताहांत झाडू मारतील. किसान-संघटना असो. असतील तिच्या दोन मरतुकड्या शाखा. सेवादले घ्या. असतील पांच दहा मुले. अशाने का राष्ट्रे तयार होतात? ते काम म्हणजे जीवन झाले पाहिजे. प्राणाला ज्याप्रमाणे श्वास, माशाला जसे पाणी, त्याप्रमाणे ते काम, ते ध्येय माणसाचे झाले पाहिजे. दयारामांचे ते शब्द मला फार आठवतात.”

“गुणा, तू कोणते काम डोळ्यांसमोर ठेवलें आहेस?”

“ठेवले आहे एक.”

“कोणते?”

“पुन्हा एरंडोलला जाण्याचे.”

“येथे का तुला आनंद नाही वाटत? दु:ख वाटते?”

“बाबांना सारखे एरंडोल आठवते.”

“आणि तुम्ही एरंडोलला गेलांत तर तुम्हां सर्वांची आम्हांला आठवण येईल.”

“आठवण येऊन रडूं येईल का?”

“ते काय सांगू गुणा?”

“बरे. वाजव आतां तूं.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel