इंदूला क्षयाची भावना आहे असे खरोखरच काही डॉक्टरांचे म्हणणे पडले. वेळीच कोठे तरी चांगल्या हवेवर जावे असे सांगण्यांत आले. मनोहरपंतांनी लोणावळ्याजवळ मळवली येथे जाण्याचे ठरविले. तेथे सारी व्यवस्था करण्यांत आली.
एके दिवशी मनोहरपंत रामरावांस म्हणाले—
“रामराव, तुम्ही या घरांतच येऊन रहा आता. आम्हांला मळवलीस बरेच दिवस रहावे लागेल. उगीच तिकडे भाडे कशाला भरतां? या घराचीहि व्यवस्था राहील. जणुं तुमचेंच घर. नाही म्हणूं नका.”
“तुमची इच्छा असेल तसे. तुमचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. खरेच.”
“उपकार नका म्हणूं. मी उपकार म्हणून कधी वागलो नाही. तुमच्या गुणाविषयी काही तरी वाटले. तुमच्या स्वाभिमानाविषयी कौतुक वाटले. उपकार म्हणून नाही हो. तुम्ही आभार मानूं नका. मनावर ओझे घालून घेऊं नका.”
“तुमच्यामुळे गुणाचें शिकणे झाले.”
“त्याच्या सारंगीमुळे झाले. त्याच्या गुणांमुळें झाले.”
“होईल आतां डॉक्टर.”
“घरचा डॉक्टर.”
इंदु व गुणा दोघांना वाईट वाटले.
“गुणा, तूं इकडे राहायला आलास म्हणजे माझ्या खोलीतच बसत उठत जा. येथेच अभ्यास कर, येथेच झोप. परंतु ही आजा-याची खाट. क्षयरोग्याची खाट. आणि क्षयरोग्याची खोली. नको, गुणा, नको, ही खोली मोकळीच राहूं दे. या खोलीला नवीन रंग दे हो. माझी ही एक उशी तुला ठेवूं? परंतु तू सुद्धां माझ्या श्वासाने दूषित झालेली. परंतु माझ्या डोळ्यांतील पाण्याने ते जंतु मरून नसतील गेले? काय म्हणते तुझें शास्त्र?”
“तूं का रडत असस?”
“हो.”
“का?”
“मला क्षय होईल, मी मरेन म्हणून.”
“वेडी आहेस तूं.”
“गुणा, मी मेल्ये तर तूं रडशील. तुला वाईट वाटेल म्हणून हो मला रडूं येई. मी एकटी असते, तुझी ओळख नसती झाली तर मरणाचें एवढे वाईट नसते वाटले. तुझ्यासाठी वाईट वाटते.”