“आमच्याकडे अशीच अगडबंब नावे असतात.”

“त्याचे नांव ‘प्रेमानंदम्’ असें ठेवूं.”

“जशी तुझी इच्छा.”

काही दिवसांनी कावेरी बाळाला घेऊन बि-हाडी आली. जगन्नाथा सारे करी. स्वयंपाक करी, अंथरूण घाली, धुणी धुवी. लहान मुलाची हगोली मुतोलीहि धुवी.

“जगन्नाथ, तूं सारें कसें हे करतोस ? तुला राग कसा येत नाही ?”

“मी प्रेमाच्या राज्यांत आहे. सारे सध्यां गोड आहे. कावेरी, तुम्ही बायका सारे काम करतां त्याचा अनुभव मी घेत आहे.”

परंतु स्त्रियांच्या प्रसीतिवेदनांचा नाही हो अनुभव घेता येणार. बाकी सर्व अनुभव घेऊं शकाल. परंतु त्या वेदना, त्या मोक्षाच्या वेदना, नवनिर्मितीच्या वेदना, तें भाग्य वा दुर्भाग्य स्त्रियांचेच आहे.”

“होय हो कावेरी.”

एके दिवशी रात्री पुन्हां जगन्नाथ व कावेरी यात्रेला निघाली. लहानगा प्रेमानंद हसत होता. एका गावात एक गोड गाणे जगन्नाथ म्हणत होता. माता प्रेमानंदाला घेऊन उभी होती. आजूबाजूच्या आयाबाया गाणे ऐकायला आल्या. ते तामीळ गाणें होते. त्याचा मराठी अर्थ केला तर पुढीलप्रमाणें होईल—

कुणि बाळ पाहिला का माझा, कुणि लाल पाहिला का माझा ।।
तिन्हि सांजा या जाल्या आल्या गाई अवघ्या गोठ्यांत
गेलि पांखरे घरट्यांत ।। कुणि. ।।
दुडडुड धावें जिकडेतिकडे, अचपळ गडबड किति त्याची
मोहक मूर्ति मोदाची ।। कुणि. ।।
हांका तरि किति त्याला मारूं अंधार भरे बाहेर
बाळ कुठें सुख माहेर ।। कुणि. ।।
येरे येरे रे बाळा हांका दारांतून मारी
पाहि दिशांना ती चारी ।। कुणि. ।।
हळूच येउनी पाठीमागुन हळूच देइ ओ हांकेला
मातेच्या धरि ओच्याला ।। कुणि. ।।
हेलावून ये हृदय आइचें उचलुन घेइ बाळाला
चुंबि तयाच्या वदनाला ।। कुणि. ।।
घट्ट धरूनी हृदयापाशीं माय घरामधि जाऊनी
दृष्ट टाकिते काढूनी ।। कुणि. ।।
घट्ट धरोनी हृदयी बालक माय घरामधि मग जाते
दृष्ट काढुनी ती म्हणते ।। कुणि. ।।
उदंड होवो आयुष्याचे माझे हे तान्हे बाळ
प्रभु सांभाळिल सुकृपाळ ।। कुणि. ।।


आयाबाया म्हणत, “भिका-या, पुन्हां म्हण रे गाणे.” आणि हा गोड
भिकारी तें गाणे पुन्हां म्हणे. कोणी मुली येत व म्हणत, “भिका-या, म्हण रे पुन्हां; आम्ही टिपून घेतो.” आणितो पुन्हां म्हणे. भिका-याच्या मुलाला कोणी अंगडी टोपडी देई. एका मातेनें त्याला खुळखुळा आणून दिला.
“किती गोड आहे मुलगा !” आयाबाया म्हणत.
“थंडीवा-यांत कसे होईल त्याचें ?” कोणी म्हणत.

“गरिबांच्या मुलांना नाही बाधत थंडीवारा. देव त्यांचा सांभाळ करतो. पहा त्या मुलांचे बाळसे. नाहीतर ती मेनका आपल्या मुलाला किती बालामृतें पाजते परंतु मूल आंग धरील तर शपथ.”

अशी बोलणी ऐकत जगन्नाथ व कावेरी गेली. गावाबाहेर नदीतीरी बसली. कावेरीने फुले आणली. पुन्नागाचीं फुलें. त्या फुलांनी तिने मुलाल नटविलें. किती सुंदर दिसे ! लहानग्या प्रेमानंदाची चिमणी मूर्ति ! साजिरी गोजिरी मूर्ति !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel