“मला आपलं वाटतं.”

“तूं येणार आहेस खेळ पाहायला ?”

“हो, शाळेंतील मुली एका बाजूला बसणार आहेत. त्यांत मी जाऊन बसेन.”

“परंतु तुला बसूं देतील का ? तूं शाळेंत थोडीच आहेस ?”

“मीं बाईंना विचारलं आहे. त्या म्हणाल्या ये. मी का मोठी आहें ? माझं लग्न थोडंच झालं आहे !” 

तो मुलगा हंसला व गेला. माझा कल्याण येणार, कल्याण येणार, असें म्हणत संध्याहि नाचत नाचत निघून गेली. तिचा
कल्याण ? कल्याण तिचा केव्हां झाला होता ? कोण कुणाचे केव्हां होतें, ते का ठरलेलें असतें ? तें का त्या त्या व्यक्तींना तरी
कळतें ?

“कल्याण, तूं जाऊ नकोस. अलीकडे खेळायला तूं जात नाहींस. घरांत बसतोस; कुस्तींत पडशील.” त्याची आई म्हणाली.

“कल्याण का कधीं पडतो ? कल्याण म्हणजे रामाचा अमोघ बाण. कल्याण पडेल तर जगाचं कसं होईल ? कल्याण नेहमीं विजयी होईल.” तो हंसून आईला म्हणाला.

“परवां तर वरती खिडकींत बसून रडत होतास !”

“काहीं तरीच. कल्याण कधीं रडणार नाहीं. एके दिवशीं सारीं मुल मला चिडवीत होतीं. मी रडेन असं त्यांना वाटल. परंतु मी रडलों नाहीं. ते चिडवीत, तर मी हसें. शेवटीं चिडवणारेच चिडले. आई, तुझा कल्याण रडका नाहीं. मला नेहमीं हसू येत. बघ, तू सुध्दां हंसलीस. कुस्तींत मी विजयी होईन. बक्षीस मिळवीन व तुला आणून दाखवीन.”

कल्याण पुन्हा पूर्वीसारखा आनंदी दिसूं लागला. त्याच्या मित्रांना आनंद झाला. आणि त्या दिवशी ते सारे उडगी गांवीं गेले. हजारों लोक जमले होते. खेळ झाले. मोठमोठया वस्तादांच्या कुस्त्या झाल्या. शेवटीं अठरा वर्षांच्या आतील मुलांच्या कुस्त्या होत्या. कल्याणच्या नावाचा पुकारा झाला. लंगोट कसून तो पुढे आला. तरुणांनी टाळया वाजविल्या. संध्या एकदम उभी राहिली. परंतु इतर मुलींनीं तिला बसविले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel