“मग तूं काय सांगितलंस ?”

“सांगितलं कीं कल्याणचं संध्येशीं लग्न लागलेलं आहे तसंच क्रान्तीशींहि लागलेलं आहे. त्याला संध्या आवडते, परंतु
क्रान्तीचा त्याच्यावर अधिक हक्क आहे. क्रान्तीचा तो आहे तें माहीत असूनच मीं त्याला माळ घातली. खरं ना कल्याण ?”

“संध्ये, तुझ्यासाठींहि जीव तुटतो हो.”

“मीं नाहीं का म्हटलं ? कल्याण, अलीकडे माझ्या मनांत एक विचार येईल व वाईट वाटे.”

“कोणता विचार ?”

“तुझ्या संध्येचं बाळ देवानं नेलं, जन्मतांच त्याच्या गळयाला देवानं नख लावलं, त्याप्रमाणं तुमच्या क्रान्तीच्या बाळांचंहि होईल का ? क्रान्तीचा जन्म होतांच सरकार दडपील का ? तुम्हांला नाहीं का रे कधीं क्रान्तीचा बाळ पाहायला मिळणार ? तुमचे सारे उद्योग का विफल होणार ?”

“संध्ये, आम्ही धडपडणारीं मुलं. ज्याच्या त्याच्या ह्यातींतच सारं होईल असं कसं मानावं ? आपला देश केवढा, किती अडचणी ! नि:शस्त्र लोक ! दीडदोनशें वर्षांची गुलामगिरी ! आम्ही जमीन नांगरीत आहोंत. विचार पेरीत आहोंत. पुढं येईल पीक. कर्तव्य केल्याचं आम्हांला समाधान ! श्रमणा-यांचे संसार सुखी व्हावे, सारी मानव जात सुखी व्हावी, सर्वांनीं थोडं थोडं श्रमावं व उरलेल्या वेळांत ज्ञानविज्ञानांत त्यांनीं रमावं, कलांमध्यें रंगावं, असं आम्हांला वाटतं. हें उज्ज्वल ध्येय आमच्या डोळयांसमोर आहे. तें डोळयांसमोर ठेवून जेवढं करतां येईल तेवढं करतों. एक नवीन मुलगा आमच्या विचारांचा झाला, एक नवीन सोबती आमच्या पक्षांत आम्हीं आणला, तरीहि आम्हांला स्वत:चं जीवन कृतार्थ झालं असं वाटतं. आम्हांला आनंद होतो. संध्ये, वाईट नको वाटून घेऊ. आम्ही रडतच बसूं, तर पदोपदीं रडवणा-या व अडवणा-या निराशा आहेतच. परंतु भाईजी एक चरण म्हणतात.

कोण आतां अडवील
कोण आतां रडवील
अडवणूक करणारांची उडवूं दाणादाण
या रे गाऊं सारे गान
या रे उठवूं सारें रान
खरेंच छान आहेत नाहीं, चरण ?”

“भाईजी तुमच्या पक्षांत नाहींत ना ?”

“नाहीं. ते म्हणतात कीं अमक्यातमक्या पक्षाचा शिक्का असा माझ्या कपाळावर नको. जिथं दु:ख असेल, अन्याय असेल तिथं जावं; लढावं. जिथं लढणारे असतील त्यांना मिळावं. म्हणजे पुरे. मला मोकळा असूं दे. वा-याप्रमाणं मोकळा. परंतु त्यांची आम्हांला सहानुभूति आहे. किसान कामगारांचीं ते आतां गाणीं म्हणतात, गाणीं करतात. आतां देवासाठीं ते रडत नाहीं बसत.”

“परंतु देवावर त्यांची श्रध्दा आहे.”

“असूं दे. ती श्रध्दा गरिबांची मान उंच होण्याच्या विरुध्द नाहीं. गरिबांच्या हृदयाचा, बुध्दीचा विकास होऊं नये, त्यांनीं केवळ सदैव चिखलांतच मरावं, सारखं काम करून कारखान्यांतच नि:सत्त्व व्हावं असं त्यांच्या देवाला वाटत नाहीं; त्यांना मानूं दे देव. त्या देवाची ज्या दिवशीं त्यांना जरूर वाटणार नाहीं, त्या दिवशीं त्यांचा तो देव आपोआप गळेल. त्यांचा देव कांहीं शनिमाहात्म्यांतील देव नाहीं. त्यांचा देव म्हणजे जवळ जवळ विश्वाचा निर्गुण कायदा. ऋतसत्याचं तत्त्व. जरा दयाळु व प्रेममय तत्त्व, इतकंच. जाऊं दे. कांहीं असो. भाईजी नेहमी गरिबांच्याच बाजूनं उभे राहतील.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel