वर्तमानकाळाशी संबध्द असा भूतकाळ
माझ्यात कर्मप्रेरणा आहे, कर्माचा आवेग आहे. कर्मद्वारा जीवनाचा साक्षात्कार करून घेण्याची जी ही माझी वृत्ती तिचा माझ्या सर्व विचारा-आचारावर परिणाम झालेला आहे. सारखा विचार म्हणजे एक कर्मच; शिवाय तो विचार येणार्या कर्माचाच भाग बनतो. विचार केवळ अमूर्त नसतो, शून्यमय नसतो; जीवनाशी, कर्माशी असंबध्द नसतो. भूतातूनच हा आताचा वर्तमानकाळातील कर्मक्षण येतो आणि यातूनच पुन्हा भविष्य पुढे वाहू लागतो. हे तिन्ही काळ परस्पर संबध्द, एकमेकांशी मिसळून गेलेले आहेत.
माझे तुरुंगातील वरपांगी कर्महीन दिसणारे हे जीवनही विचाराच्या नि भावनांच्या विशिष्ट पध्दतीने येणार्या किंवा योजलेल्या कर्माशी जोडलेले आहे. म्हणूनच या माझ्या जीवनात काही अर्थ मला दिसतो, नाहीतर ते शून्य वाटले असते, केवळ पोकळ वाटले असते आणि मग असह्यही झाले असते. प्रत्यक्ष कृती करायला येथे वाव नसल्यामुळे मी भूतकाळात, इतिहासात शिरलो आहे. कारण माझ्या व्यक्तिगत अनुभवांनीही ऐतिहासिक घडामोडींना स्पर्श केला आहे; या घडामोडींवर माझ्या विवक्षित क्षेत्रात परिणामही मी केला आहे; म्हणून इतिहासाकडे जिवंत अशी एक गतिमान परंपरा या अर्थाने मी सहज पाहू शकतो आणि काही अंशी त्याच्याशी मी एकरूपही होऊ शकतो.
इतिहासाच्या क्षेत्राकडे मी उशिरा वळलो. माझा इतिहासाशी परिचय झाला तोही रूढ पध्दतीने नव्हे. इतिहासातल्या शेकडो घडामोडी व तारखांचा अभ्यास करून त्यावरून अनुमाने काढायची व काही निश्चित करावयाचे. मात्र् या कशाचाही आपल्या जीवनाशी संबंध नसावा या पध्दतीने मी कधी इतिहास पाहिला नाही. आणि जोपर्यंत इतिहास या रीतीने शिकत होतो तोपर्यंत त्याचे मला विशेषसे महत्त्वही कधी वाटले नाही. तसेच मरणोत्तर जीवन किंवा अद्भुत चमत्कार याकडे माझे आणखी कमी लक्ष होते. माझा विज्ञानाकडे आणि आजच्या प्रश्नांकडे- या जगातील प्रत्यक्ष जीवनाकडे पहिल्यापासून अधिक ओढा होता.
विचार, भावना, आवेग यांचे एक प्रकारे मिश्रण माझ्यात आहे. या सर्वांचे सम्यक ज्ञान मला नसे. अंधुक अशी अस्पष्ट अशी त्यांची जाणीव मला असे. आणि जीवनातील ही संमिश्र वृत्ती मला कर्माकडे लोटी आणि ते कर्म मला पुन्हा विचाराकडे ढकली. जीवनाचे स्वरूप समजून घ्यायला लावी; सद्य:काळाकडे वळवी. या वर्षमानकाळाची मुळे भूतकाळात असतात म्हणून भूतकाळात शिरून तेथला प्रवासी मी बने; वर्षमानकाळाचे स्वरूप समजून घ्यायला तेथे काही सुगावा मिळतो का ते मी पाही; मी गतकालीन इतिहासात शिरलो, गतकालीन व्यक्तींच्या जीवनात रमलो, स्वत:ला विसरलो तरी वर्तमानाचा माझ्यावरील पगडा कमी होत नसे. कधी कधी मी भूतकालीनच आहे असे जरी मला वाटले तरी लगेच असेही वाटे की, या वर्तमानकाळी सार्या भूतकाळाचा मला वारसा आहे. भूतकाळ आजच्या इतिहासात, समकालीन ऐतिहासिक प्रवाहात मिळून जाई आणि भूतकाळ जिवंत होऊन सुखदु:ख ह्या उपाधी त्यातही प्रत्ययाला येत.
भूतकाळाची वर्तमानात मिळून जाण्याची जशी वृत्ती होई त्याप्रमाणेच वर्तमानकाळही कधी कधी दूरच्या भूतकाळात जाऊन त्याचा स्थिर पुतळा झाला आहे असे वाटे. चालू काम जोरात चालले असतानाही अशी एकदम भावना यावी की हे कर्म भूतकालीन होऊन गेले; आता आपण दुरुन जणू त्याच्याकडे बघत आहोत.