भूतकाळाचा वर्तमानाशी हा असा संबंध काय ते शोधण्याचा प्रयत्न करीत असतानाच बारा वर्षांपूर्वी हा माझ्या मुलीला पत्ररूपी ग्रंथ मी लिहिला.  एका अल्लड मुलीसाठी ते लिखाण होते म्हणून शक्य तितके सोपे मी लिहिले; वर वर स्पर्श करीत गेलो पण हे लिहिण्याचे खरे कारण भूतवर्तमान यांच्या संबंधाच्या शोधाकरिता ही मोहीम निघाली.  काहीतरी साहस होते आहे, धाडस करतो आहोत, अशा वृत्तीने भारून गेलो होतो.  एकामागे एक शतकेच्या शतके, युगेच्या युगे मी चालता बोलता प्रत्यक्ष कंठित होतो व इतिहासपुराणात होऊन गेलेल्या स्त्री-पुरुषांच्या माझ्याशी गाठीभेटी चालल्या होत्या.  तुरुंगात भरपूर वेळ होता.  घाई नव्हती.  इतक्या मुदतीत हे काम संपलेच पाहिजे असे बंधन नव्हते.  म्हणून मी माझ्या मनाला स्वैर-संचार करू दिला;  क्षणभर कोठे रमावेसे वाटले येथे मूळ धरावे, घटकाभर असे मनाला वाटले तरी तसे होऊ दिले.  माझ्या वृत्तीप्रमाणे, त्या त्या वेळच्या भावनेप्रमाणे मी रमलो व रंगलो आणि अशा रीतीने गतकालीन इतिहासाच्या क्षुल्लक सापळ्यात माझा जीवन ओतला.  अशाच प्रकारे अलीकडल्या, अधिक जवळच्या कालखंडात व व्यक्तीत चौकस नजरेने भटकता भटकता मला माझे आत्मचरित्र लिहिण्याची बुध्दी झाली. 

गेल्या बारा वर्षात माझ्यात बराच बदल झाला आहे, असे मला वाटते.  मी अधिक चिंतनशील झालो आहे.  थोडा-अधिक समतोलपणा, थोडा-अधिक संयम आला असेल; एक प्रकारची अनासक्तता आली आहे.  जिवाला जास्त संथपणा आला आहे.  दु:खान्तक घडामोडींनी माझ्यावर पूर्वीइतका परिणाम आता होत नाही.  जिवाची तळमळ, घालमेल कमी होते व थोडी टिकते.  पूर्वीपेक्षाही मोठे दु:खकारक प्रसंग आले तरी मी तितका अस्वस्थ होत नाही.  जे आपल्या हाती नाही ते निमूटपणे सहन करावे या वृत्तीची ही वाढ आहे काय ?  का मन अधिक घट्ट होत चालल्याची ही खूण ?  का वयाचा हा परिणाम ?  उत्साहशक्ती, चैतन्य, जीवनाची उत्कटता ही का कमी होत चालली ?  का वर्षानुवर्षे तुरुंगात राहून, हळूहळू जीवन झरत जाण्याचा हा परिणाम ?  हजारो विचार मनात नुसते यावे, क्षणभर राहावे आणि पाठीमागे खळबळ ठेवून त्यांनी निघून जावे असे तुरुंगात घडते त्याचा का हा परिणाम ?  मनाचा कोंडमारा होऊन छळ झाला म्हणजे मन पळवाट काढते, व सारखे आघात होऊन होऊन वृत्ती बधिर होते.  आणि मनात असा विचार येतो की जगात इतके दु:ख, इतकी आपत्ती आहे की थोडे कमी काय किंवा अधिक काय— कशाला त्याची खिजगणती करायची ?  परंतु हे एक आपल्या हातचे आहे ते कोणाला हिसकावून घेता येत नाही; ज्या ध्येयामुळेच या आपल्या जगण्यात काही अर्थ आहे ती ध्येये सोडू नयेत, व प्रसंग आला तर धीराने आपला मान संभाळून राहावे.  परंतु राजकारणी लोकांचा हा मार्ग नव्हे.

परवा कोणीतरी म्हणाले की ''जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मरणे हा जन्मसिध्द हक्क आहे.''  साधी स्पष्ट गोष्ट, परंतु विलक्षण रीतीने सांगितली आहे नाही ? हा तुमचा जन्मसिध्द हक्क कोणीही नाकारणार नाही, नाकारू शकत नाही, परंतु आपण बहुतेक सारे या जन्मसिध्द हक्काला शक्यतो विसरू इच्छित असतो, तो कसा टाळता येईल ते पाहात असतो आणि असे असूनही ही म्हण जरा विक्षिप्त, जरा मोहक वाटते.  जीवनाविषयी जे सदैव कुरकुर करीत असतात त्यांना त्यांची इच्छा असेल तर त्यातून मुक्त होण्याचा मार्ग मोकळा आहे.  तो मार्ग आपल्या हातात आहे.  जगणे आपल्या हातची गोष्ट नाही, पण निदान मरण तर हातचे आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel