हिंदुधर्म म्हणजे काय ?
व्हिन्सेंट स्मिथचे जे अवतरण आता वर दिले त्यात 'हिंदुधर्म', 'हिंदू वळण' असे शब्द आहेत. हिंदी संस्कृती या व्यापक अर्थाने ते शब्द योजले असतील तर काही हरकत नाही; तसे नसेल तर असे शब्द वापरणे माझ्या मते बरोबर नाही. आज अशा शब्दप्रयोगामुळे गैरसमज होण्याचाही संभव आहे, कारण आज हिंदू या शब्दाचा संकुचित आणि विशेषत: धार्मिक अर्थ प्राप्त झाला आहे. आमच्या प्राचीन वाङ्मयात हिंदू हा शब्द कोठेही नाही. आठव्या शतकातील एका तांत्रिक ग्रंथात हिंदू शब्द प्रथम आलेला दिसतो असे मला सांगण्यात आले; आणि तेथेही त्या शब्दाचा अर्थ विशिष्ट धर्माचे अनुयायी असा नसून विशिष्ट लोकसमूह असा आहे; परंतु हा शब्द जुना आहे यात शंका नाही. कारण अवेस्तामध्ये व प्राचीन पर्शियन भाषेत हा शब्द आढळतो. त्या वेळेस आणि त्यानंतरही सुमारे हजार वर्षे मध्य व पश्चिम आशियातील लोक हिंदुस्थानासाठी म्हणून किंवा अधिक सत्यार्थाने म्हणायचे झाले तर सिंधू नदीच्या पलीकडे राहणार्या लोकांसाठी म्हणून या शब्दाचा उपयोग करीत. हिंदू हा शब्द सिंधूपासून आला आहे हे स्पष्ट आहे. सिंधू नदीचे हे प्राचीन काळचे आणि आजचेही नाव आहे. या सिंधू शब्दापासून हिंदू, हिंदुस्थान हे शब्द बनले. सातव्या शतकात प्रसिध्द चिनी प्रवासी इस्तिंग हा आला होता. तो आपल्या प्रवासवर्णनात लिहितो, ''उत्तरेकडच्या जाती म्हणजे मध्य आशियातील लोक या (इंडिया) देशाला हिंदू (हिन्-टु) असे म्हणतात.'' परंतु पुढे तो जोडतो, ''परंतु हेच काही सर्वसाधारण नाव नव्हे.....इंडियाला अत्यंत योग्य असे नाव श्रेष्ठ देश 'आर्य देश' हेच आहे.'' विशिष्ट धर्माला हिंदू हा शब्द वापरण्याचा प्रकार पुष्कळ नंतरचा आहे.
हिंदुस्थानातील धर्माला संग्राहक असे आर्य धर्म हेच नाव प्राचीन काळी होते. धर्म या शब्दात इंग्रजीतील 'रिलिजन' या शब्दातील अर्थापेक्षा अधिक अर्थ आहे. ज्या धातूपासून हा शब्द बनला आहे, त्या मूळ धातूचा अर्थ एकत्र ठेवणे असा आहे. एखाद्या वस्तूचा धर्म म्हणजे तिची मूलप्रकृती, तिच्या अस्तित्वाला अवश्य असे निर्बंध. धर्म या शब्दातली कल्पना नैतिक आहे. त्यात नीतिनिर्बंध, सत्य-न्याय, मानवाच्या सर्व कर्तव्यांचा, त्याच्या सर्व नैतिक ॠणांचा विस्तार येतो. धर्म शब्दात नैतिक अर्थ आहे. सारे नीतिशास्त्र, मनुष्याची सारी कर्तव्ये, सारी ॠणे, सार्या जबाबदार्या सत्यप्रतिष्ठित प्रामाणिक न्याय इत्यादी गोष्टींचा धर्म या शब्दाने अर्थ कळतो. हिंदुस्थानात जन्म पावलेल्या सर्व धर्मांचा (वैदिक, अवैदिक) आर्य धर्मांत समावेश होतो. वेद मानणार्याकडून आणि वेद न मानणार्या अशा जैन व बुध्दधर्मीयांकडूनही हाच शब्द वापरण्यात येई. स्वत: भगवान बुध्द स्वत:च्या मोक्षमार्गाला 'आर्यमार्ग' असेच म्हणत.
जे तत्त्वज्ञानपंथ, नीतिनियम, धार्मिक विधी व आचार वेदापासून निघाले असे मानले जात असे त्यांनाच मुख्यत: व विशेषत: वैदिक धर्म ही संज्ञाही प्राचीन काळी दिलेली आढळते. वेदांची अधिसत्ता जे मानीत, वेद अंतिम आधार, वेदांचा शेवटचा अधिकार असे जे मानीत ते वैदिक धर्माचे अनुयायी असे समजण्यात येई.
सनातन धर्म ही संज्ञा हिंदुस्थानातील सार्याच प्राचीन धर्मपंथांना, बुध्द व जैन या पंथांनाही लावता येईल. परंतु आपण पुरातन धर्माने चालतो असा हक्क सांगणार्या काही पुराणमतवादी कर्मठ हिंदू गटांनी ह्या संज्ञेचा आजकाल थोडाफार मक्ता घेतलेला आहे.
बुध्दधर्म, जैनधर्म हे हिंदू धर्म नव्हते किंवा वैदिक धर्मही नव्हते. परंतु हिंदुस्थानातच त्यांचा जन्म आणि हिंदी जीवन, हिंदी संस्कृती व तत्त्वज्ञान यात त्यांचाही एकजीवन महत्त्वाचा भाग आहे. हिंदुस्थानातील बुध्दधर्मी किंवा जैनधर्मी मनुष्याचा पिंड शंभर टक्के हिंदी संस्कृती आणि हिंदी विचार यातूनच बनलेला आहे. परंतु धर्माने ते काही हिंदू नाहीत. म्हणून हिंदी संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणणे हे अगदी चूक आहे. पुढील काळात या संस्कृतीवर इस्लामी संघर्षाचाही फार परिणाम झाला; तथापि ती मुळात विशेषेकरून हिंदी म्हणूनच राहिली. पश्चिमेकडे जन्मलेल्या औद्योगिक संस्कृतीचे हल्ली शेकडो प्रकारे तिच्यावर महत्त्वाचे परिणाम व संस्कार होत आहेत. त्यातून काय निष्पन्न होईल ते आज अचूक सांगणे कठीण आहे.