अनेक राज्ये आणि त्यांचे राजे, त्यांच्या वंशावळ्या आणि कारकीर्दी कालानुक्रमे आलेल्या सापडतात.  राजपद प्रथम लोकनियुक्त असे, पुढे ते वंशपरंपरा झाले, आणि मोठा मुलगा असे तो गादीचा वारस होई.  स्त्रियांना राजपद मिळत नसे.  परंतु काही अपवाद आढळतात.  प्रजेवर येणार्‍या सर्व आपत्तींना राजा जबाबदार धरला जाई.  चीनमध्येही असेच होते.  काही बिघडले तर राजाचा तो अपराध मानला जाई.  मंत्रिमंडळ असे, आणि विधिमंडळही एक प्रकारचे असावे असे काही उल्लेखांवरून वाटते.  परंतु जरी राजाला प्रस्थापित मर्यादेत वागावे लागे, जे काही संकेत मान्य केलेले असत ते त्याला पाळावे लागत, तरी एकंदरीत राजा अनियंत्रित असे.  राजाचा धर्मगुरु किंवा मुख्य उपाध्याय असे, दरबारात त्याला महत्त्वाचे स्थान होते; धार्मिक समारंभाची त्याच्यावर जबाबदारी असे; तो धार्मिक बाबतीत सल्लाही देई.  जुलमी आणि अन्यायी राजाविरुध्द प्रजा बंड करून उठल्याचे, व कधी कधी राजाला अपराधासाठी ठारही करण्यात आल्याचे उल्लेख आहेत.

ग्रामपंचायतींना थोडेफार स्वातंत्र्य होते.  त्यांच्या उत्पन्नाची मुख्य बाब जमीन महसूल असे.  जमिनीच्या उत्पन्नातील राजाचा हिस्सा म्हणून शेतसारा घेण्यात येई.  बहुधा तो धान्यरूपाने घेण्यात येई; क्वचित निराळ्या रूपातही घेत.  उत्पन्नाच्या एकषष्ठांश हा कर बहुधा असे.  प्राधान्येकरून कृषिप्रधान अशी ती संस्कृती होती आणि स्वायत्त गाव हा त्या संस्कृतीत घटक होता.  या ग्रामांचे— दहा गावांचा, शंभर गावांचा— असे संघ होते व या अशा संघटनेमार्फत राजकीय व आर्थिक व्यवस्था उभारण्यात आली होती.  फळफळावळीचे बागबगीचे करणे, गुराढोरांची पैदास करणे, दूधदुभते इत्यादी धंदे मोठ्या प्रमाणावर चालत.  उद्याने व उपवने सर्वत्र असत.  फूलाफळांना महत्त्व होते.  फुलांच्या नावांची यादी केवढी थोरली आहे ;  लोकप्रिय फळांत आंबा, अंजीर, द्राक्षे, केळी आणि खजूर यांचा उल्लेख आहे.  शहरांतून भाजीवाल्यांची, फळवाल्यांची पुष्कळ दुकाने, फुलवाल्यांचीही दुकाने असत असे स्पष्ट आढळते.  फुलांचे हार आजच्या काळाप्रमाणे त्या काळातही भारतीय जनतेला फार प्रिय होते.  मुख्यत: आहाराकरता शिकारीचा नियमित धंदा असे.  मांसाहार सर्वसामान्य होता.  त्यात कोंबड्या आणि मासे यांचा मुख्यत्वेकरून समावेश असे.  हरणाच्या मांसाला फार मान असे.  मच्छीमारीचे धंदे होते, खाटीकखाने होते.  परंतु आहारातील मुख्य पदार्थ म्हणजे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी आणि इतर धान्ये हेच असत.  उसापासून सारख तयार करीत.  दूध आणि दुधाचे अनेक पदार्थ यांची आजच्याप्रमाणेच महती होती.  दारुची दुकाने होती.  तांदूळ, फळे, ऊस यांच्यापासून दारु तयार केली जाई असे दिसते.

निरनिराळ्या धातूंच्या तसेच मौल्यवान रत्नांच्या खाणी होत्या,  सोने, चांदी, तांबे, लोखंड, कथील, शिसे, पितळ इत्यादी धातूंचे उल्लेख आहेत.  मौल्यवान रत्नांत हिरे, माणके, पोवळी हे प्रकार आले आहेत, व मोत्येही होती.  सोन्याचांदीच्या आणि तांब्याच्या नाण्यांचा उल्लेख आहे.  व्यापरात भागीदार असत; व्याजावर रकमा दिल्या जात.

तयार केलेल्या पक्क्या मालात रेशमी, लोकरी व कापसाची वस्त्रे येतात.  तसेच रंग, घोंगड्या, गालिचे इत्यादी प्रकारही आहेत.  कातणे, विणणे आणि रंगविणे हे देशात सगळीकडे भरभराटीचे धंदे होते.  धातुकामाच्या कारखान्यातून युध्दाची आयुधे तयार होत.  बांधकामात दगड, विटा लाकूड असे.  सुतार कुशल होते व नाना प्रकारच्या वस्तू ते बनवीत.  गाड्या, रथ, पलंग, खुर्च्या, बाके, पेट्या, खेळणी, गलबते सारे प्रकार ते करीत.  वेतकाम करणारेही होते.  वेताच्या चटया, टोपल्या, पंखे, छत्र्या यांचे उल्लेख आहेत.  प्रत्येक गावात कुंभार असत.  फूलापासून, चंदनापासूनही नाना सुगंधी अत्तरे, तेले व सौंदर्यवर्धनाचे विविध प्रकार तयार करीत.  चंदनचूर्णांचा उल्लेख आहे.  नाना प्रकारची औषधे, चूर्णे, मात्रा तयार करण्यात येत.  क्वचित मृतदेहही मसाले भरून सुरक्षित ठेवीत.

हे जे निरनिराळे कलावंत, कारागीर, धंदेवाले सांगितले यांशिवाय आणखीही इतर धंद्याचे शिक्षक, वैद्य, शस्त्रक्रिया करणारे, व्यापारी, दुकानदार, संगीततज्ज्ञ, सामुद्रिक, फूला-फळांचे- भाजीपाल्याचे व्यापारी, नट, नर्तक, फिरते डोंबारी, जादूचे खेळ करणारे कळसूत्री बाहुलीवाले, फेरीवाले, कितीतरी धंदेवाइकांचे उल्लेख आहेत.

घरकामाकरता गुलामगिरी सर्वत्र दिसते.  परंतु शेतकीची किंवा इतर काम मजुरीने केली जात.  त्या काळातही काही अस्पृश्य दिसतात.  त्यांना चांडाल ही संज्ञा दिलेली आहे व त्यांचा मुख्य धंदा प्रेतांची विल्हेवाट करणे हा दिसतो.

व्यापारी संघांना व निरनिराळ्या उद्योगधंद्यातील कारागिरांच्या संघांना महत्त्व प्राप्त झाले होते.  फिक् म्हणतो, ''हिंदी संस्कृतीतील व्यापारी संघ फार प्राचीन काळापासून असावेत.  काही अंशी आर्थिक कारणांमुळे, भांडवल नीट गुंतवता यावे म्हणून, दळणवळण व देवघेव यांना सोपे जावे म्हणून व काही अंशी स्वत:च्या वर्गाचे हितसंबंधी राखण्याच्या दृष्टीने हे संघ निर्माण झाले होते.  जातककथांवरून असे दिसते की, अठरा प्रकारचे कारागिरांचे संघ होते, परंतु सुतार व गवंडी, धातुकाम करणारे, चामड्याचे काम करणारे आणि चित्रकार ह्या चार प्रकारांचाच उल्लेख सापडतो.

रामायण-महाभारतातूनही व्यापारी संघटनांचे, कारागीर-संघटनांचे उल्लेख आहेत.  महाभारत म्हणते, ''संघांचे संरक्षण त्यांची एकजूट केल्याने होते.  व्यापारी संघांना असे महत्त्व होते की, त्यांच्या धंद्याला विघातक कायदे ते राजाला करू देत नसत.  राजाला धर्मोपदेशकांच्या खालोखाल जर कोणाची पर्वा वाटत असेल तर निरनिराळ्या धंदेवाइकांच्या संघाच्या नायकांची.  व्यापार्‍यांचा प्रमुख म्हणजे 'श्रेष्ठी' (हल्लीचा 'शेठ') ही मोठी वजनदान व्यक्ती असे. *

--------------------------

* प्रोफेसर ई. वॉशबर्न हॉपकिन्स : केंब्रिज भारतीय इतिहास; खंड पहिला, पृष्ठ २६९.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel