महावीर आणि बुध्द : चातुरर्वर्ण्य आणि जाती

रामायण-महाभारताच्या काळापासून तो आरंभीच्या बुध्दकालापर्यंत वरीलप्रमाणे उत्तर हिंदुस्थानात सामान्यत: परिस्थिती होती, अशी ही पार्श्वभूमी होती.  राजकीय व आर्थिक दृष्ट्या ती सदैव बदलत होती.  नव्याजुन्यांचा मेठ बसतबसत ते एकरूप होत होते, व कामाची श्रमविभागणी होताना विशिष्ट कामात विशिष्ट प्रकारची माणसे गुंतवण्याची वहिवाट वाढत वाढत समाज चालला होता.  विचाराच्या क्षेत्रात सारखी वाढ चालली होती व पुष्कळ वेळा विचारांचे खटके उडत.  पहिल्या पहिल्या उपनिषदानंतर तात्त्विक विचार व प्रत्यक्ष आचार यांत अनेक अंगांनी विकास होत होता.  उपनिषदेच स्वत: उपाध्येगिरी आणि विधींचे अवडंबर याविरुध्द एक प्रतिक्रिया-वैचारिक क्रांती होती.  आजूबाजूला जे दिसे, त्यातील पुष्कळ भागांविरुध्द मानवी मनाने बंड पुकारले होते.  त्या बंडातून पहिली उपनिषदे व त्यानंतर काही काळाने जडवादाचा जोरदार विचारप्रवाह आणि जैन व बौध्द मते निघाली, व या सर्वांच्या निरनिराळ्या श्रध्दा व निष्ठा यांच्यात मेळ घालून सुसंवादित्व निर्माण करण्याचा भगवद्गीतेचा प्रयत्न, या सर्वांचा प्रादुर्भाव झाला होता.  या सर्वांमधून पुन्हा भारतीय तत्त्वज्ञानाचे सहा संप्रदाय 'षड्दर्शने' निघाली.  परंतु या सर्व मानसिक आणि बौध्दिक संघर्षाच्या आणि बंडाच्या पाठीमागे राष्ट्राचे लखलखीत व सारखे वाढून विस्तार होत असलेले जीवन चाललेच होते.

जैन व बौध्द धर्म हे वैदिक धर्म व त्यांचे संप्रदाय यांच्यापासून जरी फुटून निराळे निघालेले होते तरी एकपरीने वैदिक धर्मातूनच ही वाढ निघाली होती.  वेदांचा अधिकार ते मानीत नाहीत, परंतु सर्वांत मूलभूत अशी गोष्ट म्हणजे या विश्वाला एखादे आदिकारण होते असे मानीत नाहीत.  निदान त्यासंबंधी काहीच म्हणत नाहीत.  दोन्ही धर्म अहिंसेला प्राधान्य देतात व ब्रह्मचारी भिक्षू आणि धर्मोपाध्याय यांचे संघ असावेत असा त्यांचा आदेश आहे.  या दोन्ही धर्मांची दृष्टी एक प्रकारे बुध्दिप्रधान व वस्तुस्थितीस धरून अशी आहे, परंतु त्यामुळे अतींद्रिय, अदृश्य जगाच्या बाबतीत अर्थांत हे धर्म काही विशेष असे म्हणू शकत नाहीत.  जैन धर्माचे एक मूलभूत तत्त्व आहे की, सत्य हे नेहमी सापेक्ष असते, ज्याच्या त्याच्या दृष्टीने ते ठरवायचे असते.  जैनधर्म हा प्रखर नीतिप्रधान धर्म आहे; परलोक, अतींद्रिय सृष्टी त्यात नाहीत.  त्यांची मीमांसा दृश्य जगाची आहे व आचारविचाराने जीवन विरक्त व व्रतस्थ यतिवृत्तीने घालविण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

जैन धर्माचा संस्थापक महावीर आणि बुध्द हे समकालीन होते.  दोघे युध्दप्रधान क्षत्रिय वर्णाचे होते.  बुध्द वयाच्या ८० व्या वर्षी ख्रिस्तपूर्व ५४४ मध्ये निर्वाणाप्रत गेले.  त्या वेळेपासून बुध्दशक सुरू होतो.  (हा परंपरागत काळ आहे.  इतिहासकार बुध्दनिर्वाण ख्रिस्त पूर्व ४८७ मध्ये मानतात.  परंतु परंपरागत काळच अधिक बरोबर आहे असे अलीकडे मानू लागले आहेत.)  मी आज बुध्दधर्मांच्या—शके २४८८ च्या वर्षारंभाच्या दिवशीच वैशाखी पौर्णिमेला हे लिहीत आहे हा असामान्य योगायोगच म्हणायचा.  बौध्द वाङ्मयात असे लिहिलेले आहे की बुध्दाचा जन्म वैशाखी पौर्णिमेलाच झाला आणि त्यांचे निर्वाणही त्याच दिवशी झाले.

सामान्य धर्मकल्पना, लोकभ्रमावर पोसलेल्या वेडगळ धर्मसमजुती, कर्मकांडाचे अवडंबर व उपाध्येगिरी आणि या सर्वांना कवटाळून बसलेले मिराशी हितसंबंध यावर हल्ला चढविण्याइतके धैर्य बुध्दाला होते.  तसेच अध्यात्म व सगुणसाकार ईश्वर मानण्याची प्रवृत्ती आणि चमत्कार, दैवी साक्षात्कार वगैरे अद्‍भुत सृष्टीतले प्रयोग यांचा बुध्दाने निषेध केला.  तर्कशास्त्राच्या कसोटीला उतरेल, बुध्दीला पटेल व ज्याचा अनुभव येईल तेच प्रमाण मान असे त्याचे तत्त्व होते.  विशेष भर नीतितत्त्वावर होता व विवेचनपध्दती मनोविश्लेषणाची होती.  परंतु आत्मा मात्र ते मानीत नसत.  अध्यात्मशास्त्रातील कल्पनातरंगाच्या त्याच त्या ठरीव व शिळ्या काथ्याकुटीनंतर बुध्दाचे विचार म्हणजे पर्वतावरून येणार्‍या स्वच्छ ताज्या वार्‍याच्या झोताप्रमाणे वाटतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel