त्या लेखात पुढे असेही आहे की कलिंगात झालेल्या प्रकाराच्या एक शतांश किंवा एक सहस्त्रांशही हत्या किंवा दास्य हे प्रकार सम्राट चालू देणार नाहीत.  शुध्द धर्माच्या सन्मर्गाने लोकांची हृदये जिंकून घेणे हाच खरा विजय आणि असे विजय देवप्रियाने स्वत:च्याच राज्यात नाही तर दूरच्या राज्यातही मिळवले आहेत.

पुढे हा लेख सांगतो, ''आणि कोणी अपाय केला तरी सम्राट देवप्रियांनी हे सारे सहन केले पाहिजे; शक्यतो सहन केले पाहिजे.  आपल्या राज्यातील अरण्यवासी लोकांवर त्यांची कृपादृष्टी आहे व त्यांचे विचार शुध्द असावेत असा सम्राटांचा प्रयत्न आहे.  कारण तसे केले नाही तर त्यांना पश्चात्ताप होईल.  प्राणिमात्राला स्वास्थ्य, संयम, शांती व आनंद असावा अशी सम्राट देवप्रियांची इच्छा आहे.''

हिंदुस्थानातच नव्हे सर्व आशिया खंडात प्रिय झालेल्या या अलौकिक सम्राटाने आपले आयुष्य बौध्द धर्माच्या प्रसारात, सध्दर्म आणि सदिच्छा यांच्या प्रचारात, त्याचप्रमाणे प्रजेच्या हिताच्या आणि कल्याणाच्या गोष्टी करण्यात घालवले.  आत्मचिंतन व आत्मोन्नतीत मग्न राहून डोळ्यांसमोरच्या जगात जे घडेल ते पाहात स्वस्थ बसण्याची त्याची वृत्ती नव्हती.  सार्वजनिक कार्यात तो सदैव मग्न असे व मी यासाठी सदैव सिध्द आहे असे तो म्हणे.  वेळ कोणतीही असो, मी कोठेही असो; मी भोजन करीत असलो किंवा अंत:पुरात असलो, शयनगृहात असलो किंवा एकान्तात असलो, रथात असलो किंवा प्रासादाच्या उपवनात असलो, प्रजेसंबंधीच्या कामांची वार्ताहरांनी मला माहिती तत्काळ द्यावी, प्रजेच्या कल्याणासाठी मी काळवेळ न पाहता सारे सोडून त्या कामाला गेलेच पाहिजे.''

अशोकाचे प्रतिनिधी आणि संदेशवाहक दूत बुध्दाचा संदेश घेऊन इजिप्त, सीरिया, मॅसिडोनिया, सिरीन, एपिरस इत्यादी देशांना गेले.  ते मध्य आशियातही गेले, तसेच ब्रह्मदेश व सयाम इकडेही गेले.  स्वत:चा पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना त्याने दक्षिणेकडे सीलोन वगैरे प्रदेशात धाडले.  या सर्व ठिकाणी शक्तीच्या जोरावर सक्तीने धर्मप्रसार न करता केवळ बुध्दिवादाने मने जिंकण्याचा प्रयत्न झाला.  स्वत: उत्कट बौध्द धर्मी असूनही अशोक इतर धर्मांना व पंथ-संप्रदायांना मान देऊन गौरवी.  एका शासनलेखात तो म्हणतो, ''सर्व धर्माना, सर्व पंथांना या ना त्या कारणासाठी पूज्य मानावे लागते.  असे केल्याने आपल्यालाही विशिष्ट धर्मांची उदात्तता दिसते आणि दुसर्‍याही लोकांच्या धर्मपंथाची सेवा घडते.''

काश्मीरपासून सीलोनपर्यंत बौध्द धर्म वायुवेगाने पसरला.  नेपाळात घुसून तेथून तो तिबेट, चीन, मंगोलियापर्यंत थेट गेला.  बौध्द धर्माचा एक परिणाम हिंदुस्थानात असा झाला की, शाकाहाराकडे वाढती प्रवृत्ती व मद्यपानापासून निवृत्ती होऊ लागली.  त्या वेळेपर्यंत ब्राह्मण आणि क्षत्रिय मांस खात, मद्य सेवीत.  यज्ञीत हिंसाही बंद झाली.

परदेशांशी संबंध अधिक वाढल्यामुळे धर्मप्रचारकांच्या देशोदेशी जाण्यामुळे हिंदुस्थान आणि इतर देश यांच्या दरम्यान व्यापार वाढणे हे साहजिकच होते.  आपल्याला हल्ली उपलब्ध असलेल्या लेखावरून असे दिसते की, मध्य आशियातील हल्लीच्या सिकीयांगमध्ये खोतान येथे हिंदी वसाहत होती.  हिंदी विद्यापीठांमध्ये विशेषत: तक्षशिला येथे पुष्कळ विदेशीय विद्यार्थी असत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel