ही प्रबल परिस्थिती प्रभावी कशामुळे होती ? काही प्रमाणात या देशाच्या मुलखाची मांडणी व ॠतुमान यांचा हा प्रभाव आहेच; ह्या देशाचे सारे काही और आहे. पण ह्याहीपेक्षा नक्की कारण म्हणजे इतिहासाच्या उष:कालाच्या प्रहराला जेव्हा ही भारतमाता अल्लड खेळकर बालिका होती तेव्हा तिच्या कोवळ्या मनावर सृष्टीच्या चैतन्याच्या गूढ अर्थाचा जो परिणाम सहज, न कळत झाला तो परिणाम, ती रसरसलेली वृत्ती, ती जिवंत जिणे जगण्याची अनावर हौस हेच खरे. ही हौस इतकी उत्कट होती, की ती वाढत्या वयात तशीच टिकली व त्यामुळे अगदी परके असे कोणीही जवळ आले की त्यांच्यावरही ह्या वृत्तीचा प्रभाव पडून, ते भारतमातेच्या परिवारात जमा होऊन भारतीय बनले. या भारतात जी संस्कृती वाढली व जिच्या प्रकाशात इतिहासाच्या युगायुगात भारतीय जनता नांदत राहिली, त्या संस्कृतीला मूळ चेतना देणारा स्फुलिंग ह्या वृत्तीचा, ह्या भावनेचा होता की काय ?
भारतीय संस्कृतीच्या विस्ताराचे मूळ कारण नुसती एक उत्कट भावना, एकजीवनाबद्दलची कल्पना होती असे म्हणणे विचित्र व अद्वातद्वा काहीतरी आहे असे वाटेल. नुसते एका व्यक्तीचे लहानसे जीवन पाहिले तर ते सुध्दा शेकडो ठिकाणांहून पोषक द्रव्ये घेऊन वाढत असते. राष्ट्राचे किंवा एखाद्या संस्कृतीचे जीवन त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आणि गुंतागुंतीचे असते. जसे एखादे गलबत फुटले तर शेकडो प्रकारचा माल समुद्रावर इतस्तत: तरंगताना दिसतो, त्याप्रमाणे भारताच्या आसपास हजारो विचार सर्वत्र पसरलेले असत; काही विचार परस्परविरोधीही असत. आपला एखादा सिध्दांत प्रस्थापित करण्यासाठी या विचारांतील कोणताही काही विचार सहज उचलून घेऊन, त्या विचारांचा हा विशिष्ट परिणाम आहे असे म्हणणे सोपे आहे, तितकेच दुसरा कोणी असेच काही निराळे विचार घेऊन त्यांच्या आधाराने अगदी विरोधी सिध्दांत निराळा मांडणेही शक्य आहे. सर्वत्रच कमी-अधिक प्रमाणात ही स्थिती असते. परंतु हिंदुस्थानसारख्या देशात जेथे जिवंत वर्तमानकाळाला मेलेल्या भूतकाळाचे पुष्कळसे चिकटलेले असते, तेथे ही गोष्ट अधिकच विशेषेकरून सोपी आहे. तसेच गुंतागुंतीच्या घडामोडींचे असे साधे वर्गीकरण पटकन करण्यात उघड धोकाही असतो. विचारात व त्याच्या आचाराच्या उत्क्रांतीत प्रखर विरोध सहसा एकदम होत नाहीत. एक विचारातूनच दुसरा विचार निघतो, आणि कधीकधी विचाराचे बाहेरचे स्वरूप मूळचेच राहून, आतील अर्थ मात्र बदलून गेलेला दिसतो. केव्हा केव्हा भोवतालचे जगाचे आचार बदललेले असतात, पण विचारमात्र जुनेच राहून मागे पडतात व मागे पडले की चालत्या गाड्याला ते मागे ओढू पाहतात.
आपण सदैव शतकानुशतके बदलत आलो आहोत. पूर्वीच्या काळात आपण जसे होतो, तसेच्या तसेच अगदी त्यानंतरच्या कालखंडात आपण कधीही नव्हतो. आजही आपण वंशिक रीत्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या पूर्वीचे जसेच्या तसे राहिलो नाही आणि इतरस्त्र होत आहे त्याप्रमाणे हल्लीही हिंदुस्थानात चौफेर बदल मला प्रचंड पावलांनी चाललेला दिसतो आहे. तथापि एक विचार पुन:पुन्हा माझ्या मनात कायमचा राहतोच तो हा की हिंदी आणि चिनी संस्कृतीत एक प्रकारची चिवट वृत्ती आहे, टिकून राहण्याची शक्ती आहे, बदलत्या काळाशी मिळते-जुळते घेण्याची दृष्टी आहे; आणि कितीही फरक झाले, उत्पात झाले, आणीबाणीचे काळ आले तरी या दोन्ही संस्कृतींनी हजारो वर्षे आपले स्वत:चे मूलभूत वैशिष्ट्य अभंग ठेवले आहे, असे करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. निसर्गाशी आणि जीवनाशी त्यांचे सुसंवादित्व असल्याशिवाय असे करता येणे शक्यच नव्हते. प्राचीन परंपरेशी, त्या प्राचीन स्वरूपाशी त्यांना अविरतपणे जोडून ठेवणारे ते काहीही असो; ते भले असो वा बुरे असो, किंवा दोहोंचे मिश्रण असो; ते जे काही होते ते अती सामर्थ्यशाली होते, नाहीतर ते प्रदीर्घकाल टिकतेच ना. कदाचित ते जे काही अंतस्तत्त्व, ती अंत:प्रेरणा असेल, तिच्यातील उपयुक्तता मागेच संपली असेल आणि नंतर आपल्या विकासाला व वाढीलाही त्याचा सारखा अडथळा होत असेल; किंवा अशीही शक्यता आहे की शेकडो शतकांचे नवेनवे थर वर बसून ते जे काही प्रभावी तत्त्व होते, ते गुदमरून जाऊन त्यातील चैतन्य, त्यातील सत् अंश नष्ट झाला असेल; आणि केवळ बाह्य कवच, सांगाडा शिल्लक राहिला असेल.