हिंदी ध्येये आणि इराणी स्फूर्ती यांच्या संगमातून हिंदुस्थानात एक नवीन अभिनव शिल्पकला निघाली आणि दिल्ली आणि आग्रा येथे सुंदर आणि भव्य इमारती सर्वत्र शोभू लागल्या.  फ्रेंच पंडित एम. ग्राऊसेट ताजमहालविषयी म्हणतो, ''इराणच्या आत्म्याने हिंदी शरीरात घेतलेले हे रूप आहे.''  हिंदी आणि इराणी लोकांच्या मूळ एका वंशातले म्हणून व नंतर शतकानुशतकांचा जसा संबंध आहे तसा जगात क्वचितच इतरत्र दिसतो.  परंतु या दीर्घ सुपरिचित आणि सन्मान्य संबंधाची शेवटची आठवण दुर्दैवेकरून अती दु:खाची आहे, आणि ती म्हणजे नादिरशहाच्या स्वारीची.  दोनशे वर्षांपूर्वी ती अल्पकाळ टिकणारी परंतु भयंकर अशी आपत्ती येऊन गेली.  नंतर ब्रिटिश आले.  आशियातील आमच्या शेजार्‍यांशी जोडणारे सारे मार्ग आणि रस्ते त्यांनी बंद केले.  नवीन समुद्रावरचे मार्ग पुढे आले आणि आशियापेक्षा युरोप जवळचे वाटू लागले.  विशेषत: इंग्लंडच्या अधिक जवळ आपण गेलो.  इराण, मध्य आशिया, चीन यांच्याजवळ खुष्कीचे मार्ग राहिले नव्हते.  परंतु आता वैमानिक दळणवळणाचे दिवस आल्यामुळे प्राचीन प्रेम-स्नेहाचे संबंध पुन्हा पुनरुज्जीवित करता येतील.  बाकीच्या सर्व आशियाशी अकस्मात संबंध तुटणे हा हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेचा एक दुर्दैवी परंतु अविस्मरणीय असा परिणाम आहे. *

परंतु अर्वाचीन इराणशी संबंध राहिला नसला तरी प्राचीन इराणचा व हिंदुस्थानचा झालेला एक जुना संबंध कायम आहे.  तेराशे वर्षांपूर्वी जेव्हा इस्लामी धर्म इराणात आला तेव्हा झोरोस्ट्रियन धर्माचे हजारो लोक आश्रयार्थ हिंदुस्थानात आले.  त्यांचे येथे स्वागत झाले व पश्चिमी किनार्‍यावर त्यांनी वसाहत करून तेथे ते आपल्या धर्माप्रमाणे, चालीरीतीप्रमाणे वागत राहिले.  त्यांना कोणी त्रास दिला नाही व तेही कोणाच्या भानगडीत पडले नाही.  ते पारशी गाजावाजा न करता मुकाट्याने हिंदी जीवनात मिळून गेले आहेत.  तेथेच त्यांनी आपले घर केले, परंतु आश्चर्य हे की त्यांची लहानशी जमात स्वतंत्र राहून त्यांनी आपले स्वतंत्र वैशिष्ट्य राखले आहे.  स्वत:च्या चालीरीतींना ते चिवटपणे धरून राहिले.  आपल्या विशिष्ट जातीतच बेटीव्यवहार ते करतात व जमातीबाहेर लग्ने फार विरळा आहेत.  परंतु आपल्या जातीतच लग्नसंबंध करण्याची चाल हिंदुस्थानात असल्यामुळे हिंदी जनतेला त्यात आश्चर्य वाटले नाही.  पारश्यांची संख्याही फार हळूहळू वाढत आली आणि आजही एक लाखाच्या आतच त्यांची लोकसंख्या आहे.  उद्योगधंद्यांत ते भरभराटलेले आहेत व हिंदी उद्योगधंद्यांत ते आघाडीवर आहेत.  इराणशी जवळजवळ त्यांचे संबंध आता नाहीतच.  ते पूर्ण हिंदी झाले आहेत; परंतु ते आपल्या प्राचीन परंपरेला धरून आहेत, प्राचीन मातृभूमीची स्मृती त्यांना अद्याप आहे.

इराणात इस्लामपूर्व प्राचीन संस्कृतीकडे दृष्टी ठेवण्याची पुन्हा एक नवीन लाट आली आहे.  धर्माशी या वृत्तीचा, या लाटेचा काही संबंध नसून ही इराणची अव्याहत सांस्कृतिक परंपरा आहे.  तिच्याविषयी अभिमान वाटावा व वाढवावा म्हणून संस्कृतीपुरती ही राष्ट्रीय चळवळ आहे.
---------------------------
*  प्रो. इ.जे. रॅमसन् लिहितो, ''हिंदुस्थानातील लहान लहान राज्ये एका सत्तेखाली आणून एक प्रभावी शासनतंत्र ज्यांनी येथे निर्माण केले ते आरमारीदृष्ट्या प्रबळ होते.  ब्रिटिशांच्या हातात समुद्रमार्ग असल्यामुंळे त्यांनी खुष्कीचे मार्ग बंद केले.  हिंदी साम्राज्याच्या हद्दीवर जे प्रदेश आहेत (अफगाणिस्थान, बलुचिस्थान, बर्मा) यांच्या बाबतीत ब्रिटिशांनी हे धोरण ठेवले.  याप्रमाणे राजकीय सत्ता एकमुखी झाल्या.  मागोमाग त्याचा अनिवार्य परिणाम म्हणून इतर देशांशी असलेले चालू राजकीय संबंधही तुटले.  राजकीय दृष्ट्या आशियापासून हिंदुस्थानने अलग राहण्याची ही पहिलीच वेळ.  हिंदी इतिहासात हे नवीनच होते.  भूतकाळापासून वर्तमानकाळाला अलग करणारी ही विशेष गोष्ट युगदर्शक घटना होय.'' -केंब्रिज हिंदुस्थानचा इतिहास- भाग पहिला, पृष्ठ ५२.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel