भूतकाळात आशियातील लोकांनी जे काही केले त्याचे ज्ञान झिरपत झिरपत युरोपच्या डोक्यात कधीकाळी शिरलेच तर त्या वेळेसही ते मोठ्या नाखुषीने स्वीकारले जाई. जाणूनबुजून कदाचित परंतु या ज्ञानाच्या स्वीकाराला त्यांचा विरोध असे, व काहीतरी करून ते आपल्या पूर्वीच्या चित्रात ते बसवून दाखवीत. विद्वानांचीसुध्दा ही तर्हा होती व अडाणी, सामान्य लोकांची तर पूर्व आणि पश्चिम यात मूलभूत फरक जमीन-आस्मानाएवढा आहे अशी मनापासून श्रध्दा होती. युरोपातील औद्योगित क्रांतीमुळे आणि तद्भुत भौतिक भरभराटीमुळे बहुजनसमाजाच्या मनातील हा समज अधिकच बळावला आणि मनची गोष्ट खरी करण्याच्या विचित्र बुध्दिवादाने ठरवून टाकले की, अर्वाचीन युरोप अमेरिकेचे ग्रीस राष्ट्र हे जन्मदाते आई किंवा बाप होते. जगाच्या भूतकाळाचे अधिक ज्ञान जसजसे होऊ लागले, तसतसा काही थोड्या विचारवंतांच्या मनातील कल्पनांना धक्का बसला. परंतु बहुजनसमाज जर पाहिला, त्यांच्यातील सुशिक्षित वा अशिक्षित पाहिले, तर ते जुनाट कल्पनाच हृदयाशी धरून बसलेले होते; त्याच्या मनाच्या वरच्या भागात त्याच भ्रामक गोष्टींचे तरंग नाचत असत व स्वत:साठी जे काही सुंदर निसर्गचित्र त्यांनी निर्माण केले होते, त्यात शेवटी हे सारे विलीन होई.
पौर्वात्य आणि पाश्चिमात्य ह्या शब्दांचा अर्थच मला कळत नाही. पाश्चिमात्य देशांनी अधिक औद्योगिक विकास करून घेतला आहे आणि पौर्वात्य ह्या बाबतीत फार मागासलेले आहेत हे खरे. परंतु ही औद्योगिक क्रांतीच मुळी जगाच्या इतिहासात नवीन आहे; पूर्वी कधीही कशाने झाला नव्हता इतका बदल ह्या क्रांतीमुळे जगात झाला आहे आणि रोज अधिक अधिक होत आहे. ग्रीक संस्कृती आणि आजची युरोपियन व अमेरिकन संस्कृती ह्यांच्यात जिवंत असा काहीच संबंध नाही. सुखी असणे ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट हा जो अर्वाचीन सिध्दांत सुखवाद आहे तो ग्रीक वाङ्मयात किंवा कोणत्याच प्राचीन वाङ्मयात दिसून येत नाही. ग्रीक, हिंदी, इराणी आणि चिनी लोक धर्म शोधीत होते; जीवनाचे तत्त्वज्ञान सदैव शोधीत होते; त्यांना असा धर्म आणि असे तत्त्वज्ञान पाहिजे होते की, ज्याचा सर्व जीवनावर, सर्व कर्मावर परिणाम होईल; ज्यामुळे एक प्रकारचा समतोलपणा आणि सुसंवादीपणा जीवनाला लाभेल. हे ध्येय त्यांच्या जीवनावर सर्वत्र दिसते. त्यांचे वाङ्मय पाहा; त्यांच्या कला, त्यांच्या संस्था पाहा, सर्वत्र हे ध्येय दिसेल आणि त्यामुळे एक प्रकारची प्रमाणबध्दता संपूर्णताही सर्वत्र आढळेल. आपली ही समजूत चुकीचीही असेल, ध्येय जरी असे असले तरी प्रत्यक्ष संसारात, जीवनात असा मेळ नसेलही. परंतु असे असले तरीही ग्रीकांचा आणि अर्वाचीन युरोपियनांचा व अमेरिकनांचा दृष्टिकोण किती भिन्न आहेत, दोहोत किती अंतर आहे हे समजून आल्याशिवाय राहणार नाही. युरोपियन व अमेरिकन लोक फुरसतीच्या वेळी ग्रीकांची स्तुतिस्तोत्रे गात बसतात, त्यांच्याशी दूरचा का होईना संबंध जोडू पाहात असतात, कारण मनाची एक प्रकारची हुरहूर, उत्कंठा त्यांना शांत करायची असते; अर्वाचीन जीवनाच्या रूक्ष वाळवंटात, दाहक परिस्थितीत कोठेतरी शांत निवारा, शीतल झरा त्यांना हवा असतो.