या शोधामुळे हिंदी नाट्यसृष्टीकडे बघण्याची एक नवीन दृष्टी आता मिळाली आहे.  अधिक शोधबोध झाल्यावर अधिकच प्रकाश या गोष्टीवर पडून भारतीय संस्कृतीच्या या अंगाचा कसकसा मनोहरविकास होत आला ते मग कळून येईल.  'भारतीय रंगभूमी' या आपल्या ग्रंथात सुप्रसिध्द फ्रेंच पंडित सिल्व्हॉ लेव्ही म्हणतो, ''संस्कृतीचे परमोच्च स्वरूप रंगभूमीवरच प्रकट होते, कारण नाटकातच खर्‍या जीवनाचा अर्थ स्पष्ट केलेला असतो.  जीवनाचे खरे स्वरूप, प्रतिबिंब नाटकातच दिसून येते.  बदलत्या परिस्थितीतील प्रवाह नाटकातच दिसून येतात आणि आजूबाजूच्या हजारो सटरफटर गोष्टींना फाटा देऊन त्या त्या काळातील प्रमुख वृत्तिप्रवृत्तींचे स्वरूप नाटकच दाखवीत असते.  नाटक म्हणजे तत्कालीन जीवनाचे प्राणमय प्रतीक.  भारताची प्रतिभा, अभिजात शक्ती, अत्युत्कृष्ट रीतीने प्राचीन भारतीय नाटकात प्रकट झाली आहेत.  भारतातील नाना मते, नाना संप्रदाय, नाना संस्था यांचे सम्मिलित आणि संहित स्वरूप या नाटकातून दिसून येते.''

युरोपाला भारतीय नाट्यकलेची पहिली ओळख कालिदासाच्या शाकुंतलाने झाली.  सर वुईल्यम जोन्स याने १७८९ मध्ये शाकुंतलाचे इंग्रजीत भाषांतर प्रसिध्द केले.  त्या भाषांतरामुळे युरोपियन पंडितांमध्ये एकच गडबड उडाली.  भारतीय नाट्यकलेचा तो नवा शोध होता.  भाषांतराच्या अनेक आवृत्त्या निघाल्या.  त्या भाषांतराची जर्मन, फ्रेंच, डॅनिश आणि इटालियन भाषांतून भाषांतरे झाली.  जर्मन महाकवी ग्योएथे हा तर वेडा झाला.  शाकुंतलाची त्याने अती स्तुती केली.  त्याने आपल्या फौस्ट या नाट्यमय महाकाव्याला जो उपोद्धात लिहिला आहे, त्याची कल्पना शाकुंतलातील संस्कृत नाट्यशास्त्राच्या नियमाप्रमाणे असलेल्या उपोद्‍घातारून त्याला आली असे म्हणतात.*

कालिदास हा संस्कृत वाङ्मयातील सर्वांत थोर असा कवी व नाटककार मानला जातो.  प्रो. सिव्ल्हॉ लेव्ही म्हणतो, ''हिंदी काव्याकाशात कालिदासाचे नाव परम तेजाने तळपत आहे.  त्याने काव्यप्रांतात आपले प्रभुत्व स्थापिले आहे.  साहित्याचा तो सम्राट आहे.  त्याच्या अपूर्व प्रतिभेची शक्ती आजही परिणाम करीत आहे.  नाट्यशक्ती आणि काव्यशक्तीचा दुर्मिळ संगम त्याच्या ठायी होता.  सरस्वतीच्या एखाद्याच परमभक्ताला अशी अपूर्व देणगी प्राप्त होत असते.  कालिदासाने हिंदुस्थानाला ज्याचा सदैव अभिमान वाटेल असे अमर नाटक
-------------------
*  प्राचीन भारतीय वाङ्मय यांची ज्यात स्तुती आहे असे पाश्चिमात्य पंडितांचे उतारे देण्याची भारतीय लेखकांची प्रवृत्ती आहे.  मीही त्या प्रवृत्तीला बळी पडलो आहे.  स्तुतिमय उतार्‍यांप्रमाणे टीकेने भरलेले उतारेही भरपूर देता येतील.  अठराव्या व एकोणिसाव्या शतकात युरोपियनांना भारतीय विचारांचा व वाङ्मयाचा शोध लागला.  ते अतिशयोक्तीने लिहू, बोलू लागले, कौतुक करू लागले, स्तुती करू लागले.  युरोपियन संस्कृतीमध्ये कसली तरी उणीव त्यांना भासत असावी, आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा शोध लागताच मनोबुध्दीची हृदयाची ती भूक शांत झाली असावी.  म्हणून हे धन्योद्गार.  परंतु हा पहिला पूर ओसरून प्रतिक्रिया सुरू झाली व टीका होऊ लागून ते भारतीय विचाराकडे साशंकतेने पाहू लागले.  हिंदी तत्त्वज्ञान भोंगळ आहे, त्यात नीट व्यवस्थितपणा नाही असे त्यांना वाटू लागले.  तसेच हिंदी समाजरचनेतील जातिभेदांची लोखंडी चौकट पाहूनही त्यांना तिटकारा येऊ लागला.  भारतीय वाङ्मयाची अपूर्ण ओळख असल्यामुळेच अवास्तव स्तुती व अवास्तव तिटकारा यांचा जन्म झाला होता.  स्वत: ग्योएथेही कधी हे मत प्रतिपादी तर कधी ते.  पाश्चिमात्य संस्कृतीला भारतीय विचाराने प्रचंड धक्का दिल्याचे जरी त्याने मान्य केले तरी त्याचे दूरवर परिणाम होतील असे मानायला तो कधी तयार होत नसे.  हिंदुस्थानच्या बाबतीत युरोपियन पंडितांनी अशी ही द्विधा वृत्ती असे.  लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे.  हिंदुस्थानकडे सहानुभूतीने व स्नेहाने पाहण्याचा अधिक समन्वयी प्रयत्न रोमा रोलाँ याने केला.  रोमा रोलाँ हा स्वत: युरोपियन संस्कृतीचा एक उत्तम आदर्श, युरोपियन संस्कृतीतील जे जे उत्तम त्याची मूर्ती होता.  पूर्व काय किंवा पश्चिम काय, मानवी आत्म्याची जी चिरंतत धडपड त्याचीच ती विविध रूपे आहेत असे तो मानी.  या विषयावर विश्वभारती विद्यापीठातील श्री. अलेक्स आरोन्सन यांनी 'भारतीय विचारासंबंधीची पाश्चिमात्यांची प्रतिक्रिया' या पुस्तकात अधिकारवाणीने लिहिले आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel