आध्यात्मिक प्रश्नांची विद्वत्तापूर्वक चर्चा करीत बसू नका म्हणून बुध्दांनी पुन:पुन्हा सावध राहण्याची सूचना दिली होती. 'ज्या बाबतीत आपणांस काही सांगता येत नसते, त्या बाबतीत आपण बोलू नये,' असे ते एकदा म्हणाले होते असे सांगतात. सत्य हे जीवनातच शोधायचे असते, जीवनातील गोष्टींची चर्चा करून, मानवी बुध्दीच्या अतीत असणार्या प्रश्नांचा केवळ शाब्दिक उहापोह करून सत्य सापडत नसते. आध्यात्मिक शास्त्रातील सूक्ष्म चर्चेत लोक अधिक गुंतले होते, त्यामुळे जीवनातील नैतिक तत्त्वाकडे कोणाचे फारसे लक्ष नसे, व त्या तत्त्वांची हानी होत होती म्हणून बुध्दांनी नीतीवर अधिक भर दिला. आरंभी आरंभी तरी काही काळ बुध्दांची बुध्दिप्रधान आणि तत्त्वजिज्ञासूवृत्ती बौध्दधर्मात राहिली होती, आणि अनुभवाच्या आधारावर तत्त्वान्वेषण केले जाई. इंद्रियगोचर असे सारे अनुभव पाहिले तर इंद्रियातीत अशा शुध्दबुध्द चैतन्याची कल्पना करणे अशक्य आहे असे ठरवून ती कल्पना त्यांनी टाकून दिली व तर्काने सिध्द न होणारा जगत्कर्ता परमेश्वरही त्यांनी मानला नाही. राहता राहिला अनुभव. हा अनुभव एका अर्थी सत्य नाही का ? परंतु अनुभव म्हणजे तरी काय ? सतत बदलत जाणारी एक प्रक्रिया. त्या त्या क्षणापुरती त्या अनुभवाला सत्यता. दुसर्या खणी तसाच तो आहे कोठे ? सत्यतेचे हे तत्तत्क्षणानुवर्ती अस्तित्व त्यांनी मान्य केले. आणि मानसशास्त्रदृष्ट्या या मुद्दयावर त्यांनी आणखी पुढे संशोधन चालविले.
बुध्द बंडखोर असले तरी देशाचा प्राचीन धर्म त्यांनी सर्वस्वी झुगारून दिला असे क्वचितच घडले. श्रीमती र्हिस डेव्हिडस म्हणतात, ''गौतम हिंदू म्हणून जन्माला आले, हिंदू म्हणूनच वाढले व जगले आणि ते हिंदू म्हणूनच मेले. गौतमाच्या अध्यात्मात किंवा तत्त्वात असे काहीही नाही की जे कोणत्या तरी हिंदुधर्माच्या संप्रदायात किंवा दर्शनात सापडणार नाही; आणि त्यांनी नीतीवर जसा भर दिला तसा भर दिलेला आपणांस बुध्दपूर्वकालीन ग्रंथांत व नंतरच्या ग्रंथांतही दिसून येईल. गौतमाचे स्वतंत्र वैशिष्ट्य हे की त्यांनी एका विशेष पध्दतीने, जे आधीच दुसर्यांनी नीट सांगितले होते, त्याचा स्वीकार व विस्तार केला. त्यात अधिक उदात्तता, प्राणमयता ओतली; त्यात नीट व्यवस्था निर्माण केली. महान भारतीय विचारवंतांनी, ॠषिमुनींनी जी समतेची व न्यायाची तत्त्वे प्रतिपादली होती, ती प्रत्यक्षात आणण्याचे काम केले. बुध्द आणि इतर उपदेशक यांच्यात एकच फरक होता. बुध्दमध्ये तळमळ होती. पराकाष्ठेची कळकळ होती; उदार भूतदया व व्यापक प्रेम त्यांच्याजवळ होते, हा त्यांचा खरा विशेष होय.'' *
ते काही असले तरी स्वत:च्या काळातील अनेक रूढ धार्मिक आचारविचारांविरुध्द बुध्दांनी बंडाचे बी सर्वत्र पेरले यात शंका नाही. बुध्दांचा दर्शनाला, तत्त्वज्ञानाला फारसा विरोध नव्हता, कारण जोपर्यंत ते केवळ एक दर्शन, एक वैचारिक प्रक्रिया एवढेच होते तोपर्यंत त्याला इतर कोणत्याही तत्त्वज्ञानाप्रमाणे स्वत:चे प्रतिपादन करायला पूर्ण वाव असे, विरोध होत होता तो सामाजिक व्यवस्थेच्या बाबतीत त्याने ढवळाढवळ केली, सामाजिक जीवनाला त्याने धक्का लावला म्हणून होता. जुनी सनातन पध्दती लवचिक होती; परंतु तो लवचिकपणा, ती सहिष्णुता फक्त विचारापुरती होती. प्रत्यक्ष आचारात कडवेपणा असे. रुढ आचाराविरुध्द वागणे सहन केले जात नसे म्हणून बौध्दधर्म प्राचीन धर्मापासून अलग झाला. तसे होणे अपरिहार्यच होते. बुध्दांच्या मरणानंतर अंतर अधिकच वाढत गेले, भेद दुरावत गेले.
----------------------
* हा उतारा आणि इतरही काही मजकूर सर एस. राधाकृष्णन यांच्या 'भारतीय तत्त्वज्ञान' यातून घेतला आहे (जॉर्ज अॅलन आणि अन्विन-लंडन १९४०.)