तरी आपल्या या प्रत्यक्ष जगात नैतिक तत्त्वांना निरपवाद आणि नि:शंक असे मूल्य आहे, असे बौध्दधर्म आग्रहपूर्वक बजावतो व आणखी सांगतो की, म्हणून संसारात वागताना, मानवाशी संबंध राखताना आपण नीतीला धरून वागले पाहिज, भले जीवन जगले पाहिजे.  ह्या आपल्या जीवनासंबंधी किंवा सभोवारच्या घटनामय जगासंबंधी विचार करताना आपल्याला आपली बुध्दी, ज्ञान व अनुभव यांचा उपयोग करणे शक्य आहे व तो तसा करावा.  परंतु अनंत म्हणा की ब्रह्म म्हणा किंवा आणखी काही म्हणा, जे काहीतरी कोठेतरी आहे, ते अगम्य आहे म्हणून त्यासंबंधात बुध्दी, ज्ञान, अनुभव यांचा उपयोग शक्य नाही.

बौध्द धर्माचा हिंदू धर्मावर परिणाम

जुन्या आर्यधर्मावर, लोकांच्या रूढ धार्मिक समजुतीवर बौध्दधर्माचा काय परिणाम झाला? धार्मिक आणि राष्ट्रीय जीवनावर बुध्दांच्या शिकवणुकीचे चिरंजीव प्रभावी परिणाम झाले आहेत यात शंका नाही.  स्वत:ला एक सुधारक म्हणून ते समजत असतील परंतु त्यांचे त्यांनी आपल्या शिकवणीने चढविलेले हल्ले क्रांतिकारक होते.  त्यामुळे स्थिरावलेल्या, दृढमूल झालेल्या उपाध्येगिरीशी निश्चितपणे त्यांचा संघर्ष आला.  रूढ सामाजिक किंवा आर्थिक व्यवस्थेचे उच्चाटन करण्यासाठी मी आलो आहे असे त्यांनी कधी म्हटले नाही.  मूलभूत तत्त्वेही त्यांनी अंगिकारिली.  परंतु त्यांच्यात जी घाणा शिरली होती, तेथे जे विषारी रान माजले होते, त्या सर्वांवर त्यांनी शस्त्र धरले.  परंतु त्यांच्या मनात असो नसो, ते एक सामाजिक क्रांतिकारक झाले.  त्यामुळेच ब्राह्मणवर्ग त्यांच्यावर खवळला. ब्राह्मणांना परंपरागत सामाजिक आचारविचार तसेच चालू राहावेत असे वाटे.  हिंदुधर्मातील व्यापक व विशाल विचारसृष्टीशी बुध्दांच्या शिकवणीचा मेळ घालता न येण्यासारखे त्यात खरोखर काही नाही.  परंतु ब्राह्मणांच्या वर्चस्वाला धक्का लागला त्यामुळे सारे बिनसले.

जेथे ब्राह्मणधर्म प्रबळ नव्हता अशा मगध प्रांतात प्रथम बौध्दधर्म स्थिरावला हे लक्षात घेण्यासारखे आहे.  हळूहळू उत्तरेकडे व पश्चिमेकडे तो पसरला आणि काही ब्राह्मणांनीही तो स्वीकारला.  आरंभी ही क्षत्रिय चळवळ होती.  परंतु सर्वसामान्य जनतेलाही ती पटण्याजोगी होती.  परंतु पुढे ब्राह्मणही या धर्मात आले आणि बहुधा त्यामुळे तात्त्विक आणि आध्यात्मिक वळणावर हा धर्मही गेला.  या ब्राह्मणांमुळेच बौध्द धर्मातील महायान संप्रदाय निघाला असावा.  कारण काही गोष्टींत, विशेषत: आर्यधर्मातील विविधतेशी आणि विविधतेला वावरू देणार्‍या व्यापक सहिष्णुतेशी महायान पंथाचे साम्य आहे.

बौध्दधर्माने शेकडो प्रकारे हिंदी जीवनावर परिणाम केला आहे.  तसे होणे साहजिकच होते, कारण जवळ जवळ हजार एक वर्षे जो एक चालू, जिवंत प्रभावी धर्म म्हणून देशभर पसरला होता, पुढे कित्येक शतके जरी तो हळूहळू नाहीसा होत होता व शेवटी येथून नाहीसाही झाला, तरी त्यातील कितीतरी भाग हिंदुधर्माचा होऊन बसला आहे.  जीवनाच्या आणि विचाराच्या राष्ट्रीय स्वरूपात बौध्दधर्मातील शिकवण शतरूपांनी कायमची टिकली आहे, एकरूप होऊन गेली आहे.  लोकांनी धर्म म्हणून बौध्दधर्म सोडला तरी त्याचा पक्का, कायमचा ठसा त्यांच्या जीवनावर राहिला आणि तद्‍नुरूप त्यांच्या जीवनाचा विकासही झाला.  हा जो चिरपरिणाम झाला त्याचा तत्त्वज्ञानाशी, धार्मिक श्रध्देशी, मतांशी काही संबंध नाही.  बुध्द आणि त्यांचा धर्म यातील नैतिक, सामाजिक आणि प्रत्यक्ष व्यवहारातील ध्येयवादाचा भारतीय जनतेवर परिणाम होऊन त्याची खूण टिकून राहिली.  युरोपात ख्रिश्चन धर्मातील ठरीव, कठोर साच्याच्या मताकडे जरी जनता लक्ष देत नसली तरी त्यातील नैतिक आदर्शाचा ज्याप्रमाणे तेथील जनतेवर परिणाम झाला किंवा इस्लामी धर्मातील मानवी आणि सामाजिक, व्यवहारी दृष्टीचा ज्याप्रमाणे अनेक देशांतील लोकांवर परिणाम झाला, त्याप्रमाणे बौध्दधर्माचा भारतीय जीवनावर अमर परिणाम झालेला आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel