सत्यकाम हा जबालेचा मुलगा. गौतमाचे शिष्यत्व पत्करण्याची सत्यकामास इच्छा होती. (हा गौतम म्हणजे गौतम बुध्द नव्हे) घर सोडून जाताना त्याने आईला विचारले, ''मी कोणत्या गोत्रातला ?'' त्याची आई म्हणाली ''तू कोणत्या गोत्रातला, कुळातला हे मला माहीत नाही. मी तरुण असताना वडिलांच्या घरी येणार्या अनेक पाहुण्यांचा मला पाहुणचार करावा लागे आणि तुझा माझ्या पोटी जन्म झाला. तू कोणत्या कुळातला ते मला माहीत नाही. माझे नाव जबाला, आणि तुझे सत्यकाम. सत्यकाम जाबाला असे स्वत:चे नाव तू सांग.''
सत्यकाम गौतमाकडे गेला. ॠषीने कुलगोत्र विचारले. आईच्या शब्दांत त्याने उत्तर दिले. तेव्हा आचार्य म्हणाले, ''ब्राह्मणाशिवाय असे सत्य कोण बोलणार ? जा बाळ, समिधा आण. मी तुला दीक्षा देतो. तू सत्यापासून च्युत झाला नाहीस.''
बहुधा बुध्दांच्या काळी ब्राह्मणजातच अधिक बंदिस्त झालेली असावी. क्षत्रियही स्वत:च्या वंशाचा, कुळाचा अभिमान बाळगत. परंतु वर्गाच्या दृष्टीने, जात म्हणून राज्यसत्ता हाती घेणार्या नव्या नव्या कुटुंबांना, व्यक्तींना ते स्वत:त मिळवून घेत. बाकी इतर लोक वैश्य होते, ते शेतीचा सन्मान्य धंदा मुख्यत: करीत. आणखीही काही निरनिराळे धंदे करणार्या जाती होत्या. ज्यांना जातिविहीन, वर्णातीत म्हणत असे अपृश्य फारच थोडे असावेत. काही वन्य लोक, तसेच मृत देहांची व्यवस्था लागणारे यांना ही संज्ञा दिली गेली असावी.
जैन आणि बौध्दधर्म यांनी अहिंसेवर भर दिल्यामुळे शेतीचा धंदा कमी प्रतीचा मानला जाऊ लागला. कारण त्या धंद्यात पुष्कळ वेळा प्राणहत्या घडे. आरंभी इंडो-आर्यन लोकांना शेतीच्या धंद्याचा जरी अत्यंत अभिमान असे आणि या धंद्याला जरी मूलभूत महत्त्व होते तरी एकंदरीत सामाजिक सोपानावरचे कृषिवलांचे स्थान खालच्या दर्जाचे झाले ही गोष्ट देशातील काही भागापुरती खरी.
अशा रीतीने ज्या बौध्दधर्माने भिक्षुशाहीविरुध्द, नाना विधिवितानांविरुध्द बंड पुकारले होते; कोणालाही तुच्छ मानू नये, तिरस्कारू नये, सर्वांच्या विकासाला संधी असावी हे ज्याचे म्हणणे, उच्चतर जीवनाकडे जाण्याची संधी सर्वांना लाभवी म्हणून ज्याचा अट्टाहास, त्याच बौध्दधर्माचा अप्रत्यक्ष परिणाम हिंदुस्थानात असा झाला की कोट्यवधी कृषिवल खालच्या दर्जाचे मानण्यात येऊ लागले. याला बौध्दधर्म जबाबदार धरणे चूक आहे. कारण इतरत्र असे परिणाम झाले नाहीत. आमच्या चातुरर्वर्ण्यात, या जातिभेदातच असे काहीतरी असावे की ज्यामुळे असा परिणाम झाला. अहिंसेवर जैनधर्माची अत्यंत निष्ठा म्हणून त्याने, आणि नकळत बौध्दधर्माने चातुरर्वर्ण्याला या गोष्टीकडे लोटीत नेले.
हिंदुधर्माने बौध्दधर्म आत्मसात कसा केला ?
आठनऊ वर्षांपूर्वी मी पॅरीसमध्ये असताना आंद्रे मालरोंशी माझे संभाषण होत असे तेव्हा अगदी आरंभीच त्याने मला एक चमत्कारिक प्रश्न विचारला. त्याने विचारले, ''चांगल्या सुसंघटित बौध्दधर्माला एक हजार वर्षांपूर्वीच्या त्या काळात काही मोठी रणकंदन न करता हिंदुस्थानातून बाहेर काढून देण्याचे सामर्थ्य हिंदुधर्मात कोणत्या गुणामुळे आले ? हिंदुधर्माने बौध्दधर्माप्रमाणे सर्वत्र पसरलेला प्रबळ धर्म इतर देशांतील इतिहासांना कलंकित करणार्या लढाया वगैरे न करता आत्मसात केले, हे कसे झाले ? हिंदुधर्मात त्या वेळेस अशी कोणतीही शक्ती किंवा प्राणमयता होती की ज्यामुळे त्याला हा असा पराक्रम करता आला ? ही शक्ती हिंदुस्थानजवळ आजही आहे का ? जर असेल तर हिंदुस्थान नक्की स्वतंत्र्य होईल, पुन्हा वैभवशाली होईल यात शंका नाही.''