ब्राह्मणधर्म आणि बौध्दधर्म यांच्या परस्परांवर क्रियाप्रतिक्रिया होत होत्या, आणि त्यांच्यात काही तात्त्विक किंवा वैचारिक संघर्ष असले तरीही, किंवा ते संघर्ष होते म्हणूनच हे दोन्हीही धर्म एकमेकांच्या अधिकच निकट आले. तत्त्वज्ञान म्हणा किंवा सामान्य जनतेचे धार्मिक प्रकार म्हणा, दोन्ही बाबतींत बौध्दधर्म किंवा हिंदुधर्म जवळजवळ येत राहिले. महायान पंथाचे तर ब्राह्मणी धर्मपध्दतीशी अधिकच साधर्म्य झाले. महायान पंथ वाटेल त्याच्याशी तडजोड करायला तयार असे, आपल्या नैतिक पार्श्वभूमीला मात्र तो जपे. ब्राह्मणधर्माने बुध्दाला अवतार करून टाकले, त्यांना देवत्व दिले. बौध्दधर्मानेही त्याप्रमाणे केले. महायान पंथ झपाट्याने पसरला. परंतु प्रसार झाला तर इकडे त्यातील गुणसंपदा व त्यांची वैशिष्टये कमी झाली. भिक्षूंचे मठ, संघाराम धनकनसंपन्न झाले, मिरासदारीची केंद्रे बनले; त्यांची शिस्तही ढिली झाली. मंत्रतंत्र, जादूटोणा इत्यादी गोष्टी बहुजनसमाजाच्या धार्मिक पूजाविधींत हळूच शिरल्या. बौध्दधर्माचा पहिला बहर, ते पहिले सुवर्णयुग ओसरले होते, आणि त्यानंतर हळूहळू उतरती कळाच लागली. त्या काळातील बौध्दधर्माच्या जीर्णशीर्ण शक्तीविषयी श्रीमती र्हिस डेव्हिड्स लिहितात, ''नाना प्रकारच्या रोगट कल्पनांची जाळी इतकी पसरली की त्यामुळे गौतमाने दिलेली उदात्त शिकवण दिशेनाशी झाली. कितीतरी नवीन नवीन विचारसरणी जन्माला आल्या. वादविवाद, चर्चा, काथ्याकूट यांना ऊत आला. सारे विचाराकाश मेंदूतून निघालेल्या खोट्यानाट्या कल्पनांनी भरून गेले. आध्यात्मिक क्षेत्रातील शाब्दिक झगझगाटाखाली धर्मस्थापकांची साधी, सुंदर, उदात्त शिकवण पार लोप पावली.''*
ज्या वेळेस हिंदुस्थानात सामाजिक आणि धार्मिक नवजीवनाची चळवळ सुरू झाली होती, त्याच वेळेस बौध्दधर्माचा जन्म झाला. जनतेत त्याने नवीन प्राण ओतला; जनतेतील सुप्त शक्तीचे झरे त्याने प्रकट केले. नवीन बुध्दी, नवीन नेतृत्वाची पात्रता निर्माण झाली. अशोकाच्या छत्राखाली हा धर्म दूरवर पसरला व हिंदुस्थानचा तो प्रभावी धर्म बनला. दुसर्या देशांतही त्याचा प्रसार झाला. विद्वान बौध्दधर्मी पंडितांची तेथे ये-जा सुरू झाली. प्रवाशांची ही यात्रा कित्येक शतके सुरू होती. बुध्दांच्या जन्मानंतर हजार वर्षांनी पाचव्या शतकात जेव्हा चिनी यात्रेकरू फा-हिआन हिंदुस्थानात आला, तेव्हा बौध्दधर्म तेथे भरभराटलेल्या स्थितीत त्याला आढळला. परंतु पुढे दोनशे वर्षांनी जेव्हा तो सुप्रसिध्द यात्रेकरू ह्यू-एन् त्संग आला तेव्हा बौध्दधर्माची अवनत स्थिती त्याला दिसून आली, तरीही काही ठिकाणी त्याचे त्या वेळेस प्राबल्य होते. हळूहळू कितीतरी बुध्दधर्मी भिक्षू आणि पंडित हिंदुस्थान सोडून चीनकडे निघून गेले.
याच सुमारास चौथ्या व पाचव्या शतकांत गुप्त साम्राज्यात ब्राह्मणी धर्माचे व प्राचीन भारतीय कलांचे पुनरुज्जीवन होऊन भरभराटीचा काळ आलेला होता. गुप्त राजवट
-----------------------
* राधाकृष्णन यांच्या 'भारतीय तत्त्वज्ञान' या ग्रंथातून, हेच वर्णन तत्कालीन ब्राह्मणधर्म आणि त्याच्या नाना शाखोपशाखा यांनाही लागू पडेल. तेथेही त्या काळी 'रोगट कल्पना' व मेंदूतून निघालेल्या 'खोट्यानाट्या कल्पना' यांनी त्राहि भगवन् करून सोडले होते.