आध्यात्मिक शास्त्राच्या कल्पना व सिध्दान्त यांचा विषय पदोपदी बदलणारे जीवन नसून जर कोठे शाश्वत सत्य असेलच तर ते आहे म्हणून त्यांना एक प्रकारचे चिरंजीवित्व असते, बाह्य फरकांचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नसतो. परंतु ज्या काळात या कल्पना व हे सिध्दान्त जन्मतात, त्या काळातील त्यांच्या जन्मदात्या मानवी मनाच्या विकासानुरूप ती असतात, त्या त्या काळाचा ठसा त्यांच्यावरही असतो. त्यांचा प्रभाव पसरला तर त्या त्या देशातील लोकांच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीवरही त्याचा परिणाम होतो. हिंदुस्थानात तत्त्वज्ञानाच्या अधिक गहन भागात जरी थोडेसेच महाभाग रमताना दिसते तरी सर्वसाधारण तत्त्वज्ञान खालच्या थरापर्यंत जाऊन पोचलेले आढळते, आणि त्यामुळे येथील राष्ट्रीय दृष्टीला एक विशिष्ट वळण मिळाले आहे; मनाची एक विशिष्ट ठेवण बनली आहे.
हे वळण देण्याच्या कार्यात बौध्दधर्मीय तत्त्वज्ञानाचा मोठा भाग आहे. मध्ययुगात इस्लामी धर्मानेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने राष्ट्रीय दृष्टीवर आपला ठसा उमटवला आहे. हिंदुधर्म आणि इस्लामी धर्म यांतील सामाजिक घटना व विचार यांतील अंतर कमी करण्यासाठी जे नाना संप्रदाय त्या काळात निर्माण झाले त्यांनी हे कार्य केले आहे. परंतु हिंदी दृष्टी बनविण्यात जास्तीत जास्त भाग षड्दर्शनांचा आहे. या षड्दर्शनांतील काहीवर बौध्द मताचा परिणाम झालेला आहे. ही षड्दर्शने सनातन धर्माची म्हणून मानली जातात; त्यांच्यात काही समान विचार असले तरी प्रत्येकाची दृष्टी आणि निर्णय ही भिन्न भिन्न आहेत. त्यात अनेक देवतावादही आहे, सगुण एकेश्वरीवाद आहे, केवळ अद्वैतवाद आहे, देवाला अजिबात फाटा देऊन उत्क्रान्तितत्त्वावर आधारलेली अशीही एक विचारप्रक्रिया आहे. येथे कल्पनावाद आहे, यथार्थवादही आहे. संग्राहक अशा भारतीय मनाचे बहुविध स्वरूप येथे दिसून येईल. येथे एकता आहे, अनेकता आहे, सारे काही आहे, सारे पैलू येथे दिसतील. मॅक्समुल्लरने म्हटले आहे, ''मी जसजसा विचार करतो तसतशी अधिकच माझी खात्री पटते की, जनतेत सर्वत्र प्रचलित असलेल्या राष्ट्रीय तत्त्वज्ञानातून, जनतेच्या वैचारिक संग्रहातून या षड्दर्शनांनी भरपूर घेतलेले आहे, प्रत्येक विचारकर्त्याने स्वत:च्या हेतूसाठी, दृष्टीसाठी जनतेत पसरून राहिलेल्या विचारसागरातून लागेल तेवढे उचलून वापरले आहे.''
या षड्दर्शनांत सर्वांनीच एक गोष्ट गृहीत धरलेली दिसते. हे विश्व व्यवस्थित आहे, त्याच्यात एक प्रकारची तालबध्दता आहे, नियमानुसार ते चालते, अशी काहीतरी गोष्ट गृहीत धरावीच लागते. नाहीतर या विश्वाचा उलगडा करून दाखविणारे तत्त्वज्ञानच अशक्य आहे. कार्यकारणभावाचा नियम जरी अटळ आहे, तरी स्वत:चे भवितव्य घडवायला व्यक्तीला काही स्वातंत्र्यही आहे. पुनर्जन्म आहे, नि:स्वार्थ प्रेम आणि निष्काम कर्म यावर भर आहे. परंतु तर्क आणि बुध्दी यांचा आधार घेऊन खंडनमंडन भरपूर केलेले आहे. परंतु तर्क आणि बुध्दी यांच्याहूनही अनुभूती किंवा अंत:पूर्ती पुष्कळ वेळा अधिक मोलाची असे म्हटले आहे. पुष्कळ ठिकाणी नुसता युक्तिवाद उपयोगी नसतो. अशा या तत्त्वज्ञान विषयातही सामान्यत: एकंदर प्रतिपादन बुध्दिगामी असे असते. प्रोफेसर कीथ म्हणतो, ''ही षड्दर्शने श्रुती मानतात, सारी वेदप्रामाण्यवादी आहेत. परंतु मानवी साधने वापरून जीवनाच्या प्रश्नावर ती हल्ले चढवितात. वेदांचा उपयोग वेदांना दूर सारून स्वत:च्या तर्काने व बुध्दीने जो निर्णय सिध्द झाला, व ज्याला वेदांचा घेतलेला आधार क्वचित क्वचित शंकास्पद वाटतो त्यालाही शेवटी श्रुतीचीही संमती आहे असे दाखवून एक प्रकारचे पावित्र्य देण्यापुरताच केला जात असे; असा वेदांचा व्यावहारिक उपयोग होता. बाकी सारे बुध्दीनेच चाले.''