षड्दर्शने
भारतीय दर्शनांचे पहिलेवहिले आरंभ पाहायला बुध्दपूर्व काळात गेले पाहिजे. ब्राह्मणधर्मी दर्शने आणि बौध्दधर्मी दर्शने शेजारी वाढत होती, एकमेकांवर टीका करीत होती, एकमेकांपासून उसनवारी करीत होती. ख्रिश्चन सनाआधीच ब्राह्मणी षड्दर्शने अनेक मतामतांच्या मंथनातून आकार येऊन निश्चित स्वरूपात दृढ झाली होती. प्रत्येक दर्शनाची स्वतंत्र दृष्टी आहे, स्वतंत्र प्रमाणे आहेत, आणि तरीही ती एकमेकांपासून सर्वस्वी अलग नाहीत, एका विशाल व व्यापक योजनेचे हे भाग आहेत असेच वाटते.
या षड्दर्शनांची नावे पुढीलप्रमाणे आहेत—
१. न्याय, २. वैशेषिक, ३. सांख्य, ४. योग, ५. मीमांसा, ६. वेदान्त.
न्यायपध्दती पृथक्करणात्मक आहे, तर्कानुसारी आहे. न्याय या शब्दाचा अर्थच मुळी तर्कशास्त्र, निर्दोष बुध्दिवादाचे शास्त्र, अॅरिस्टॉटलच्या प्रमाणभूत सिध्दान्त पध्दतीशी तिचे साम्य आहे, काही मूलभूत फरकही आहेत. न्यायशास्त्रातील काही मूलभूत तत्त्वे, प्रतिपादनाच्या कल्पना, सर्वच शास्त्रांनी उचलली आहेत. त्यामुळे हिंदुस्थानातील विद्यापीठे व पाठशाळांतून प्राचीन काळापासून तो तहत आतापर्यंत बुध्दीला वळण व धार देण्याकरता न्यायशास्त्राचे अध्ययन सारेच करीत. हिंदुस्थानातील अर्वाचीन शिक्षणाने ते सोडले आहे. तरीही जेथे जेथे संस्कृत भाषेचे जुन्या पध्दतीने अध्ययन केले जाते, तेथे तेथे न्यायाचेही अध्ययन अभ्यासक्रमात ठेवलेले असते- तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठीच म्हणून नव्हे, तर एक प्रकारचे मानसिक शिक्षण म्हणून सर्वच सुशिक्षितांना या शास्त्राचा अभ्यास आवश्यक आहे असे मानण्यात येई. युरोपातील शिक्षणात अॅरिस्टॉटलच्या तर्कशास्त्राला जे स्थान असे तेच स्थान प्राचीन हिंदी शिक्षणप्रणालीत न्यायशास्त्राला होते.
प्रत्यक्ष संशोधनाच्या अर्वाचीन शास्त्रातील प्रायोगिक पध्दतीहून ही न्यायशास्त्रपध्दती अर्थात अगदी निराळी होती. तथापि ती आपल्यापरी चिकित्सक व शास्त्रीय अशी होती. केवळ श्रध्देवर व विसंबता ज्ञेय वस्तूंचे नीट परीक्षण करण्यासाठी, त्यांची चिकित्सा करून तर्काधिष्ठित प्रमाणांच्या आधाराने पायरीपायरीने न्यायशास्त्र चालले. या दर्शनाच्या मुळात काही श्रध्देचाही भाग होता, तर्कपध्दती वापरणे अशक्य असे काही गृहीत सिध्दान्त होते. न्यायदर्शन काही सत्ये स्वत: सिध्द धरून चालले आणि या गृहीत सत्यांच्या आधारावर हे दर्शन रचण्यात आले. जीवनात आणि निसर्गात ऐक्य आहे, तालबध्दता आहे असे गृहीत धरण्यात आले. सगुण परमेश्वर आहे अशी श्रध्दा होती. जीवांचे अनेकत्व आणि विश्वाची अणुमय रचना या गोष्टीही मानल्या गेल्या. व्यक्ती म्हणजे केवळ आत्मा नव्हे, केवळ शरीरही नव्हे; दोहोंचा समन्वय म्हणजे हा जीव. सत्य म्हणजे आत्मा व सृष्टी यांचे मिळून झालेले आहे, अनेक वस्तुघटित आहे असे मानले जाई.
वैशेषिक आणि न्याय यांच्यात बरेचसे साम्य आहे. व्यक्ती आणि वस्तू यांच्या अलगअलगपणावर वैशेषिकांनी अधिक भर दिला व अणुसिध्दान्ताचीही त्यांनी वाढ केली. नैतिक नियमान्वये हे चराचर विश्व चालले आहे. या कायद्याचे नाव धर्म. या धर्माभोवती सारे विश्व फिरत आहे. ईश्वरासंबंधी स्पष्ट होकार असा नाही. आरंभीचे बौध्द तत्त्वज्ञान आणि ही न्याय-वैशेषिक मते यांच्यात काही काही साम्य आहे. एकंदरीत न्याय आणि वैशेषिक दर्शनांची दृष्टी यथार्थवादी आहे असे म्हटले तरी चालेल.