बगदादमध्ये अल-मन्सूर हा खलिफा असताना हिन्दुस्थानातून अनेक विद्वान लोक तेथे गेले. (इ.स. ७५३ ते ७७४ ही मन्सूरची कारकीर्द) हिंदी पंडितांनी बरोबर नेलेल्या ग्रंथांत गणित आणि ज्योतिष यांचेही ग्रंथ होते. त्या काळात आधीच हिन्दी आकडे बगदादपर्यंत पोचले होते, परंतु त्या काळात तर व्यवस्थित संबंधच सुरू झाला. आर्यभट्टाचे आणि आणखी इतर ग्रंथकारांचे ग्रंथ अरबी भाषेत भाषांतरित केले गेले व अरबी दुनियेतील गणित शास्त्राची आणि ज्योतिषाची यामुळे झपाट्याने वाढ झाली. बगदाद हे त्या वेळचे विद्येचे मोठे केंद्र होते. ग्रीक आणि ज्यू पंडित ग्रीक तत्त्वज्ञान, गणित आणि विज्ञान घेऊन तेथे आले होते. बगदादचे सांस्कृतिक वर्चस्व मध्ये आशियापासून तो स्पेनपर्यंत होते. हिंदी गणिताची अरबीतील भाषांतरे या सर्व विस्तृत भागावर पसरली. हिंदी अंकांना अरब लोक (हिंदी चिन्हे) किंवा कधी कधीी नुसते हिंद असेही म्हणत. संख्येला अरबी शब्द अजूनही ''हिंदूस'' असा आहे. त्याचा अर्थ ''हिंदुस्थानातून'' असा आहे. अरबी जगातून या नव्या गणितशास्त्राने युरोपियन देशात प्रवास केला. त्या वेळेस स्पेनमध्ये मूर लोकांचे साम्राज्य होते. तेथे त्यांची मोठमोठी विद्यापीठे होती. तेथून हे ज्ञान युरोपभर गेले व अर्वाचीन युरोपियन गणितशास्त्राचा तो पाया आहे. नवीन अंकांना युरोपात प्रथम विरोध झाला. नास्तिकांची ही चिन्हे आहेत असे म्हणत. हिंदी अंकांचा सर्रास उपयोग सुरू व्हायला कित्येक शतके लागली. सिसिलीतील एका नाण्यावर या अंकांचा पहिला उपलब्ध लेखी पुरावा आहे. हे नाणे इ.स. ११३४ मधले आहे. इंग्लंडमध्ये १४९० मध्ये या अंकांचा उपयोग प्रथम केलेला आढळतो.
बगदादमध्ये औपचारिक वकिलातीमार्फत हिंदी गणित, ज्योतिष इत्यादी विषयांवरचे ग्रंथ जाण्यापूर्वीही हिन्दी गणिताचे विशेषत: अंकांच्या स्थानमूल्याचे ज्ञान पश्चिम आशियात गेले असावे असे वाटते. ग्रीक पंडित सीरियन लोकांकडे तुच्छतेने बघत असत. ग्रीक पंडितांचा उध्दटपणा पाहून एक सीरियन साधूला वाईट वाटले. त्यासंबंधीची एक गोष्ट आहे. या सीरियन संन्याशाचे सेव्हरस सेबोक्त असे नाव होते व युफ्रातिस नदीच्या तीरावरील एका मठात तो राहात असे. त्याने ६६२ मध्ये लिहिलेले एक पुस्तक आहे. ग्रीकांहून सीरियन मुळीच कमी नाहीत असे त्यात तो लिहितो. उदाहरण म्हणून त्याने हिन्दी लोकांचा उल्लेख केला आहे. तो म्हणतो, ''हिंदू तर काही सीरियन नव्हत. या हिंदूंचे आपण उदाहरण घेऊ. त्यांच्या विज्ञानविषयक गोष्टी मी बाजूला ठेवतो; ज्योतिषातील सूक्ष्म असे हिंदूंचे शोध ग्रीक आणि बाबिलोनियन शोधांपेक्षा सरस आणि श्रेष्ठ आहेत. परंतु ते आपण बाजूला ठेवू. मी त्यांची गणनापध्दती फक्त विचारासाठी घेतो. खरोखरच हे सारे वर्णनातीत आहे. केवळ नऊ चिन्हे घेऊन सारे गणन केले जाते. आपण ग्रीक भाषा बोलतो एवढ्यावरच आपण सर्व ज्ञानविज्ञानाच्या परम सीमा गाठल्या असे जे समजतात, त्यांनी या गोष्टीचा जरा विचार करावा म्हणजे दुसर्यांनाही काही ज्ञान असते, अक्कल असते हे मग त्यांच्या ध्यानात येईल.'' *
हिंदुस्थानातील गणित-शास्त्राचा विचार करीत असताना अर्वाचीन काळातील एक असामान्य भारतीय व्यक्ती डोळ्यांसमोर उभी राहते. त्या व्यक्तीचे नाव श्रीनिवास रामानुजम्. दक्षिण हिंदुस्थानात एका गरीब ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शिक्षणाची सोय नसल्यामुळे मद्रास येथील पोर्ट ट्रस्ट खात्यात त्यांनी कारकुनाची नोकरी धरली. परंतु गणित-शास्त्रातील अभिजात प्रेरणेची अपार स्फूर्ती त्यांच्या जीवनात उसळत होती. फुरसतीच्या वेळात ते समीकरणे सोडवीत बसत. संख्या व समीकरणे यांच्याशी ते खेळत. सुदैवाने एका गणितज्ञाचे त्यांच्याकडे लक्ष जाऊन त्याने रामानुजमचे काही संशोधन केंब्रिजला पाठविले. त्याचा तेथल्या मंडळींवर फार परिणाम झाला. रामानुजम् यांना शिष्यवृत्ती देण्याची व्यवस्था झाली व कारकुनी सोडून ते केंब्रिजला गेले. तेथील अल्पवास्तव्यातच त्यांनी
---------------------
* बी. दत्त आणि ए. एन. सिंघ यांच्या 'हिंदू गणिताचा इतिहास' (१९३३) या ग्रंथातून. या विषयावरील उत्कृष्ट माहितीबद्दल मी या ग्रंथाचा आभारी आहे.