रोमन संस्कृतीच्या र्हासाप्रमाणे, नाटकातल्या प्रसंगात शोभण्यासारखा एकाएकी भारतीय संस्कृतीचा र्हास झाला नाही. जो र्हास झाला तो हिशेबात घेतला तरीसुध्दा आपले स्वत्व टिकवून राखण्याची अजब चिकाटी या संस्कृतीने दाखविली आहे. परंतु हळूहळू र्हास होत चालला असे दिसते. ख्रिस्त शकाची पहिली हजार वर्षे संपली त्या सुमारास हिंदुस्थानातील सामाजिक स्थिती कशी होती याचे सविस्तर वर्णन देणे कठीण आहे. परंतु हिंदुस्थानची आर्थिक स्थिती सुधारून संपत्ती वाढत जाण्याचे बंद होऊन आर्थिक व्यवस्थेचा संकोच या सुमारास दिसू लागला हे बव्हंशी निश्चित आहे. जीवनाचे ठराविक साच्याचे प्रकार पाडण्यात आले, प्रत्येकाचे त्या त्या धंद्यातील काम कायमचे ठरले. त्यामुळे त्याला दुसर्या कामाकडे लक्ष देण्याचे कारण उरले नाही. देशाच्या रक्षणासाठी फक्त क्षत्रियांनी लढावे, मरावे, इतरांचे त्यात लक्ष नसे, त्यांना तसे करण्याला बंदी होती. म्हणून कोणाला उत्साहही वाटत नसे की देशासाठी जावे, मरावे. ब्राह्मण आणि क्षत्रिय व्यापारधंदा करणे कमीपणा मानीत. शिक्षण आणि पुढे येण्याच्या सोयी-सवलती खोलच्या वर्गास नाकारण्यात आल्या होत्या. वरिष्ठ वर्णाशी नम्रतेने वागावे अशी त्यांना शिकवण असे. लहानमोठ्या शहरांतून उद्योगधंदे होते; तरीही राजकीय सांगाडा एक प्रकारे सरंजामशाहीवृत्तीचाच होता. युध्दतंत्रातही हिंदुस्थान जरा मागेच पडला. अशा परिस्थितीत नवीन प्रगतीची शक्यता नव्हती. ती समाजरचना बदलल्याशिवाय, बुध्दी व शक्तीचे नवीन झरे मोकळे केल्याशिवाय नवप्रगतीला वाव नव्हता. परंतु असा फरक करायचा झाला तर चातुरर्वर्ण्य आडवे येई. चातुरर्वर्ण्याने एके काळी या राष्ट्राला जरी स्थैर्य दिले, त्याच्यात काही गुण जरी असले, तरी विनाशाची बीजेही त्यात होती.
भारतीय चातुरर्वर्ण्याने भारतीय समाजाला आश्चर्यकारक स्थैर्य दिले हे नाकबूल करता येणार नाही. (त्याचा अधिक ऊहापोह मी पुढे करीन.) परंतु लहानलहान घटकांना व समूहांना जरी स्थैर्य व सामर्थ्य यांचा लाभ झाला, तरी विशाल एकीकरणाच्या मार्गात, प्रगतीच्या, प्रसरणाच्या मार्गात त्यामुळे अडथळेच येत. चातुरर्वर्ण्य आणि धंदेवाईक जाती यामुळे व्यापारधंदा, कलाकौशल्य वाढले तरी त्या त्या जातीतच वाढले. अशा प्रकारे ते ते विशेष धंदे वंशपरंपरागत झाले; त्यामुळे नवीन नवीन उद्योगधंदे, नवीन नवीन व्याप यांच्याकडे लक्ष राहिले नाही. तो जो आपल्या चाकोरीत फिरत राही. संशोधनवृत्ती, नावीन्याची आवड, नवीन आरंभ यांचे कोठेच दर्शन होईना. मर्यादित क्षेत्रात एक प्रकारचे स्वातंत्र्य होते, परंतु त्यासाठी व्यापक व विस्तृत स्वातंत्र्याची किंमत द्यावी लागली; समाजातील खालच्या पातळीवर कोट्यवधी लोकांना कायमचे ठेवावे लागले. विकासाची, वाढ करून घेण्याची कोणतीही संधी वा सोय त्यांना राहिली नाही. जोपर्यंत वर्णव्यवस्थेने विकासाला, वाढीला, प्रगतीला वाव दिला, क्षेत्र दिले तोपर्यंत वर्णव्यवस्थेचा उपयोग होता, तोपर्यंत त्यांच्यातील प्रगतिपरत्व कायम होते. परंतु त्या मर्यादेतील विकासाच्या व वाढीच्या परम सीमा गाठताच, त्या व्यवस्थेला अर्थ राहिला नाही, त्या अवस्थेत प्रगतिपरत्व राहिले नाही, एक प्रकारची स्थाणुता आली. शेवटी तर प्रगती दूर होऊन परागती मात्र होऊ लागली.
यापुढे जिकडे पाहाल तिकडे र्हासच दिसेल, अवनतीच दिसेल. बौध्दिक, तत्त्वज्ञानात्मक, राजकीय, युध्दाच्या तंत्रात व पध्दतीत बाह्य जगाचे ज्ञान आणि त्यांच्याशी संबंध ठेवणे यात, सर्वच बाबतीत अवकळा आली. आखिल भारतीय अशी दृष्टीच राहिली नाही, आर्थिक पसारा थांबला. स्थानिक, प्रादेशिक भावना, सरंजामशाही आणि आपल्या लहान जातीकुळीपुरते पाहण्याच्या भावना मात्र वाढल्या. परंतु इतकेही झाले तरी पुढील काळात असे पुन्हा दिसून आले की, या प्राचीन व्यवस्थेत अद्यापही जिवंतपणा होता; आश्चर्यकारक चिकाटी होती; तसेच काही लवचिकपणा व परिस्थितीशी, नव्या जमान्याशी जुळवून घेण्याची वृत्तीही शाबूत होती. यामुळे पुन्हा तिला जीवन मिळाले. नवीन संबंधामुळे पुन्हा काही दिवस स्फूर्तीची लाट उसळली; काही बाबतींत प्रगतीही झाली; विचारांतही नवीनता आली. परंतु भूतकाळातील शेकडो प्रकारची बंधने प्रगतीच्या प्रवाहाला पदोपदी अडथळे आणित होती, प्रगती खुंटवीत होती.
**********