युरोपातील इतर विद्यापीठांपेक्षा त्या वेळचे स्पेन फारच पुढे होते. कार्डोबा येथील अरब आणि ज्यू विद्वानांना पॅरिस वगैरे ठिकाणी मोठा मान दिला जाई. या अरबांना मात्र युरोपियनांची काही किंमत वाटत नसे. पिरनीज पर्वताच्या उत्तरेकडे राहणार्या युरोपियनांविषयी टॉलेदो येथील सैद नावाचा एक अरबी लेखक लिहितो, ''हे लोक भावनाशून्य, थंड गोळे असे आहेत. त्यांची वाढ पुरी होऊन ते वयात येतच नाहीत. रंगाने पांढरे आणि हाडापेराने धिप्पाड असे आहेत; परंतु बुध्दीची कुशाग्रता, बोलता बोलता सहज कोटी करण्याची कला त्यांच्याजवळ मुळीच नाही.''
मध्य व पश्चिम आशियात अरब संस्कृती जी बहरली तिला दोन ठिकाणांहून स्फूर्ती मिळाली होती. अबर आणि इराणी दोन्ही संस्कृतींतून भरपूर सामग्री घेऊन ती वाढली. दोन्हींचे मनोहर मिश्रण होऊन त्यातून विचाराचा जोमदारपणा व उच्च प्रकारची राहणी यांचा समाजाच्या वरच्यावरच्या वर्गात प्रादुर्भाव झाला. अरबांपासून जिज्ञासूवृत्ती व सामर्थ्य ही आली; इराणी लोकांपासून कला, जीवनात रमणीयता, ऐषाराम या गोष्टी आल्या.
तुर्की सत्तेच्या पुढे बगदाद हतप्रभ झाले आणि जिज्ञासूवृत्ती, बुध्दिवाद यांना उतरती कळा लागली. चेंगीझखान आणि मोगल यांनी जे थोडे फार राहिले होते तेही पार नष्ट करून टाकले. पुढे पुन्हा शंभर वर्षांनी मध्य आशियाला जागृती आली. समरकंद आणि हिरात ही चित्र व शिल्प यांची माहेरघरे झाली. जुन्या अरबी-इराणी संस्कृतीचे त्यांनी पुनरुज्जीवन केले. परंतु अरब बुध्दिवाद, विज्ञान-जिज्ञासा यांचे पुनरुज्जीवन झाले नाही. इस्लामला ठरीव साच्याचे रूप येऊ लागले; लष्करी विजयांना अनुरूप असे त्याचे स्वरूप होत गेले. बौध्दिक विजयांना अनुकूल व अनुरूप असे त्याचे रूप राहिले नाही. आशियातील मुस्लिम धर्माचे प्रतिनिधी अत:पर अरब न राहता तुर्क* आणि मोगल हे झाले. थोड्या फार अंशाने अफगाणही झाले. पश्चिम आशियातील मोगलांनी इस्लामी धर्म स्वीकारला होता. अतिपूर्वेकडील आणि मध्य भागातील मोगलांनी- बर्याच जणांनी- बौध्दधर्म घेतला.
गझनीचा महमूद आणि अफगाण
आठव्या शतकाच्या आरंभी इ. सन ७१२ मध्ये अरबांनी सिंधचा ताबा घेतला. ते तेथेच थांबले. सिंधही अरब साम्राज्यापासून अर्ध्या शतकातच स्वतंत्र झाला. स्वतंत्र मुस्लिम राज्य तेथे चालू राहिले. पुढे जवळजवळ तीनशे वर्षे हिंदुस्थानावर कोणी स्वारी, आक्रमण केले नाही. इ.सन १००० च्या सुमारास अफगाणिस्थानात गझनीचा सुलतान महमूद हा प्रबळ पुरुष पुढे आला. तो तुर्क होता. मध्य आशियात त्याचे प्रभुत्व होते. तो हिंदुस्थानवर स्वार्या करू लागला. त्याने अनेक स्वार्या केल्या. त्यांत फार क्रूर कत्तली झाल्या व प्रत्येक वेळेला अपरंपार लूट महमूद घेऊन गेला. त्या वेळचा समकालीन पंडित खिवाचा अल्बेरुणी याने या स्वार्यांचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे. ''हिंदूंची दाणादाण उडवून दाही दिशांना पांगलेल्या धुळीच्या कणांसारखी त्यांची गत झाली आहे. एखादी जुनी-पुराणी गोष्ट लोकांच्या तोंडी काय ती उरावी तसे ते आता नुसते स्मृतिरूप राहिले आहेत. प्रत्यक्षात आता जे मूठभर हिंदू राहिले आहेत त्यांना अर्थातच सर्व मुसलमानांचा अत्यंत द्वेष वाटतो.''