इंडो-अफगाण, दक्षिण हिंदुस्थान, विजयानगर, बाबर, समुद्रसत्ता
इंग्रज इतिहासकार आणि काही देशीही, हिंदी इतिहासाचे नेहमी तीन भाग पाडतात : प्राचीन किंवा हिंदू काळ, मुसलमानी काळा आणि ब्रिटिश काळ; परंतु ही विभागणी सर्व घटनांचा विचार करून, सारे लक्षात घेऊन झालेली नाही आणि बरोबरही नाही. त्यामुळे घोटाळा होतो व चुकीचा देखावा दिसतो. राजकीय व्यवस्थेच्या सर्वांत वरच्या बाजूत होणार्या वरवरच्या बाह्य फरकाकडे विशेष पाहणारी ही विभागणीची दृष्टी आहे. राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक अशा विविध दृष्टींनी भारतीय जनतेच्या विकासात काय फेरफार होत होते तिकडे या दृष्टीचे तितके लक्ष नाही. ज्याला प्राचीन काळ म्हणून म्हणतात तो किती तरी दीर्घ, विस्तृत आणि घडामोडींनी भरलेला आहे. पुन:पुन्हा उन्नती व अवनतीच्या लाटा येत-जात होत्या. तसेच ज्याला मुसलमानी काळ म्हणतात, त्या काळात वरती सत्ता-संक्रमण झाले तरी भारतीय जीवनाच्या अखंड परंपरेत त्यामुळे फारशी उलथापालथ झाली नव्हती. प्राचीन काळी वायव्येकडून स्वार्या करणारे येत, त्यांच्याप्रमाणे हे स्वार्या करणारेही हिंदुस्थानात मिळवून घेण्यात आले व हिंदी जीवनाचा ते एक भाग बनले. त्यांची घराणी म्हणजे हिंदी घराणी बनली. मिश्रविवाहामुळे रक्ताची सरमिसळही झाली. काही अपवाद वगळले तर असे दिसून येईल की, लोकांच्या चालीरीतीत, त्यांच्या जीवनप्रणालीत ढवळाढवळ होता होईतो करायची नाही असा जाणूनबुजून प्रयत्न केला जात असे; हिंदुस्थान म्हणजे आपले घर या नात्याने ते राहू लागले आणि त्यांची निष्ठा या देशालाच व्यापून राहिली. दुसरीकडे कोठे त्यांचे आतडे गुंतले नव्हते; आणि हिंदुस्थान स्वतंत्र म्हणूनच पूर्वीसारखा पुढे राहिला.
ब्रिटिशांच्या येण्याने महत्त्वाचा मूलभूत फरक झाला. त्यांनी प्राचीन जीवनाचेच उत्पाटन केले. पश्चिमेकडून एक नवीनच प्रेरणा घेऊन ते आले होते; युरोपात नवयुग, धर्मसुधारणा, इंग्लंडातील राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीचे नूतन आरंभ या सर्वांहून उत्क्रांती झालेली एक विशेष दृष्टी घेऊन ब्रिटिश आले होते. अमेरिकन आणि फ्रेंच क्रांतीमुळे या प्रेरणेत अधिकच भर पडली. ब्रिटिश हे हिंदुस्थानात सदैव परके म्हणूनच राहिले. हिंदुस्थानात ते कोठेच असलेल्या चौकटीत नीट बसत नव्हते, आणि तसा प्रयत्न त्यांनी केला नाही. हिंदुस्थानच्या इतिहासात प्रथमच परदेशातून येथे सत्ता गाजविण्यात येऊ लागली; त्या नवीन सत्तेची सारी अर्थव्यवस्था त्या दूरच्या देशात केंद्रीभूत झालेली होती. त्यांनी अर्वाचीन काळातील एक मासलेवाईक वसाहतीचे रूप त्या देशाला आणले व आपल्या प्रदीर्घ इतिहासात हिंदुस्थान प्रथमच परतंत्र झाला.
गझनीच्या महमुदाने केलेली स्वारी म्हणजे तुर्कीचे बाहेरच्या परकीयांचेच आक्रमण होते. इतर भारतापासून काही दिवस पंजाब अलग राहिला. परंतु बाराव्या शतकानंतर अफगाण आले. ते भारतीयांपासून काही फारसे निराळे नव्हते. इंडोआर्यन वंशाचे तेही होते. त्यांची स्वारी महणजे परकीयांची असे तितके म्हणता येणार नाही. कितीतरी शतकांपर्यंत अफगाणिस्थान हा भारताचाच भाग होता, आणि तसे होणे अटळ होते. त्यांची पुश्तू भाषा ही संस्कृतोद्भव आहे. भारतीय संस्कृतीचे विशेषत: बौध्दकाळातील इतके अवशेष अफगाणिस्थानात आहेत की, हिंदुस्थानात फारच थोड्या ठिकाणी तसे आहेत. अफगाणांना हिंदी-अफगाण (इंडो-अफगाण) म्हणणे अधिक बरोबर होईल. खालच्या मैदानातील हिंदी लोकांहून बर्याच बाबतीत ते निराळे होते. परंतु काश्मिरातील लोकांची आणि खालच्या अधिक उष्ण आणि सपाट प्रदेशातील लोकांची राहणीही सारखी नाही. हे जसे फरक तसेच ते. काश्मिरी लोकांची राहणी खालच्या मैदानातील लोकांच्या राहणीहून निराळी असली तरी काश्मीर हे हिंदी विद्या व संस्कृती यांचे महत्त्वाचे केंद्र होते. अफगाण हे अधिक सुसंस्कृत व प्रतिष्ठित अशा अरब-इराणी लोकांपासून निराळे होते. त्यांच्या पहाडातून किल्ल्याप्रमाणेच ते कठोर व उग्र होते, कडव्या धर्मवृत्तीचे होते; लढवय्ये होते. बुध्दिक्षेत्रात साहसाकडे त्यांचा कल नसे. बंडखोर लोकांना ताब्यात आणणारे विजयी वीर या नात्यानेच त्यांचे नवीन जीवन सुरू झाले व ते निष्ठुर आणि क्रूर बनले.