परंतु लौकरच त्यांची वृत्ती मावळली.  हिंदुस्थान त्यांचे घर झाले; दिल्ली त्यांची राजधानी झाली.  महमुदाचे लक्ष दूरच्या गझनीकडे असे; तसे ह्यांचे नव्हते.  ज्या अफगाणिस्थानातून ते आले तो प्रांत त्यांच्या राज्याच्या सीमेवरचा भाग बनला.  हिंदीकरणाची चळवळ जोराने सुरू झाली.  पुष्कळांनी येथल्या स्त्रियांशी लग्ने केली.  अल्लाउद्दिन हा त्यांचा एक मोठा राजा झाला.  त्याने एका हिंदू स्त्रीशी लग्न लावले व त्याच्या मुलानेही तसेच केले.  पुढील गुलाम घराण्यातील राजे वंशाने तुर्क होते.  कुतुबुद्दिन, रेझिया, अल्तमश सारे तुर्क होते.  परंतु सरदारवर्ग आणि लष्कर मुख्यत्वे अफगाणीच असे.  साम्राज्याची राजधानी असल्यामुळे दिल्ली भरभराटली.  इब्नबतूता हा त्या वेळचा प्रसिध्द अरबी प्रवासी, मोरोक्कोचा राहणारा होता.  कैरो, इस्तंबूलपासून तो चीनपर्यंतची अनेक पुरेपट्टणे त्याने पाहिली होती.  नाना देशांत तो गेला होता.  ''दिल्ली या विश्वातील अत्यंत मोठ्या शहरांपैकी एक आहे'', असे त्याने कदाचित थोडे अतिशयोक्तिपूर्ण लिहून ठेविले आहे.

दिल्लीची सल्तनत दक्षिणेकडे पसरली.  चोल राज्याला उतरती कळा लागली होती; परंतु त्याच्या जागी एक नवीन दर्यावर्दी सत्ता उदयाला आली होती.  पांड्य राज्याची मदुरा ही राजधानी होती व पूर्व किनार्‍यावरील कायल हे त्यांचे प्रसिध्द बंदर होते.  चीनमधून परतताना इ. सन. १२८८ व १२९३ मध्ये मार्को पोलो दोनदा या बंदरात उतरला होता.  ''हे एक सुंदर उमदे शहर आहे; अरबस्थान, चीन इत्यादी देशांतील गलबतांनी ते गजबजलेले आहे'', असे त्याने वर्णन केले आहे.  अती नाजूक व तलम मलमलीचाही त्याने उल्लेख केलेला आहे.  हिंदुस्थानच्या पूर्व किनार्‍यावर ही मलमल तयार होत असे.  मार्को पोलो लिहितो, ''कोळ्याच्या जाळ्याच्या तंतूप्रमाणे ही मलमल दिसे.''  मार्को पोलोने एक मनोरंजक माहिती दिली आहे ती अशी की, अरबस्थान व इराण या देशांतून घोड्यांचीही पुष्कळ आयात दक्षिण हिंदुस्थानात होई.  घोडेपैदाशीला दक्षिण हिंदुस्थानची हवा अनुकूल नव्हती.  घोड्यांचे दुसरे उपयोग आहेतच, परंतु युध्दासाठी त्यांची फार जरूर असे.  उत्कृष्ट घोड्यांची पैदास मध्य व पश्चिम आशियात होई.  मध्ये आशियातील जाती युध्दात वरचढ असत, याचे हे एक कारण असण्याचा संभव आहे.  चेंगीझखानाचे मोगल सैनिक उत्कृष्ट घोडेस्वार असत व घोड्यावर त्यांचा जीव असे.  तुर्की लोकही चांगले घोडेस्वार होते आणि अरबांची घोड्यावरील माया सर्वश्रुतच आहे.  उत्तर आणि पश्चिम हिंदुस्थानात काही ठिकाणी घोड्यांची उत्कृष्ट पैदास होते.  काठेवाड तर प्रसिध्दच आहे, आणि रजपूतही घोड्यांचे फार षोकी होते.  एखाद्या प्रसिध्द घोड्यासाठी छोट्या लढायाही होत.  दिल्लीच्या एका सुलतानाने एका रजपूत सरदारापाशी त्याच्या घोड्याची स्तुती करून, शेवटी त्याच्याजवळ त्याची मागणी केली.  तो सरदार त्या लोदी सुलतानाला म्हणाला, ''रजपुताजवळ तीन गोष्टींची कधी मागणी करू नये : त्याचा घोडा, त्याची पत्नी, त्याची तलवार'', असे म्हणून तो हाडा सरदार घोड्याला टाच मारून दौडत गेला.  त्यावरून नंतर पुष्कळ कटकटी निर्माण झाल्या.

चौदाव्या शतकाच्या अखेरीस तैमूर आला आणि त्याने दिल्लीची सल्तनत धुळीस मिळविली.  थोडे महिनेच तो हिंदुस्थानात होता.  दिल्लीला येऊन तो परत गेला.  त्याचा प्रयाणमार्ग म्हणजे केवळ स्मशान बनला.  कत्तल केलेल्यांच्या मुंडक्यांचे त्याने ठायीठायी मनोरे बांधले.  हिंदुस्थानात फार दूरवर तो गेला नाही हे त्यातल्या त्यात सुदैव म्हणायचे.  पंजाब-दिल्लीच्या काही भागांनाच त्याच्या स्वारीच्या भयंकर आपत्तीतून जावे लागले.

या मरणनिद्रेतून जागे व्हायला दिल्लीला कितीतरी वर्षे लागली, आणि जाग आली त्या वेळेला मोठ्या साम्राज्याची राजधानी म्हणून ती राहिली नव्हती.  तैमूरच्या स्वारीमुळे साम्राज्याचे तुकडे झाले होते, आणि दक्षिणेकडे त्याहून कितीतरी लहानलहान राज्ये निर्माण झाली होती. त्याच्या आधी पुष्कळ वर्षे चौदाव्या शतकाच्या आरंभी गुलबर्ग्याचे बहामनी राज्य* आणि विजयानगरचे हिंदू राज्य यांचा उदय झाला होता.  गुलबर्ग्याच्या त्या राज्याचे पाच तुकडे झाले.  त्यातच एक अहमदनगरचे राज्य होते.  बहामनी राज्याचा निजाम-उलमुल्क भैरी हा एक प्रधान होता.  त्याचा मुलगा अहमद निजामशहा.  याने अहमदनगरचे राज्य स्थापिले.  निजाम-उलमुल्क भैरी हा भैरू नावाच्या ब्राह्मण हिशेबनिसाचा मुलगा.  भैरू वरूनच त्याला भैरी असे नाव पडले.  अहमदनगरचे हे राजघराणे याप्रमाणे देशी होते, आणि अहमदनगरची वीरांगना चांदबिबी हिच्या अंगात संमिश्र रक्त होते.  दक्षिणेकडील सारीच मुसलमानी राज्ये देशी होती, हिंदी होती.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel